22 July, 2024

लेक लाडकी आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीसाठी लागणारे खाते उघडा आता पोस्टातही….

हिंगोली (जिमाका), दि. 22 : राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागातर्फे लेक लाडकी योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजना सुरु करण्यात आल्या असून लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारे बँक खाते जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये बचत खाते उघडावे, असे आवाहन परभणी डाक विभागाचे डाक अधीक्षक मोहम्मद खदीर यांनी केले आहे. या दोन्ही योजनांचा लाभ मिळण्याची कार्यपद्धती शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येत असून आर्थिक लाभ DBT (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर) पद्धतीने देण्यात येणार आहे. यासाठी बचत खाते उघडणे आवश्यक असून ते जवळच्या गाव, खेड्यातील कोणत्याही पोस्ट ऑफिस मध्ये उघडता येईल. लेक लाडकी योजनेमध्ये लाभार्थी मुलींच्या खात्यामध्ये निर्देशित केलेल्या टप्प्या-टप्प्याने वयाच्या 18 वर्षापर्यंत एकूण 1 लाख 1 हजार इतकी रक्कम जमा होणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजने अंतर्गत तिच्या स्वतःच्या बचत खात्यात दर महिन्याला 1 हजार 500 रुपये इतकी रक्कम जमा करण्यात येणार आहे. लेक लाडकी योजनेसाठी आवश्यक असणारे खाते पोस्ट ऑफिसमध्ये काढण्यासाठी मुलीच्या जन्माचा दाखला, मुलीचे आधार कार्ड, आईचे पॅन कार्ड (सध्या पॅन कार्ड नसल्यास फॉर्म 60), आईचे आधार कार्ड आणि मुलगी व आई यांचा संयुक्त फोटो इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक असणारे खाते पोस्ट ऑफिस मध्ये उघडण्यासाठी महिलेचे पॅन कार्ड (सध्या पॅन कार्ड नसल्यास फॉर्म 60), आधार कार्ड, 2 फोटो आवश्यक आहेत. परभणी डाक विभागांतर्गत येणाऱ्या 388 पोस्ट ऑफिसेसमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. वरील योजनेंतर्गत खात्यांवर वेळोवेळी जमा झालेली रक्कम काढण्यासाठी बाहेरगावी जाण्याचा त्रास तसेच गैरसोय टाळण्यासाठी आपल्याच गावातील पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते काढावे, असे आवाहन मोहम्मद खदीर, अधीक्षक डाकघर, परभणी यांनी केले आहे. ****

No comments: