22 July, 2024

बालविवाह निर्मूलन चॅम्पियन्ससाठी दोन दिवशीय प्रशिक्षण, बालविवाह निर्मूलनासाठी चॅम्पियन्सनी विशेष लक्ष घालून महिलांचे मन परिवर्तन करावे - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

हिंगोली (जिमाका), दि. 22 : बालविवाह निर्मूलन जिल्हा कृती आराखडा अंमलबजावणीसाठी चॅम्पियन्सनी विशेष लक्ष घालून उमेद अभियानाच्या माध्यमातून जास्तीत-जास्त महिलांपर्यंत पोहचून महिलांचे मन परिवर्तन करण्याचे काम करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी केले. बालविवाहाच्या बाबतीत हिंगोली जिल्हा पाचव्या क्रमांकावर असून, जिल्ह्यात बालविवाह निर्मूलनासाठी महिला व बालविकास विभाग, युनिसेफ, एसबीसी३ व जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. याच उपक्रमाच्या माध्यमातून आज सोमवारी बालविवाह निर्मूलन चॅम्पियन्ससाठी दोन दिवशीय प्रशिक्षणास सुरुवात झाली आहे. या प्रशिक्षणाचे उद्घाटन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिक्षणाधिकारी (मा.) प्रशांत दिग्रसकर, उपशिक्षणाधिकारी नितीन नेटके, युनिसेफच्या राज्य समन्वयक सरिता शंकरन, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राजाभाऊ मगर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, साधन व्यक्ती युनिसेफ, एसबीसी३चे पथकप्रमुख नंदू जाधव, वरिष्ठ प्रकल्प समन्वयक कृपाली बढिये, वरिष्ठ प्रकल्प समन्वयक विकास कांबळे, प्रकल्प समन्वयक मोनाली धुर्वे, वरिष्ठ कम्युनिकेशन ऑफिसर रुचिका अहिरे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना जिल्हाधिकारी श्री. पापळकर म्हणाले, बालविवाह निर्मूलन जिल्हा कृती आराखडा अंमलबजावणीसाठी चॅम्पियन्सनी विशेष लक्ष घालून उमेद अभियानाच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहचावे. त्यांचे मन परिवर्तन करून बालविवाह विरोधी कठोर भूमिका घेण्यासाठी महिलांना तयार करावे. प्रत्येक गावातील मुलींचे शिक्षणाचे प्रमाण वाढवावे. सर्व विभागाच्या योजना गावातील गरजू कुटुंबांपर्यंत पोहचवून त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्याकडे लक्ष द्यावे. ग्राम पातळीवर कार्यरत कर्मचाऱ्यांकडून नियमित कामाचा पाठपुरावा करावा. तसेच एखाद्या गावात बालविवाह होत असल्यास संबंधित कुटुंबाचे समुपदेशन करावे व समुपदेशन करून जर कुणी ऐकत नसेल तर अशा बालविवाहाची माहिती जिल्हा प्रशासनास द्यावी, त्यावर जिल्हा प्रशासनाकडून कारवाई करण्यात येईल, असे सांगून प्रशिक्षणास शुभेच्छा दिल्या. या प्रशिक्षणासाठी पंचायत विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, महिला व बाल कल्याण विभाग (जि.प), महिला व बाल विकास विभाग, उमेद अभियान इत्यादी विभागातून तालुकास्तरीय चॅम्पियन्स नियुक्त केले आहे. या चॅम्पियन्स नियुक्तीस जिल्हाधिकारी यांनी मंजुरी दिली असून सदर चॅम्पियन्स प्रशिक्षण घेऊन बालविवाह निर्मूलन जिल्हा कृती अंमलबजावणीसाठी तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. ******

No comments: