पंधरा कलमी कार्यक्रमातंर्गत अल्पसंख्यांक
समाज योजनाचा लाभ लाभार्थ्यांना द्या
- हाजी अरफात शेख
हिंगोली,दि.13: अल्पसंख्यांक समाजाच्या
सर्वांगीण विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारमार्फत विविध कल्याणकारी योजना
राबविल्या जातात. या योजनांची लाभार्थ्यांना माहिती देवून पंधरा कलमी
कार्यक्रमातंर्गत अल्पसंख्यांक समाजाच्या योजनाचा लाभ लाभार्थ्याना द्या, असे
निर्देश राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी दिले.
जिल्हाधिकारी
कार्यालयातील डिपीसी सभागृहात अल्पसंख्यांक समाजाच्या पंधरा कलमी कार्यक्रमाचा
आढावा बैठकीत हाजी अरफात शेख बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलिस
अधिक्षक योगेशकुमार, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बनसोडे,
निवासी उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी आणि जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी यांची
प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी
शेख पुढे म्हणाले की, अल्पसंख्यांक समाजाच्या पंधरा कलमी कार्यक्रमातंर्गत केवळ
मुस्लिम समाजाचा समावेश नसून यामध्ये जैन,
शिख, बौध्द, ख्रिश्चन आदी समाज आहे. या सर्व समाजातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी
अल्पसंख्यांक आयोग प्रयत्नशील आहे. राज्य अल्पसंख्यांक आयोगाकडून अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी सर्वोतोपरी
प्रयत्न केले जात असून, या कामात शासन ही पूर्णपणे पाठीशी आहे. राज्य अल्पसंख्यांक आयोगाकडून प्रत्येक जिल्ह्यातील
वक्फ बोर्डासाठी पूर्णवेळ मुख्य कार्यकारी अधिकारीची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे
वक्फ बोर्डाचा कारभार अधिक गतीमान होणार आहे. तसेच जिल्ह्यातील वक्फ बोर्डाच्या जमीनीवर
ज्या ठिकाणी अतीक्रमण झालेले आहे अथवा कोणीही बोर्डाच्या जमीनीच्या अनधीकृत कब्जा घेतला
असेल अशा लोकांवर त्वरीत कठोर कारवाई करावी. अल्पसंख्यांक विभागाच्या विविध योजनांसाठी
जास्तीत जास्त निधी देणे तसेच समाजाच्या सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी आयोगाकडून
राज्यशासनाकडे निधीची मागणी केली आहे. समाजाच्या सर्वांगीण सुधारणेकरीता संबंधीत यंत्रणांनी
त्वरीत शासनाकडे प्रस्ताव सादर करावेत. याकरीता मुख्यमंत्री मदत करण्यासाठी सकारात्मक
असल्याची माहिती श्री. शेख यांनी यावेळी दिली
अल्पसंख्याक मुलींच्या
वसतीगृहाची कामे त्वरित पूर्ण करण्यात यावीत. अल्पसंख्याक हक्क दिन यासारखे विशेष कार्यक्रम
घेण्यात यावेत. जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न
प्रशासनाने सोडवावा. जिल्ह्यातील ऊर्दू शाळांच्या दुरुस्तीसाठी शिक्षण विभागाने
तात्काळ कार्यवाही करावी. उर्दू शाळांमध्ये मराठीचे तज्ज्ञ शिक्षक नेमावेत. अल्पसंख्यांक समाजातील
विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण देण्यासाठी उर्दू शाळेत विषयनिहाय शिक्षणांची
नियुक्ती करणे आवश्यक आहे. जिथे समस्या आहेत त्यांची सोडवणूक करण्यासाठी
निश्चितपणे प्रयत्न केले जातील. हिंगोली जिल्ह्यात एका बालिकेवर अत्याचार झाला
होता, अशा घटनां पुन्हा होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच या घटनेतील दोषींवर
उचित कारवाई करावी असे सांगत अल्पसंख्यांक समाजातील नागरिकांना न्याय मिळवून
देण्याचे काम आयोगामार्फत केले जाईल असे ही श्री. शेख यावेळी म्हणाले.
जिल्हाधिकारी
जयवंशी म्हणाले, जिल्ह्याला
ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे, तो निधी त्याच प्रयोजनासाठी खर्च हाईल
यांची सर्व संबंधीत यंत्रणांनी दक्षता घ्यावी असे जयवंशी यावेळी म्हणाले दिले.
जिल्ह्यातील
अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक संधीत वाढ व्हावी यासाठी उर्दू शाळांमध्ये
अतिरिक्त वर्ग खोल्या, स्वच्छतागृहे करण्याचे आवश्यकत आहे. तसेच घरकुल योजने
अंतर्गत 1 हजार 177 अल्पसंख्यांक समाजातील कुंटूंबाची निवड करण्यात आली आहे. तसेच
42 अंगणवाड्या मंजूर असून त्यापैकी 38 पूर्ण झाल्या असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी
अधिकारी बनसोडे यांनी दिली.
तसेच
हिंगोली आणि वसमत येथे 670.74 लक्ष खर्च करुन अल्पसंख्यांक मुलींचे वसतीगृह बांधण्यात
आले असून त्याचा लाभ विद्यार्थींना होत आहे. तर कळमनुरी येथे 373 लक्ष रुपयांचे
अल्पसंख्यांक मुलींचे वसतीगृह मंजूर असून बांधकाम पुर्ण झाले आहे तर फर्नीचर आणि
विद्युतीकरणाचे कामासाठी निधीची मागणी करण्यात आली आहे. हिंगोली आणि कळमनुरी येथे
762.09 लाख खर्च करुन अल्पसंख्यांक मुलांचे वसतीगृह बांधण्यात आले असून फर्नीचर
आणि विद्युतीकरणाचे काम सुरु असल्याची माहिती कार्यकारी अभियंता श्री. घुबडे यांनी
दिली.
कौशल्य
विकासातून स्वयंरोजगाराच्या दृष्टिने चार मेळाव्याचे उदिष्ट देण्यात आले असून
मेळाव्याचे नियोजन करण्यात आले आहे. कौशल्य विकास कार्यक्रमातंर्गत 02 रोजगार
मेळाव्याचे आयोजन केले असून, उर्वरीत 2 लवकर आयोजन
करण्यात येणार असल्याची माहिती कौशल्य विकास विभागाचे श्री. खंदारे यांनी दिली.
यावेळी आढावा बैठकीला सार्वजनीक
बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. घुबडे, शिक्षणाधिकारी संदिपकुमार
सोनटक्के, हिंगोली
नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील, अग्रणी बँकचे व्यवस्थापक श्री. शांताराम यांच्यासह
विविध विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.
****
No comments:
Post a Comment