12 July, 2024
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना देण्यासाठी योग्य नियोजन करा - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
हिंगोली (जिमाका), दि. 12 : राज्यातील मुली व महिलांसाठी सुरु करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण’ या महत्वाकांक्षी योजनेसाठी अर्ज भरण्याची मुदत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच 31 ऑगस्टपर्यंत अर्ज केलेल्या लाभार्थ्यांनाही 1 जुलै 2024 पासूनच लाभाची दरमहा 1 हजार 500 रुपये रक्कम दिली जाणार आहे. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचा हिंगोली जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.
आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य सचिव यांच्या ऑनलाईन बैठकीनंतर आढावा बैठक घेण्यात आली. त्याअनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची कार्यवाही करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना केल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, गणेश वाघ, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलाश शेळके, मुख्याधिकारी अरविंद मुंढे, नगर पालिका प्रशासनाचे सहायक आयुक्त अनंत जवादवार आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. पापळकर म्हणाले, शहरी भागात प्रभानिहाय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करुन पात्र महिलांचे ऑफलाईन अर्ज जमा करण्याची कार्यवाही करावी. तसेच ग्रामीण भागातही कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करुन ऑफलाईन अर्ज जमा करण्याची कार्यवाही करावी. ग्रामस्तर, तालुका, जिल्हास्तरावर समितीची स्थापना करावी. शहरी व ग्रामीण भागात जमा झालेले अर्ज जमा करण्यासाठी जबाबदारी सोपवावी. प्राप्त अर्जाची छाननी करुन पात्र लाभार्थ्यांची यादी नगरपालिका व ग्रामपंचायतीमध्ये लावावी. सदर यादीबाबत हरकती मागवावेत. दररोज जमा झालेल्या अर्जाची माहिती संकलीत करुन माझ्याकडे सादर करावी. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करुन जनजागृती करावी. जिल्ह्यात या योजनेच्या माहितीचे प्रमुख ठिकाणी फ्लेक्स लावावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी दिल्या.
***
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment