20 October, 2018

टंचाई सदृश्य परिस्थितीत प्रशासनाने समन्वयाने कामे करावीत -पालकमंत्री दिलीप कांबळे












टंचाई सदृश्य परिस्थितीत प्रशासनाने समन्वयाने कामे करावीत
-पालकमंत्री दिलीप कांबळे

        हिंगोली, दि.20: टंचाई सदृश्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्ह्यात प्रशासनाने विविध उपाययोजना राबवून समन्वयाने कामे करण्याच्या सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी दिल्या.
            येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील डि.पी.सी. सभागृहात दूष्काळ सदृश्य परिस्थितीच्या आढावा बैठकीत         श्री. कांबळे हे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवराणीताई नरवडे, सर्वश्री आमदार तान्हाजी मुटकुळे, डॉ. जयप्रकाश मुंदडा, रामराव वडकुते, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड, अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणियार, जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी खुदाबक्श तडवी यांची उपस्थिती होती.    
            यावेळी पालकमंत्री कांबळे पुढे म्हणाले की, टंचाई सदृश्य परिस्थितीत राज्यातील 202 तालूक्यांचा समावेश करण्यात आला आहे. यात हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी आणि सेनगाव या तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. जून-जूलै महिन्यात जिल्ह्यात चांगल्या पावसाला सुरुवात झाली होती. परंतू त्यानंतर पावसाने ओढ दिल्याने  निसर्गावर अवलंबून असणाऱ्या कोरडवाहू शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या टंचाई परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने  शेतकरी, ग्रामस्थांना दिलासा देणाऱ्या उपाययोजना कराव्यात. टंचाईसदृश्य परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत करण्याची जबाबदारी शासन प्रशासनाची असून, टंचाईसदृश्य गावांमध्ये संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वत: जाऊन पाहणी करून टंचाईसदृश्य भागातील पीक परिस्थिती, पाणी परिस्थिती, चाऱ्याची आवश्यकता, जनावरांची संख्या आदी बाबींची अधिकृत आणि वस्तुनिष्ठ अशी सविस्तर माहिती तयार ठेवावी. जेणे करून शासनस्तरावरून बाधीत शेतकऱ्यांना योग्य ती मदत करणे शक्य होईल. तसेच जिल्ह्यातील जलसाठ्यातील उपलब्ध पाणीसाठा तसेच विविध पाण्याचे स्त्रोत अधिगृहीत करण्याच्या सूचना ही यावेळी पालकमंत्री कांबळे यांनी यावेळी दिल्या.
            टंचाईसदृश्य परिस्थितीत पशुधनाची जपवणूक करणे ही महत्त्वाचे असून, जनावरांना पूरेसा पाणीसाठा आणि चारा विनाविलंब उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आतापासून तयारी करावी. 305 दिवस पूरेल एवढा जिल्ह्यात चारा उपलब्ध आहे. याकरीता धरणांतील ओलीताखालील जमीनीवर चाऱ्याची लागवड करावी. 
            यावेळी पालकमंत्री कांबळे यांनी तालुकानिहाय झालेला पाऊस, जलसाठ्यातील उपलब्ध पाणीसाठा, टंचाईसदृश्य भाग, लागवडी खालील क्षेत्र, खरीप हंगामातील पेरणी क्षेत्र, पशुधन आणि त्याच्या चारा, पिण्याच्या पाण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाय योजना आदी  बाबींचा यावेळी आढावा घेऊन पालकमंत्र्यांनी संबंधित विभागास सुचना दिल्या.
            जिल्ह्यात यावर्षी 3 लाख 40 हजार 878 हे. क्षेत्रावर सोयाबीन, तूर, कापूस, हळद या पीकांची लागवड झाली असून पावसाने ओढ दिल्याने या पीकाचे उत्पादन क्षमतेवर परिणाम होत असल्याची माहिती कृषि अधिकारी यांनी यावेळी दिली.
            यावेळी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी पर्जन्यमान व खंड, धरणातील उपलब्ध पाणीसाठा, पिण्याच्या पाण्याचे आरक्षण, निरीक्षण विहीरीतील पाणीपातळी, खरीप हंगामातील पैसेवारी, पिक कापणी प्रयोग, कापुस बोंडअळी अनुदान वाटप, प्रधानमंत्री पिक विमा योजना, पशुधन वैरण आवश्यकता व उपलब्धता, महात्मा गांधी रोजगार हमी योजना आणि जलयुक्त शिवार अभियान आदींची माहिती सादरीकरणांद्वारे सादर केली.
            यावेळी बैठकीस पाणीपुरवठा, जलसंधारण, कृषि, पशुवैद्यकीय, आरोग्य, महसूल, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विद्युत पुरवठा यांसह सर्व संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री दिलीप कांबळे यांची टंचाई सदृश्य भागाची पाहणी
            पालकमंत्री दिलीप कांबळे हे जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी आणि सेनगाव तालुक्यांतील टंचाई परिस्थितीची पाहणी करण्याकरीता दोन दिवसीय दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी हिंगोली तालूक्यातील संतुक पिंपरी, राहूरी खुर्द, केसापूर आणि काळकोंडी तर कळमनुरी तालूक्यातील जांभरुन, रेणापूर, सालेगाव आणि वाकोडी तर सेनगाव तालूक्यातील सेनगाव, म्हाळसापूर आणि भानखेडा या गावातील शेतकरी बांधवाच्या शेतात जावून त्यांच्याशी संवाद साधून पिक आणि पाणी परिस्थतीची पाहणी करुन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच  शासनाकडून शेतकरी, ग्रामस्थांच्या काय अपेक्षा आहेत याची माहिती घेवून टंचाई सदृश्य परिस्थितीला यशस्वीरित्या हाताळण्यासाठी शासनामार्फत सर्वतोपरी मदत करण्यात येणार असून, शासन सदैव शेतकरी बांधवाच्या पाठीशी राहील अशी ग्वाही ही पालकमंत्री कांबळे यांनी यावेळी दिली.

****

No comments: