हिंगोली,दि.12: कोरोना विषाणूचा (कोव्हीड-19) प्रादुर्भाव
रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दिनांक 13 मार्च, 2020 पासून
लागू करून खंड 2,3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. त्याअन्वये
जिल्हाधिकारी यांना सक्षम अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.
त्याअनुषंगाने लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या
नागरिकांना आपल्या मूळ गावी जाण्यासाठी शासनाने कार्यपद्धती विहित केली आहे.
राज्यातील अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या मूळ जिल्ह्यात परिवहन महामंडळाच्या
बसेसद्वारे सोडण्याबाबत निर्णय झाला असून राज्यात अडकलेले हिंगोली जिल्ह्यातील
नागरिक मोठ्या प्रमाणात त्यांच्या मूळ गावी येण्याची शक्यता लक्षात घेता बस
स्थानकावर येणाऱ्या नागरिकांची आर.आर.टी. (RRT) पथकामार्फत तपासणी करण्यासाठी
बसस्थानकावर तहसील कार्यालयाचे व आरोग्य विभागाचे पथक नेमण्यात आले आहे.
त्याअनुषंगाने
जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रुचेश जयवंशी यांनी
प्राप्त अधिकारानुसार बाहेरील राज्यातून तसेच बाहेर जिल्ह्यातून हिंगोली जिल्ह्यात
येणाऱ्या नागरिकांची तपासणी करण्यासाठी बस स्थानकावर एक वैद्यकीय पथक, एक पोलीस
पथक व इतर विभागाचे पथक नियुक्त केले आहेत. सदर पथकांमार्फत बसस्थानकावरच
कोरोनाच्या अनुषंगाने थर्मल गन व इतर वैद्यकीय तपासणी साहित्याच्या माध्यमातून नागरिकांची
तपासणी करण्यात येणार आहे.
या तपासणीमध्ये ज्या नागरिकांमध्ये
कोणत्याही प्रकारचे कोरोना सदृश्य लक्षणे आढळले नाहीत अशांना त्यांच्या घरातच विलगीकरणाचा (Home Quarantine) शिक्का मारण्यात येणार असून
त्यांना घरातच विलगीकरण (Home Quarantine) करून आर.आर.टी. (RRT) पथकामार्फत
वेळोवेळी त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच ज्या व्यक्तीमध्ये कोरोना सदृश्य
लक्षणे आढळतील अशांना लक्षणानुसार CCC,
DCHC, DHC अशा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे.
तसेच याबाबतचा दैनंदिन स्वरूपाचा
अहवाल जसे हिंगोली जिल्ह्यात आलेल्या नागरिकांची प्रवास व इतर संपूर्ण माहिती, घरातच विलगीकरण (Home Quarantine) व CCC,
DCHC, DHC रुग्णालयात दाखल केलेल्या नागरिकांची सविस्तर माहिती
असा दैनंदिन अहवाल पथक प्रमुखयांच्या मार्फत एकत्रित करून उपमुख्य कार्यकारी
अधिकारी (पंचायत), जि.प. हिंगोली व जिल्हा प्रशासन अधिकारी, न.पा.प्र.
हिंगोली यांनी अप्पर जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात येणार आहे.
या आदेशाची अवज्ञा करणाऱ्या,
निष्काळजी करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये
शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे असे मानण्यात येईल. तसेच आपत्ती व्यवस्थापन
कायदा 2005, साथरोग प्रतिबंध कायदा 1897, महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020
अंतर्गत संबंधितावर कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी रुचेश
जयवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
****
No comments:
Post a Comment