29 July, 2024
जिल्ह्यात 1 ऑगस्ट पासून महसूल सप्ताहाला सुरुवात
• महसूल सप्ताहामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन
• सर्व संबंधित विभागाने आपल्या विभागाशी संबंधित जबाबदारी पार पाडावी
हिंगोली (जिमाका), दि. 29 : महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजना याबाबत जिल्ह्यातील नागरिकांना अधिकाधिक माहिती प्राप्त होऊन त्यांना योग्य लाभ घेता यावा. तसेच त्याबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढावी, शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृध्दींगत व्हावा यासाठी विशेष मोहिम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने दि. 1 ऑगस्ट महसूल दिनापासून महसूल सप्ताहाला सुरुवात होणार आहे. या महसूल सप्ताहात शासनाने दिलेल्या निर्देशानुसार तालुकास्तरावर विविध उपक्रमाचे प्रत्येक आयोजन करावेत. यासाठी सर्व संबंधित विभागाने आपल्या विभागाशी संबंधित जबाबदारी पार पाडावी व महसूल सप्ताह यशस्वी करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आयोजित बैठकीत दिले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली महसूल सप्ताहानिमित्त सर्व संबंधित विभागाची आढावा बैठक आज आयोजित केली होती. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, उपजिल्हाधिकारी समाधान घुटुकडे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी राजाभाऊ मगर, तहसीलदार नवनाथ वगवाड यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
या महसूल सप्ताहामध्ये प्रत्येक दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तालुकास्तरावर समाजाच्या विविध घटकातील नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
यामध्ये 1 ऑगस्टला शुभारंभ सप्ताह कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, 2 ऑगस्टला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, 3 ऑगस्टला मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, 4 ऑगस्टला स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय, 5 ऑगस्टला सैनिक हो तुमच्यासाठी, 6 ऑगस्ट ला एक हात मदतीचा दिव्यांगाच्या कल्याणाचा, तर 7 ऑगस्ट रोजी महसूल संवर्गातील कार्यरत सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संवाद, उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी पुरस्कार वितरण व महसूल सप्ताह सांगता समारंभाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमात तालुकास्तरावर लाभार्थ्यांना संबंधित योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्राचे वितरण करण्यात येणार आहे.
या व्यतिरिक्त शासन व सामान्य नागरिक यांना जोडणाऱ्या अनेक कार्यक्रमांचे आयोजन या सप्ताहामध्ये करण्यात येणार आहे. यामध्ये महसूल विभागाच्या व सर्व संबंधित विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या सप्ताहात सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी यावेळी केले .
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment