04 July, 2024

आकांक्षीत हिंगोली तालुक्याची ओळख पुसण्यासाठी ऑगस्टअखेर 100 टक्के कामे पूर्ण करण्याचे प्रशासनाचे नियोजन- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

हिंगोली (जिमाका), दि. 04 : आकांक्षीत तालुका विकसनाच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने केंद्राच्या निती आयोगाच्या माध्यमातून सुरु होत असलेल्या संपूर्णता अभियानाची सुरुवात आज जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली आहे. त्यामुळे निती आयोगाच्या सूचनेप्रमाणे सहा विषयावर सुरुवातीला कामकाज करण्यात येणार असून, आकांक्षीत हिंगोली तालुक्याची ओळख पुसण्यासाठी ऑगस्टअखेर 100 टक्के कामे पूर्ण करण्याचे जिल्हा प्रशासनाचे नियोजन असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथे केले. निती आयोगामार्फत आकांक्षीत ब्लॉक, आकांक्षीत जिल्हा कार्यक्रम अंतर्गत दि. 4 जुलै ते दि. 30 सप्टेंबर, 2024 या कालावधीत संपूर्णता अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचे उद्घाटन आज येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, निती आयोगाचे अधिकारी आर. एन. मुंडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके, मिराताई कदम आदी उपस्थित होते. या अभियानामध्ये आरोग्य आणि पोषण, शिक्षण, कृषि व इतर सेवा, पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकास या क्षेत्राचा समावेश आहे. निती आयोगामार्फत आकांक्षीत तालुका, आकांक्षीत जिल्हा कार्यक्रम अंतर्गत दि. 4 जुलै ते दि. 30 सप्टेंबर, 2024 या कालावधीत संपूर्णता अभियान राबविण्यात येत आहे. या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये कार्यक्रमाचा कृति आराखडा तयार करणे, कार्यक्रमाची जनजागृती करणे, प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे आणि क्षेत्रीय स्तरावर संनियंत्रण करणे असा कालबद्ध कार्यक्रम आहे. हे संपूर्णता अभियान हे 30 सप्टेंबरपर्यंत राबविण्यात येणार असले तरीही हे काम ऑगस्ट महिन्यापर्यंतच शंभर टक्के पूर्ण करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले असल्याचे त्यांनी सांगितले. उद्या सर्व गावांमध्ये प्रभातफेरी काढण्यात येणार आहे. ग्रामपातळीवरच्या ग्रामसभा व तालुका पातळीवरच्या बैठका घेऊन निती आयोगाने निश्चित करुन दिलेल्या नियोजनानुसार हिंगोली तालुक्याचे मागासलेपण दूर करावयाचे आहे. यासाठी ग्रामपंचायतचे सरंपच, ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी ताई, आशाताई आदींना या अभियानात सहभागी करुन घेण्यात येत आहे. निती आयोगाच्या प्रकल्पाची अंमलबजावणी झालेल्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी करणार आहेत. आकांक्षीत तालुका जिल्हा संपूर्ण अभियानाची सर्व सरपंचांनी आवश्यक ती प्रचार प्रसिद्धी गावपातळीवर करुन महिलाची शंभर टक्के नोंदणी करावी, अशा सूचनाही श्री. पापळकर यांनी यावेळी दिल्या. मागास भागाचा विकास करण्यासाठी प्रधान मंत्री यांनी निती आयोगामार्फत आकांक्षीत तालुक्याचा कार्यक्रम तयार केला आहे. राज्यातील 27 तालुक्याचा आकाक्षींत तालुका अंतर्गत समावेश असून यामध्ये हिंगोली तालुक्याचा समावेश आहे. हिंगोली तालुक्याची आकांक्षीत तालुका म्हणून असलेली ओळख पुसण्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन विकास कामे करण्यासाठी ग्रामपातळीवरील सरपंच, अधिकारी यांनी पूर्णपणे सहयोग दिला पाहिजे. दोन तालुका, जिल्ह्यामध्ये विकासाची स्पर्धा लावली तर आपला जिल्हा, तालुका विकासामध्ये पुढे जाण्यास मदत होणार आहे. संपूर्णता अभियान हा निती आयोगाच्या आकांक्षित तालुका अंतर्गत सुरु केलेला कार्यक्रम आहे. प्रत्येक तालुक्यात आरोग्य आणि पोषण, शिक्षण, कृषि व इतर सेवा, पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकास या सहा निर्देशांकावर कामकाज करण्यात येणार आहे. हिंगोली तालुक्यामध्ये ग्रामपातळीवरील उत्साह व अधिकाऱ्यांचा सहभाग यामुळे हिंगोली तालुक्याने हे संपूर्णता अभियान राबवून दोन महिन्यात उद्दिष्ट पूर्ण करीत यशस्वी होईल, असा विश्वास निती आयोगाचे समन्वय अधिकारी आर. एन. मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी कार्यक्रमापैकी आकांक्षित तालुका कार्यक्रम हा एक आहे. आंकाक्षित तालुका कार्यक्रमाची घोषणा प्रधानमंत्र्यांनी जानेवारी -2023 मध्ये केली. या घोषणेनुसार निती आयोगाने संपूर्ण भारतातून 500 तालुक्याची एकूण 40 निर्देशकाच्या आधारावर निवड केली आहे. महाराष्ट्रातून एकूण 27 तालुके आहेत तर आपल्या जिल्ह्यातून हिंगोली हा आकांक्षित तालुका म्हणून घोषित केला आहे. आपण आकांक्षित तालुक्यात येणे ही निश्चितच आनंदाची बाब नसून आपण निती आयोगाच्या 40 निर्देशकामध्ये मागासलेले असल्यामूळे आपल्या तालूक्याची निवड करण्यात आलेली आहे. उपरोक्त निर्देशकामध्ये आपणास युद्धपातळीवर काम करून सुधारणा करावयाची आहे. यासाठी निती आयोगाने आपणास प्रथमत: सहा निर्देशकामध्ये अग्रक्रमाने काम करून येणाऱ्या तीन महिन्याच्या कालावधीत अमुलाग्र बदल करण्यासाठी निर्देशित केलेले आहे. या सहा निर्देशकामध्ये बदल करण्यासाठी पुढील तीन महिन्यात राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. हा कार्यक्रम पाच थिम्सवर राबविण्यात येणार आहे. या तीन महिन्याच्या कालावधीत या सहा निर्देशकामध्ये तर सुधारणा निश्चितपणे करू आणि येणाऱ्या काळात हिंगोली तालुका हा Aspirational to Inspirational तर झालेला असेलच पण त्यापुढे जाउन Inspirational to Ideal करण्याचा आम्ही प्रयत्न करणार असल्याचे प्रास्ताविकात जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव यांनी सांगितले. या कार्यक्रमास हिंगोली जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी, कर्मचारी, तालुक्याचे सर्व अधिकारी, ग्रामपातळीवरील सरपंच, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशाताई, बचत गटाच्या महिला आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. *******

No comments: