इसापूर धरणातून रब्बी व उन्हाळी हंगाम पाणी मागणीचे अर्ज
31 ऑक्टोबर पूर्वी सादर करावेत
हिंगोली
(जिमाका), दि. 04 : इसापूर धरणाचे मंजूर जलाशय प्रचालन आराखड्यानुसार ऑक्टोबर अखेर
धरणाची पाणीपातळी 441 मी (100 टक्के) ठेवण्याचे निर्धारित आहे. धरणात दि. 15
ऑक्टोबर, 2022 रोजी शंभर टक्के पाणी साठा होणार असून उपलब्ध पाणीसाठ्याच्या
अनुषंगाने उर्ध्व पेनगंगा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात रब्बी व उन्हाळी हंगाम पूर्ण
क्षमतेने राबविण्याचे नियोजन आहे. या नियोजनास कालवा सल्लागार समितीच्या होणाऱ्या
बैठकीत मंजुरी मिळाल्यानंतर त्याप्रमाणे पुढील पाणीपाळी सोडण्याची कार्यवाही
करण्यात येणार आहे.
त्यानुषंगाने रब्बी हंगामी, दुहंगामी व इतर बारमाही पिकांसाठी
कालव्याचे प्रवाही, मंजूर उपसा, मंजूर जलाशय उपसा व मंजूर नदी/नाले उपसा
सिंचनासाठी ज्यांना पाणी घ्यावयाचे आहे त्यांनी आपले पाणी मागणी अर्ज विहित
नमुन्यात दि. 31 ऑक्टोबर, 2022 पूर्वी संबंधित शाखा कार्यालयात माहिती भरुन सादर
करावेत. उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या (इसापूर धरणाच्या) लाभक्षेत्रांतर्गत नांदेड,
हिंगोली व यवतमाळ जिल्ह्यातील सर्व संबंधित लाभधारकांनी हंगाम सुरु होण्यापूर्वी
खालील अटी व शर्तींची पूर्तता करावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता, उर्ध्व पेनगंगा
प्रकल्प विभाग क्र. 1, नांदेड यांनी केले आहे.
पिकांचे मागणी क्षेत्र 20 आरच्या पटीत असावे. कालवा संचलन
कार्यक्रमानुसारच पाणी घेणे बंधनकारक राहील. पाणीपट्टी न भरणाऱ्या व पाणी अर्ज
नामंजूर असलेल्या लाभधारकास सिंचनासाठी पाणी देणे या कार्यालयास बंधनकारक राहणार
नाही. काही अपरिहार्य कारणास्तव किंवा तांत्रिक कारणास्तव पाणी पुरवठा करणे शक्य न
झाल्यास होणाऱ्या नुकसानीस हे कार्यालय जबाबदार राहणार नाही. लाभधारकांनी दिवस व
रात्रीच्या वेळेस पाणी घेणे बंधनकारक आहे. रात्रीच्या वेळेस पाणी न घेतल्यामुळे
पाणी नदीनाल्यास वाया जावून ठराविक मुदतीत पाणी न मिळाल्यास या कार्यालयाची
जबाबदारी राहणार नाही.
सन 2022-23 च्या शासन निर्णयातील प्रचलित दरानुसार पाणीपट्टीचे दर
आकारण्यात येतील. थकित व चालू पाणीपट्टी वेळेत भरुन सहकार्य करावे. शेतचारी स्वच्छ
व दुरुस्त ठेवण्याची जबाबदारी संबंधित लाभधारकांची राहील. उडाप्याच्या / अंतिम
क्षेत्रास पाणी पुरवठा करणे बंधनकारक राहणार नाही. पाणी पाळी सुरु असताना
जबरदस्तीने अथवा विनापरवानगी विद्युत मोटारी, ट्रॅक्टर द्वारे पाणी उपसा करणे अथवा
गेट उघडल्यास नियमानुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. जे लाभक्षेत्र पाणी
वापर संस्थेस हस्तांतरीत करण्यात आले आहे त्या लाभक्षेत्रावर नियमानुसार पाणी
मागणी, वसुली आणि सिंचनाचे नियंत्रण पाणी वापर संस्थेने करावे अन्यथा पाणी पुरवठा
केला जाणार नाही. त्यामुळे सर्व जनतेनी वरील सुचनांचे पालन करावेत, असे आवाहन कार्यकारी
अभियंता, उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1, नांदेड यांनी केले आहे.
*******
No comments:
Post a Comment