17 October, 2022

 

हिंगोलीमध्ये स्टार्टअप यात्रा सादरीकरण सत्र तसेच रोजगार मेळावा संपन्न

 




हिंगोली (जिमाका), दि. 17 : महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी मार्फत स्टार्टअप यात्रा सादरीकरण सत्र तसेच जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व मोजेक प्रधानमंत्री कौशल केंद्र, हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 14 ऑक्टोबर, 2022 रोजी मोजेक प्रधानमंत्री कौशल केंद्र, अकोला रोड, बळसोंड येथे पंडीत दीनदयाल रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार तानाजी मुटकुळे व जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बळसोंड ग्रामपंचायतचे उपसरपंच पप्पुभैय्या चव्हाण, डॉ. रा.म. कोल्हे सहायक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, प्रधानमंत्री कौशल केंद्राचे रुपेश डाखोरे (स्टेट सिनीयर ऑपरेशन मॅनेजर मोजेक वर्क्स स्किल्स), औद्योगिक संघटना हिंगोलीचे सचिव प्रविणजी सोनी आदींची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सहायक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता डॉ. रा.म. कोल्हे यांनी मान्यवर व उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर मान्यवरांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी व आमदार महोदयांनी नोंदणीकृत सहभागीच्या सादरीकरणास भेट देऊन स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रा सादरीकरण सत्रामध्ये हिंगोली जिल्ह्यातून एकूण 15 उमेदवारांनी या स्पर्धेसाठी ऑनलाईन नोंदणी केली होती. त्यापैकी 8 नोंदणी केलेल्या स्पर्धकांनी विविध क्षेत्रातील परिक्षकांसमोर आपल्या नाविन्यपूर्ण कल्पना व उद्योगांचे सादरीकरण केले. यापैकी परिक्षकामार्फत उत्कृष्ट 3 सादरीकरणांची निवड करण्यात आली. यामध्ये प्रथम क्रमांक अरविंद चित्तेवार आणि पुष्यमित्र जोशी, द्वितीय क्रमांक पुष्यमित्र जोशी तर तृतीय क्रमांक केयूर परतवार यांना प्राप्त झाला. या सर्व विजेत्यांना जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

त्याचबरोबर जिल्ह्यातील उमेदवारांना विविध क्षेत्रामध्ये निर्माण होत असलेल्या रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने या सादरीकरण सत्रासोबतच रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या रोजगार मेळाव्यामध्ये विविध कंपन्यामध्ये जवळपास 300 उमेदवारांनी मुलाखती दिल्या. त्यापैकी 153 उमेदवारांची प्राथमिक निवडही करण्यात आली. या कार्यक्रमासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे कर्मचारी तसेच मोजेक प्रधानमंत्री कौशल्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

*****  

No comments: