25 July, 2024

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा सुशिक्षित बेरोजगार युवकांनी संकेतस्थळावर नोंदणी करुन लाभ घ्यावा

हिंगोली (जिमाका), दि. 25 : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून रोजगार इच्छूक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करुन देणारे उद्योजक जोडले जाणार आहेत. सुशिक्षित बेरोजगार युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन 2024-25 या आर्थिक वर्षापासून सुरु करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या खाजगी आस्थापना, उद्योजक एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या 10 टक्के व सेवा क्षेत्रासाठी 20 टक्के शासकीय, निमशासकीय आस्थापना, उद्योग, महामंडळ यांच्या आस्थापनेवरील मंजूर पदाच्या 5 टक्के इतके उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेता येतील. या योजनेंतर्गत 18 ते 35 वयोगटातील कोणताही सुशिक्षित बेरोजगार उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी अर्ज करु शकतो. कार्य प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे शासनामार्फत बारावी पास शैक्षणिक अर्हता असलेल्या उमेदवारांना प्रतिमाह 6 हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे. आयटीआय, पदविका शैक्षणिक अर्हता असलेल्या उमेदवारांना 8 हजार रुपये, पदवीधर, पदव्युत्तर शैक्षणिक अर्हता असलेल्या उमेदवारांना 10 हजार रुपये प्रतिमाह विद्यावेतन लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात (DBT) जमा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व सुशिक्षित बेरोजगार युवकांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करुन लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी वि. प्र. रांगणे यांनी केले आहे. *******

No comments: