25 July, 2019


जिल्हा कृती आराखड्याच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करणार
                                                                                                                                   -रुचेश जयवंशी
                हिंगोली,दि.25: समाजातील दिव्यांग व्यक्तींचे सक्षमीकरण करणे आवश्यक आहे. त्यांचे समान अधिकार व संधी राखून ठेवत विविध कल्याणकारी योजना तयार करणे गरजेचे आहे. याकरीता जिल्हा कृती आराखड्याच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी म्हणाले.
 केंद्र शासनाने दिव्यांग व्यक्तींच्या अधिकाराबाबत केंद्र शासनाच्या वतीने ‘दिव्यांग व्यक्तीचे अधिकार अधिनियम-2016’ हा कायदा पारीत करण्यात आला आहे. नवीन कायद्यानुसार सुधारीत व नविन बाबींचा अधिकाधीक लाभ समाजातील दिव्यांग व्यक्तींना मिळवून देण्याच्या हेतूने जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र, हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात ‘दिव्यांग व्यक्तीच्या पुनर्वसनासाठी जिल्हास्तरीय कृती आराखडा तयार करण्यासाठी आज कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड, अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणियार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उप जिल्हा निवडणुक अधिकारी भाऊसाहेब जाधव, उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, शोधनाचे संचालक सुधीर घोष, सांख्यीक तज्ज्ञ सोनाली मेडीकुंट, संवाद तज्ज्ञ कृपाली बिडवे, जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्राचे प्रकल्प संचालक विजय कान्हेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.    
यावेळी जिल्हाधिकारी जयवंशी म्हणाले की, दिव्यांगासाठी अधिकारिता अधिनियम 2016 ची निर्मिती केली. दिव्यांग व्यक्तींचे जीवन सुसह्य व्हावे याकरीता त्यांना आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी कृती आराखड्याची गरज आहे. या कृती आराखड्या मध्ये, कल्पक उपक्रम व नवे शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू करून नवे टप्पे निर्माण करावेत. आरोग्याविषयक सुविधा, रोजगार व स्वयंरोजगार विषयक उपाययोजना, अडथळा विरहित मुक्त संचार व्यवस्था, सकारात्मक कृती व विधी विषयक उपाययोजना, प्रभावी अंमलबजावणी यंत्रणा, वित्तीय व्यवस्था आदी बाबींचा समावेश असणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले
या वेळी शोधनाचे श्री. घोष यांनी दिव्यांगाना त्यांच्याकडे समाजाचे मुख्‍य घटक म्हणुन पाहिले पाहिजे प्रशासनाने त्यांचे अधिकार त्यांना मिळवून दिले पाहिजे.
तसेच सोनाली मेडीकुंट यांनी दिव्यांगाच्या व्याख्या आणि जिल्ह्याची योजना निहाय सांख्यीकीची माहिती दिली. विजय कान्हेकर यांनी कायद्यातील दिव्यांगाचे अधिकार आणि प्रशासनाची जबाबदारी विषयक माहिती दिली. तर कृपाली बिडवे यांनी संवाद समन्वयातून दिव्यांगाचे पुनर्वसन कसे करता येईल याचे मार्गदर्शन केले.
यावेळी कार्यशाळेमध्ये ‘दिव्यांग व्यक्ती अधिकार  अधिनियम 2016’  या नवीन कायद्याबाबत सवीस्तर माहिती देवून दिव्यांग व्यक्तीची जिवन सुसह्य होवून त्यांना कायद्यानुसार प्राप्त झालेल्या अधिकारान्वये विविध सुविधा व उपाययोजना उपलब्ध करुन देण्यासाठी आजच्या जिल्हास्तरीय कृती आराखडा तयार करण्याच्या कार्यशाळेत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी विविध विभागाचे विभाग प्रमुख यांच्यासह जिल्ह्यातील दिव्यांग क्षेत्रात कार्य करणाऱ्या सामाजिक संस्था, संघटनाचे प्रतिनीधी हे कार्यशाळेत सहभागी झाले होते.
****


No comments: