29 October, 2018

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त एकता दौडचे आयोजन


राष्ट्रीय एकता दिनानिमित्त एकता दौडचे आयोजन

हिंगोली,दि.29: सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने मंगळवार दिनांक 31 ऑक्टोबर रोजी  ‘राष्ट्रीय एकता  दिवस’ म्हणून साजरा करण्याचा संकल्प  शासनाने केला आहे. त्यानिमित्ताने शहरात जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ, एकता दौड व पोलीस तसेच तत्सम यंत्रणांचे सायंकाळचे परेड संचलन, मानवंदना या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. त्या बरोबर हा दिवस स्व. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी असल्याने ‘राष्ट्रीय संकल्प दिवस’ म्हणून मिरवणूक, देशभक्तीपर गाणी व सुप्रसिध्द व्यक्तीमत्व असलेल्या व्यक्तींची व्याख्याने इ. कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी अग्रसेन चौक येथे राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन दि. 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 7.00 वाजता करण्यात आले आहे. एकता दौडची सुरुवात जिल्हा परिषद अध्यक्षा, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक व विविध शासकिय व निमशासकीय अधिकारी/ कर्मचारी यांच्या उपस्थितीत होणार आहे.
एकता दौड ही अग्रसेन चौकातून सुरुवात होऊन - बसस्टँड - स्व. इंदिरा गांधी चौक - महात्मा गांधी चौक येथे समारोप होईल. या राष्ट्रीय एकता दौडमध्ये जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयातील मुला-मुलींनी, जिल्ह्यातील नागरिकांनी, खेडाळूंनी, स्वयंसेवी संस्था, युवक मंडळे, क्रीडा मंडळे यांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
****

No comments: