08 July, 2024
कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करण्यासाठी जिल्ह्यात जनजागृती मोहीम - मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांची माहिती
• अभियान कालावधी 7 ऑगस्ट 2024
• स्वच्छतेचे दोन रंग- ओला हिरवा, सुका निळा जागृतीसाठी गृहभेटी
हिंगोली (जिमाका), दि. 08 : ग्रामीण भागातील व घरातील ओला आणि सुका कचरा योग्य प्रकारे वर्गीकृत करण्यासाठी जिल्ह्यात आजपासून विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांनी दिली आहे.
आजपासून 7 ऑगस्ट 2024 या कालावधीत विशेष मोहिम राबविण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रत्येक गावात स्व्च्छतेचे दोन रंग- ओला हिरवा, सुका निळा या नावाने अभियान राबविण्यात येणार आहे.
स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा-2 अंतर्गत माहे डिसेंबर 2024 पर्यंत हागणदारीमुक्त अधिक मॉडेल करावयाचे आहे. मॉडेल झालेल्या गावात दृष्यमान शाश्वत स्वच्छता ठेवणे आणि हागणदारीमुक्त अधिक झालेली गावे मॉडेल करणे यासाठी विविध विषयाच्या अनुषंगाने गृहभेटीच्या माध्यमातून जनजागृतीसाठी विशेष अभियानाचे आयोजन करण्याात आले आहे. प्रत्येक गावात 5 संवादकाची निवड करण्यात करण्यात आली असून हे संवादक प्रत्येकाच्या घरी जावून संदेश देणार आहेत. यात सरपंच, उपसरंपच, ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती, ग्रामसेवक, आशावर्कर, अंगणवाडी सेविका, स्वच्छतागृह व बचत गटातील महिला सदस्यांचा समावेश आहे.
ओला कचरा हिरव्या रंगाच्या डब्यात ठेवावा. तसेच सुका कचरा निळ्या रंगाच्या डब्यात ठेवण्यासंदर्भात तसेच नियमित शौचालयाचा वापर करणे, शास्त्रयुक्त पध्दतीने घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, गोबरधन, प्लास्टिक व्यवस्थापन, सुयोग्य मैला गाळ व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालय आणि नियमित वापराबाबत गृहभेटीतून माहिती देण्यात येणार आहे. भेटी दरम्यान शासनाच्याच गुगल लिंकव्दारे त्या कुटुंबाची फोटोसह माहिती भरण्यात येणार आहे.
सर्व गट विकास अधिकारी यांनी आपल्या तालुक्याातील गावांचे प्रती कुटूंब पाच याप्रमाणे संवादक तयार करुन गृहभेटीचे आयोजन करावे. या कामी तालुक्याातील सर्व अधिकारी, विस्तार अधिकारी यांनी संनियंत्रण करुन अंमलबजावणी करावी. दर आठवड्याला या अभियानाचा जिल्हा स्तरावरुन आढावा घेण्यात येईल. तसेच दिनांक 8 जुलै ते 7 ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणाऱ्या ओला व सुका कचरा व्यवस्थापनासाठी ग्रामस्थांनी सक्रीय सहभाग द्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे प्रकल्प संचालक तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) संजय कुलकर्णी यांनी केले आहे.
**
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment