05 July, 2024
जिल्ह्यात ‘स्टॉप डायरिया अभियान’ ग्रामीण भागात 31 ऑगस्टपर्यंत अभियान, विविध उपक्रम राबविणार
हिंगोली (जिमाका), दि. 05 : पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे आजार होतात. ग्रामपंचायतीमध्ये शुद्ध पाणी पिल्यामुळे जलजन्य आजार होणार नाहीत. जलजन्य आजार रोखण्याबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी जिल्ह्यात 1 जुलै ते 31 ऑगस्ट या दरम्यान स्टॉप डायरिया अभियान राबविण्यात येणार आहे.
हे अभियान जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, महिला व बालकल्याण विभाग, शिक्षण विभाग व ग्रामपंचायत विभाग आदीच्या संयुक्त विद्यामाने राबविण्यात येणार आहे. या अभियानामध्ये गावातील अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्र, सरकारी कार्यालय व प्राथमिक शाळा या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता राहील यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे.
पावसाळ्यामध्ये दूषित पाणी पिऊन डायरिया, गॅस्ट्रो व कावीळ यासारखे अनेक आजार होत असतात. त्यामुळे पिण्याचे पाणी निर्जंतुक करुन पिण्यासाठी वापरल्यास या आजारांना दूर ठेवता येते. यासाठी गावस्तरावर विविध उपक्रम घेऊन लोकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्हा व तालुका पातळीवर सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग राहणार आहे.
या अभियानामध्ये मुख्यतः पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन व त्यांची योग्य हाताळणी, स्वच्छता, जनजागृती कार्यक्रम, पाणी गळतीच्या जागा शोधून त्यांची दुरुस्ती करणे, पाणी तपासणीबाबत गावपातळीवर पोस्टर्स बॅनर लावणे, स्वच्छता चावडी सुरू करणे, स्वच्छता जागृती कार्यक्रम घेणे, घरोघरी भेटी देऊन कचऱ्याचे वर्गीकरण करण्यास प्रोत्साहन देणे, अंगणवाड्यामध्ये माता व किशोरवयीन मुलींची स्वच्छता, आरोग्य इत्यादी विषयावर मार्गदर्शन करणे, शालेय स्तरावर अतिसाराचा सामना करण्यासाठी चित्रकला, निबंध लेखन, सुरक्षित पाण्याचा वापर या विषयावर आयोजन करण्यात येणार आहे. तसेच पाणीपुरवठा योजनेतील पाणी गळती शोधून त्याची दुरुस्ती करणे. पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता, घरगुती स्तरावरील पाणी साठवणीच्या टाक्यांची स्वच्छता, पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे स्वच्छता ठेवणे, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता आदी उपक्रम राबविले जाणार आहेत.
या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी या उद्देशाने सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांनी दिले आहेत.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment