31 December, 2018

वकील संघातील सदस्यांसाठी EVM व VVPAT प्रशिक्षण शिबीराचे आयोजन


वकील संघातील सदस्यांसाठी EVM व VVPAT प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

हिंगोली,दि.31: आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2019 च्या अनुषंगाने भारत निवडणुक आयोगामार्फत EVM  व VVPAT चे प्रशिक्षण, प्रसार, प्रसिध्दी व जनजागृती जिल्ह्यात करण्यात येत आहे. याअनुसार सदर कार्यक्रमाची अंमलबजावणीसाठी तालुक्यातील सर्व वकील संघातील सदस्यांकरीता EVM  व VVPAT चे प्रशिक्षण शिबीराचे दिनांक 1 जानेवारी, 2019 रोजी सकाळी 11.00 वाजता तहसिल कार्यालय, हिंगोली येथे आयोजन करण्यात आले आहे.  
जिल्ह्यातील सर्व  वकील संघातील सदस्यांनी या प्रशिक्षण शिबीरास उपस्थित राहावे असे आवाहन अति. सहायक निवडणुक निर्णय अधिकारी  94- हिंगोली विधानसभा मतदार संघ तथा तहसिलदार, हिंगोली यांनी केले आहे.

****


बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन


बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन

            हिंगोली,दि.31: बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा 5 जानेवारी 2019 रोजी विभागीय स्तरावर, औरंगाबाद सिडको कलाग्राम, एम.आय.डी.सी. इंडस्ट्रीयल एरीया, चिकलठाणा, औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांनी www.balasahebthackerayrojgarmelava.com या संकेतस्थळावर 3 जानेवारी] 2019 पर्यंत नांव नोंदणी करुन सुशिक्षित बेरोजगारानी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र, हिंगोली यांनी केले आहे.
*****

27 December, 2018

थंडीच्या लाटेवरील उपाययोजना


थंडीच्या लाटेवरील उपाययोजना
                                                                           
            हिंगोली,दि.27: सध्या कडाकीची थंडी पडत आहे, त्यामुळे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाकडून  थंडीपासून बचाव होण्यासाठी पुढीलप्रमाणे उपाययोजना सूचविल्या आहेत-अतिशय आवश्यकता असल्यास घराबाहेर जावे अन्यथा घरीच थांबावे, थंडीपासून संरक्षण  करण्यासाठी उबदार कपडे आहेत याची खात्री करावी, प्रसार माध्यमाद्वारे वेळोवेळी थंडीचा प्रतिकार करण्यासाठी दिलेली माहिती किंवा सूचनांचा अभ्यास करावा व अंमलात आणाव्यात, एकटे राहणाऱ्या वयोवृध्द शेजारच्या व्यक्तींकडे लक्ष द्यावे, गरम राहणाऱ्या किंवा इमारतीमधील जास्त हवा न येणाऱ्या  खोलीमध्ये वास्तव्य करावे. रुम हिटरचा वापर करावा, गरम पेय घ्यावे व शरीर उष्ण  राहण्यासाठी व थंडीच्या लाटेचा प्रतिकार करण्यासाठी शरीराला तयार करावे, विद्युत प्रवाह खंडीत झाल्यास फ्रीज मधील खाण्याचे पदार्थ 48 तास व्यवस्थित राहू शकतात फक्त  त्याचा दरवाजा  व्यवस्थित लागतो का ते पहावे व जास्त वेळा उघडू नये, थंडीपासून बचाव करण्यासाठी  टोपी  किंवा मफलरचा वापर करावा, रॉकेलचे स्टोव्ह किंवा कोळश्याची शेगडी वापरत असाल तर त्याचा धूर जाण्यासाठी खिडकी उघडी  असावी अन्यथा दुषित धुरामुळे बाधा होऊ शकते, ताजे पदार्थ खावेत ज्यामुळे शरीरामध्ये उर्जा निर्माण होईल, मादक पदार्थ किंवा अल्कोहोल  मिश्रित नसलेले पेय घ्यावेत.
            हिमबाधा झाल्याचे लक्षणे दिसताच डॉक्टरांना भेटावे, स्पर्श केल्यानंतर जाणीव होत नसल्यास किंवा हाताची बोटे , कानाची पाळी, नाकाचा शेंडा यांचा रंग पांढरा किंवा फिक्कट झाल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. शरीर थंड पडणे, थंडी वाजणे, स्मृतीभृंश होणे, बोलताना विसंगती किंवा अडखळणे, उच्चार स्पष्ट न करता येणे, अंधारी येणे , थकवा जाणवणे इत्यादी  लक्षणे आढळल्यास तात्काळ डॉक्टरांना दाखवावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी , हिंगोली यांनी केले आहे.
000000


20 December, 2018

जिल्ह्यात कलम 37 (1) (3) चे आदेश लागू

        हिंगोली,दि.20: जिल्ह्यात  दिनांक 22 डिसेंबर, 2018 रोजी श्रीदत्त जयंती उत्सव साजरा होत असून हिंगोली जिल्ह्यातील विविध दत्त मंदिरांमध्ये दत्त जयंती उत्सवात साजरी केली जाते. सदर दिवशी मंदिरांमध्ये भावीक जमा होतात. तसेच दिनांक 25 डिसेंबर, 2018 रोजी  ख्रिसमस नाताळ साजरा होत असून ख्रिश्चन धर्मियांचे वतीने चर्चमध्ये प्रार्थना व विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. दिनांक 31 डिसेंबर, 2018 रोजी वर्षाचा शेवटचा दिवस असून लोक नव वर्षाचे स्वागत करतात. यावेळी सर्व समाजातील लोक नव वर्ष हे मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोषाने साजरा करतात. तसेच हिंगोली जिल्ह्यामध्ये धनगर समाजातर्फे आरक्षण मिळावे मागणी करीता विविध प्रकारचे मोर्चे, धरणे, आंदोलने, रास्ता रोको, उपोषणे सुरु असून अशा विविध घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा  प्रश्न निर्माण  होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे विविध प्रश्न हाताळण्यासाठी व कायदा व सुव्यवस्था आबाधित  राखण्याकरिता संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात  दि. 19 डिसेंबर, 2018 रोजीचे 06.00 वाजल्यापासून ते दि. 02 जानेवारी, 2019 रोजीचे 24.00 वाजेपावेतो मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) चे आदेश लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.
त्यानुसार शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या जवळ शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाहीत. लाठ्या किंवा काठ्या, शारीरिक इजा होण्यास त्या कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तु जवळ बाळगणार नाहीत. कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटक द्रव्ये जवळ बाळगणार नाहीत. दगड, क्षेपणीक उपकरणे, किंवा सर्व प्रवर्तक द्रव्य गोळा करून ठेवणार नाही, किंवा जवळ बाळगणार नाहीत. आवेशी भांडणे अंगविक्षेप, विटंबनात्मक नकला करणार नाही. सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल अशी चिन्हे निशाणी, घोषणा फलक किंवा अशी कोणतीही वस्तु जवळ बाळगणार नाही किंवा ठेवणार नाहीत. व्यक्ती किंवा समुहाच्या भावना जाणुन बुजुन दुखावतील या उद्देशाने वाद्य वाजणार नाहीत किंवा असभ्य वर्तन करणार नाहीत. पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमूद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास जमण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी, हिंगोली  यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
****



महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट-ब चाळणी परिक्षा 23 डिसेंबर रोजी
              * जिल्ह्यातील 7 उपकेंद्रावर होणार परीक्षा.
* परिक्षा उपकेंद्रावर फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 लागू.
                                                                                  
           हिंगोली,दि.20: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था/रचना गट-ब चाळणी परीक्षा-2018, 23 डिसेंबर, 2018 रोजी सकाळी 10.00 ते 12.00 या वेळेत हिंगोली मुख्यालयातील 07 उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेसाठी एकूण 07 उपकेंद्रावर एकूण 1 हजार 656 परीक्षार्थी  परीक्षा देणार आहेत.
            सदर परीक्षा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीकोणातून परीक्षेत बसणा-या उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर डीजीटल डायरी, कॅलक्युलेटर, पुस्तके, पेपर्स, पेजर मायक्रोफोन, मोबाईल फोन कॅमेरा अंतर्भुत असलेली कोणत्याही प्रकारची साधने, सिमकार्ड, दुरसंचार साधने म्हणून वापरण्या योग्य कोणतीही वस्तु, बॅग्ज अथवा शासनाने बंदी घातलेल्या इतर कोणत्याही साहित्यासह परीक्षा केंद्राच्या परिसरात तसेच परीक्षा कक्षात आणण्यास अथवा स्वत:जवळ बाळगण्यात सक्त मनाई करण्यात आलेली आहे. तसेच सदर परीक्षा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीकोणातून परीक्षा केंद्रावर कायदा व सुव्यवस्थेची परीस्थिती हाताळण्यासाठी परीक्षा केंद्रावर फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात येणार आहे. सदर परीक्षा केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून परीक्षा केंद्रावर मुख्य प्रवेशद्वारावर पोलीस यंत्रणे मार्फत तपासणी करण्यात येणार आहे.
            सदर परीक्षेच्या दरम्यान परीक्षा कक्षात उमेदवारांकडे मोबाईल फोन/दुरसंचार साधनासह आयोगाने बंदी घातलेले इतर कोणतेही साहित्य आढळून आल्यास तसेच कॉपीचा/गैरप्रकारचा प्रयत्न करत असल्याचे निर्देशनास आल्यास त्या उमेदवाराविरुध्द फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात येईल. याची संबंधित परीक्षार्थ्यांनी नोंद घ्यावी. सर्व परीक्षार्थ्यींची बायोमेट्रीक पध्दतीने ओळख पडताळणी करण्यात सकाळी 9.30 वाजता सुरुवात होणार आहे. तरी सर्व उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर 9.00 वाजत हजर रहावे.
            तसेच सदर परीक्षेची पुर्व तयारी बाबतचे पहिले प्रशिक्षण दिनांक 15 डिसेंबर 2018 रोजी घेण्यात आले आहे. सदर प्रशिक्षणास उपकेंद्र प्रमुख 02, पर्यवेक्षक 05, समवेक्षक 21 हे गैरहजर असल्यामुळे गैरहजर अधिकारी/कर्मचारी, उपकेंद्र प्रमुख/ पर्यवेक्षक/समवेक्षक दुसऱ्या प्रशिक्षणास हजर न झाल्यास त्यांच्या विरुध्द प्रशासकीय कार्यवाही करण्यात येणार असल्याची ही माहिती प्रसिध्दी पत्रकान्वये निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.


****
ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेतंर्गत गावातील
कामांचे प्रस्ताव 01 जानेवारी पर्यंत सादर करण्याचे आवाहन
                                                                                  
           हिंगोली,दि.19: ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजना सन 2018-19 अंतर्गत ज्या गावामध्ये एकूण लोकसंख्येच्या तुलनेत आदिवासींची लोकसंख्या 50 टक्के पेक्षा जास्त आहे. अशा गावात विविध विकास कामे प्रस्तावित करण्याकरिता ग्रामसभेत ठराव मंजूर करुन ग्रामसेवक यांनी गटविकास अधिकारी यांच्या मार्फत गावातील कामांचे प्रस्ताव दिनांक 1 जानेवारी, 2019 पर्यंत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी जि. हिंगोली या कार्यालयास सादर करावयाचे आहेत.
            इच्छूकांनी प्रस्ताव सादर करतांना खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक असून, यामध्ये तहसीलदार यांचे एकूण लोकसंख्येपैकी आदिवासींची लोकसंख्या प्रमाणपत्र, प्रस्तावीत काम यापुर्वी कोणत्या ही योजनेतून झाले नसल्याचे प्रमाणपत्र, ग्रामपंचायतचा प्रस्तावित कामाचा बहुमताने पारीत झालेला ठराव, काम करण्यासाठी ग्रामपंचायतचे नाहरकत प्रमाणपत्र, कामाचे तत्वत: मान्यता प्राप्त अंदाजपत्रक, काम करावयाच्या जागेचे फोटो आणि कामाचा स्थळ दर्शक नकाशा ही कागदपत्रे आवश्यक आहेत.
तरी गावानी आपले प्रस्ताव दि. 1 जानेवारी, 2019 पर्यंत सादर करावेत. सदर तारखेनंतर प्राप्त झालेल्या प्रस्तावांचा विचार केला जाणार नाही, असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
****


इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व व्हीव्हीपॅटची जनजागृती मोहीम

·   24 डिसेंबर पासून जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्राच्या ठिकाणी करण्यात येणार जनजागृती
                                                                                  
           हिंगोली,दि.19: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 च्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील नागरीकांना ईलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (EVM) व व्हीव्हीपॅट (Voter Verifiable Paper Audit Trail) यांची माहिती देवून, EVM VVPAT चे हाताळणी (Hands on) मतदान घेण्याच्या जनजागृती कार्यक्रमास मुख्य निवडणूक अधिकारी, मुंबई यांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार दिनांक 24 डिसेंबर, 2018 रोजी पासून दररोज चार या प्रमाणे जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्राचे ठिकाणी EVM VVPAT बाबत जनजागृती करण्यात येणार आहे. यावेळी नागरीकांना EVM VVPAT ची हाताळणी (Hands on) करता येणार असून, मतदान घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी तालुका निहाय करण्यात आलेला राखडा व EVM VVPAT बाबत जनजागृती साठी निश्चित करण्यात आला असून वसमत येथे 168 ठिकाणी तर औंढा नागनाथ 131, कळमनुरी 144, हिंगोली 152,  आणि सेनगाव येथे 116  असे एकूण  711 ठिकाणी जनजागृती मोहिम राबविण्यात येणार आहे.
            या EVM VVPAT जनजागृती कार्यक्रमासाठी प्रत्येक तालुक्यासाठी एक याप्रमाणे तालुका निहाय पथके तयार करण्यात आली असून, या पथकात प्रत्येकी 5 याप्रमाणे अधिकारी/ कर्मचारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. EVM VVPAT जनजागृती कार्यक्रमासाठी नियुक्त केलेल्या पथकातील अधिकारी/कर्मचारी यांना दिनांक 18 डिसेंबर, 2018 रोजी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, हिंगोली यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे EVM VVPAT चे हाताळणी बाबतचे एक दिवशीय प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षण सत्रात उपस्थित अधिकारी/ कर्मचारी यांना उपजिल्हा निवडणूक अधिकारी गोविंद रणविकर, उपविभागीय अधिकारी प्रविण फुलारी आणि अतुल चोरमारे, यांनी EVM VVPAT जनजागृती मोहिमेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
            भारत निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार आगामी लोकसभा निवडणूक-2019 साठी सर्व मतदान केंद्रावर EVM सोबत VVPAT म्हणजेच मतदार सत्य पान योग्य तपासणी चिठ्ठी मशीनचा वापर करण्यात येणार आहे. ज्याद्वारे मतदाराने नोंदविलेले मत त्याच्या पसंतीच्या योग्य उमेदवारासच नोंदविले गेले आहे याची खात्री पटणार आहे.
 EVM VVPAT मशीन विषयी माहिती देण्यासाठी पथक सर्व मतदान केंद्राचे ठिकाणी येणार आहे. EVM VVPAT जनजागृती पथक आपल्या मतदान केंद्रावर, गावात, परिसरात आल्यावर सर्व नागरीकांनी EVM VVPAT बाबत माहिती घेवून EVM VVPAT यंत्राची हाताळणी (Hands on) मतदान करून बघावे व आपले अभिप्राय पथकासोबतच्या नोंदवहीत लेखी नोंदवावेत असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, हिंगोली यांच्या वतीने करण्यात आले आहे.

****

18 December, 2018

अल्पसंख्यांक हक्क दिन उत्साहात संपन्न









अल्पसंख्यांक हक्क दिन उत्साहात संपन्न

                                                                                   
            हिंगोली,दि.18: संयुक्त राज्य संघटनेने 18 डिसेंबर, 1992 रोजी राष्ट्रीय, वांशिक, धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्यांकांच्या हक्काचा जाहीरनामा स्विकृत करुन प्रस्तृत केला होता. त्याकरीता दरवर्षी 18 डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क दिवस म्हणुन सर्वत्र साजरा केला जातो. तसेच अल्पसंख्यांक समाजास त्यांच्या घटनात्मक आणि कायदेशीर हक्काची जाणीव व माहिती व्हावी याकरीता अल्पसंख्यांक विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांनी देखील 18 डिसेंबर हा दिवस ‘अल्पसंख्यांक हक्क दिवस’ म्हणून आयोजित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
            त्याअनुषंगाने आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात अल्पसंख्यांक हक्क दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड, निवासी उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी, समाज कल्याण सहायक आयुक्त भाऊराव चव्हाण, श्रीमती अनिता सुर्यतळ, नजीर अहेमद शेख, सुरेश सोनी, सिद्दीक अहमद, मंजीतसिंग अलग, शिक्षणाधीकारी इंगोले आणि जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
            अल्पसंख्यांक हक्क दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व आणि भित्तीपत्रीका स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थींनीनचा यावेळी जिल्हाधिकारी जयवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी जयवंशी यांनी अल्पसंख्यांक हक्क दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच जिल्हा नियोजन अधिकारी कुलकर्णी यांनी यावेळी अल्पसंख्यांक समाजसाठी असलेल्या योजनाची माहिती दिली.
            यावेळी जिल्ह्यातील शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनी, शिक्षक, मार्गदर्शक आणि अल्पसंख्यांक समाजातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
****


शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘लोक संवाद’* *प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांशी 1 जानेवारीला संवाद*


वृत्त क्र. 435                                                   दिनांक : 18 डिसेंबर, 2018
शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘लोक संवाद’*
*प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांशी 1 जानेवारीला संवाद*

हिंगोली दि. 18 : शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहोचल्यानंतर त्यातून होणारा लाभ, त्यात येणाऱ्या अडचणी आणि आवश्यक सुधारणा याची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘लोक संवाद’ साधून जाणून घेणार आहेत. त्यासाठी या लाभार्थ्यांशी थेट संवाद साधण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.  1 जानेवारी 2019 रोजी प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री श्री. फडणवीस हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे थेट संवाद साधणार आहेत.

केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची राज्यात यशस्वीपणे अंमलबजावणी सुरु आहे. प्रधानमंत्री आवास योजना (नागरी व ग्रामीण), उन्नत शेती-समृद्ध शेतकरी योजना, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, मागेल त्याला शेततळे, गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार, स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, सूक्ष्म सिंचन आणि मृदा परीक्षण सारख्या योजना अधिक गतीने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध जिल्ह्यांमध्ये आणि मंत्रालयातही या योजनांचा आढावा घेतला आहे. आता या विविध योजनेतील लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री थेट संवाद साधणार असून 1 जानेवारी रोजी प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांशी ‘लोक संवाद’ कार्यक्रमाद्वारे याचा शुभारंभ होणार आहे.

मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद साधण्याची इच्छा असणाऱ्या आणि प्रधानमंत्री आवास योजना व त्यासाठी राज्य शासनाने सुरु केलेल्या इतर पूरक योजना यांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांनी आपले नाव, संपर्क क्रमांक-पत्ता आणि  योजनेचा लाभ घेतल्याची माहिती av.dgipr@maharashtra.gov.in या ईमेलवर आणि 8291528952 या व्हॉटसॲप क्रमांकावर दि. 28 डिसेंबरपर्यंत पाठविण्याचे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने केले आहे.इच्छुक लाभार्थी आपल्या जिल्ह्यातील जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडेही दि. 28 डिसेंबरपर्यंत माहिती पाठवू शकतात.
00000000

17 December, 2018

जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समितीची बैठक संपन्न


जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समितीची बैठक संपन्न

            हिंगोली,दि.17: कौशल्य व उद्योजकता विकास कार्यकारी समिती जिल्हास्तरीय बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज संपन्न झाली. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड, जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी, प्रकल्प संचालक श्री. घुले, आरसेटीचे संचालक श्री. दिक्षीत, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकताचे सहाय्यक संचालिका रेणुका तम्मलवार यांची उपस्थिती होती.
            यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, बेरोजगारीवर मात करण्यासाठी युवकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. औद्योगिक क्षेत्रात ज्या कामासाठी कौशल्याची आवश्यकता आहे. अशा प्रकारच्या कौशल्य प्राप्त कामगार निर्मितीसाठी कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना योग्य ते प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील युवक-युवतींची आवड आणि जिल्ह्यातील रोजगाराच्या संधी उपलब्धतेनुसार प्रशिक्षण शिबीरांचे आयोजन करावे. तसेच व्यावसायीक प्रशिक्षण संस्थानी जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर प्रशिक्षणार्थीना रोजगार उपलब्ध होतील याकरीता प्रयत्न करावे.
            यावेळी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहाय्यक संचालिका रेणुका तम्मलवार यांनी मागील इत्तिवृत्ताचे वाचन करुन कौशल्य विकास व उद्योजकता योजनाची माहिती दिली. तसेच व्यावसायीक प्रशिक्षण संस्थेमार्फत 46 प्रशिक्षण शिबीर सुरु असून, यात 1,380 प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहे. तर आतापर्यंत 69 प्रशिक्षण शिबीर पूर्ण झाले असून, यात 2,027 प्रशिक्षणार्थीचा समावेश होता. यापैकी 866 प्रशिक्षणार्थीना रोजगार प्राप्त झाला असून 22 प्रशिक्षणार्थीनी स्वयंरोजगार सुरु केल्याची माहिती दिली.
            यावेळी विविध विभागाचे अधिकारी, स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनीधी, सदस्य आदी बैठकीस उपस्थित होते.

****