08 July, 2024
खरीपासाठी 15 जुलैपर्यंत पीक विमा काढण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 08 : प्रधानमंत्री पिक विमा योजनेत शेतकऱ्यांना एक रुपया विमा हप्ता भरून सहभागी करून घेण्याचा निर्णय राज्य शासनाने 2023 मध्ये घेतला असून, या खरीपातील पिकासाठी या योजनेचा लाभ घेण्यासाठी १५ जुलै ही अंतिम मुदत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतक-यांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विविध नैसर्गिक आपत्तींमुळे पिकाच्या होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यास आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना राबविण्यात येत आहे. खरीप-2024 हंगामात पेरण्या सुरु झाल्या असून शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी केंद्र शासनाचे पिक विमा पोर्टल (www.pmfby.gov.in) सुरु करण्यात आले आहे.
विमा अर्ज भरण्यासाठी केंद्र शासनातर्फे AIDE App शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. यासाठी HDFC ERGO विमा कंपनी मार्फत Zoom Insurance Brokers Pvt. Ltd. या संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे. संस्थेमार्फत गावागावात कार्यशाळा आयोजित करुन नेमून दिलेले प्रतिनिधी शेतकऱ्यांचे विमे AIDE App मार्फत जागेवर करतील शेतकऱ्यांना इतरत्र कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. प्रतिनिधींची नेमणूक देखील करण्यात आली आहे. यासाठी फक्त प्रती अर्ज एक रुपयाप्रमाणे रक्कम देऊन अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.
बाहेरच्या चुकीच्या अफवेला बळी न पडता नेमून दिलेल्या प्रतिनिधींकडून विमा काढून घ्यावा. अधिक माहितीसाठी Zoom Insurance Brokers Pvt. Ltd. चे जिल्हा प्रतिनिधी गजानन सावळे (8766834354) यांच्याशी संपर्क साधावा.
अर्ज करण्यासाठी आधार क्रमांक आवश्यक आहे. पिक विम्यातील अर्ज हा आधारवरील नावाप्रमाणेच असावा.
पिक विम्यातील नुकसान भरपाई ही केंद्र शासनाच्या विमा पोर्टलद्वारे आधार संलग्न बँक खात्यामध्ये करण्यात येते. यासाठी आपले बँक खाते आधार संलग्न पेमेंट मिळण्यासाठी अधिकृत असणे आवश्यक आहे. याकरिता आपला बँक मॅनेजर माहिती देऊ शकतो. क्षेत्रावर लागवड केलेल्या पिकाचाच पिक विमा उतरवून घ्यावा व तसेच पिक पेराचे स्वयं घोषणापत्र शेतकऱ्यांकडून भरुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले.
सर्व शेतकऱ्यांनी अंतिम दिनांकाची वाट न पाहता आपल्या पिकांचा पिक विमा उतरवून घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी केंद्र शासनाचे कृषि रक्षक पोर्टल हेल्पलाईन 14447 वर संबंधित विमा कंपनी, स्थानिक कृषि विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा.
शेतकऱ्यांनी अधिसूचित पिकांची माहिती घेऊन विहीत मुदतीमध्ये नजीकच्या तालुका प्रतिनिधींशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. कदम यांनी केले आहे.
**
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment