11 December, 2018



गोवर-रुबेला लसीकरणापासून एक ही बालक वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी
                                                                      -- जगदीश मिणियार

        हिंगोली,दि.11 : जिल्ह्यात 27 नोव्हेंबर पासून गोवर-रूबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून, जिल्ह्यातील एक ही बालक या लसीपासून वंचीत राहणार याची आरोग्य आणि शिक्षण विभागानी दक्षता घ्यावी असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिणियार यांनी केले आहे.
            येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजीत गोवर-रुबेला लसीकरण मोहिम आढावा बैठकीत मिणियार बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी, प्र. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मंगेश टेहरे, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. पुरुषोत्तम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. 
            यावेळी मिणियार म्हणाले की, जिल्ह्यातील 9 ते 15 वयोगटातील 3 लाख 18 हजार 230 बालकांना लस देण्याचे उद्दिष्ट असून सुमारे दीड महिना ही मोहीम राबविण्यात येणार आहे. हिंगोली तालूक्यात 78 हजार 830 बालकांना लस देण्याचे उद्दिष्ट होते त्यापैकी 33,350 (42 टक्के) उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. तर औंढा तालूक्यात 47,598 पैकी 19 हजार 404 (41 टक्के), वसमत तालूका 76 हजार 873 पैकी 33,917 (44 टक्के), कळमनुरी 64 हजार 527 पैकी 29 हजार 732 (46 टक्के) आणि सेनगाव 50 हजार 402 पैकी 22,922 (45 टक्के) म्हणजे एकुण 3 लाख 18 हजार 230 पैकी 1 लाख 39 हजार 371 (44 टक्के) बालकांना आजपर्यंत लसीकरण करण्यात आले आहे.
            जिल्ह्यातील सर्व पात्र बालकांना गोवर-रुबेलाचे लसीकरण वेळेत होणे अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय ही लसीकरण मोहिम बंद होणार नाही. सदर मोहिम यशस्वी करण्यासाठी यामध्ये शिक्षण विभागाची महत्वाची भूमिका आहे. त्याकरीता केंद्र प्रमुख आणि तालूका आरोग्य अधिकारी यांनी शाळानिहाय पालक प्रशिक्षण बैठक घेवून या मोहिमेबाबत जनजागृती करुन त्यांच्या शंकाचे निरसन करावे. आता अंगणवाडीतील बालकांना लसीकरणाचे सत्र सुरु होणार असून, त्याकरीता महिला व बालकल्याण विभागाने योग्य नियोजन करुन ही मोहिम यशस्वी करावी.
            गोवर-रुबेला लसीकरण मोहिम ही शासनाची अत्यंत महत्वाची मोहिम आहे. याकरीता शिक्षण आणि आरोग्य विभागाने समन्वयाने काम करुन जिल्ह्यातील एक ही बालक या लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी. विविध उपक्रमांद्वारे जनजागृती करत मोहिम वेळेत यशस्वी करावी असे हि मिणियार यावेळी म्हणाले.
            यावेळी बैठकीस सर्व तालूका आरोग्य अधिकारी, गट शिक्षणाधिकारी आदींची उपस्थिती होती.

*****

No comments: