31 July, 2024
जिल्ह्यात आजपासून महसूल पंधरवाड्याला सुरुवात • महसूल पंधरवाड्यामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन
हिंगोली (जिमाका),दि.31 : महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजना याबाबत जिल्ह्यातील नागरिकांना अधिकाधिक माहिती प्राप्त होऊन त्यांना योग्य लाभ घेता यावा. तसेच त्याबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढावी, शासन आणि त्याच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृद्धींगत व्हावा. त्यासाठी विशेष मोहीम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने व गतवर्षी महसूल सप्ताहादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रम आणि शिबिरांना प्राप्त होणारा प्रतिसाद आणि कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन विचारात घेऊन शासनाने यावर्षी दि. 1 ऑगस्ट महसूल दिनापासून महसूल पंधरवाड्याला सुरुवात केली आहे. या महसूल पंधरवाड्यात शासनाच्या निर्देशानुसार तालुकास्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या महसूल पंधरवाड्यामध्ये प्रत्येक दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तालुकास्तरावर समाजाच्या विविध घटकातील नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
यामध्ये 1 ऑगस्टला महसूल दिन व महसूल पंधरवाडा शुभारंभ कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, 2 ऑगस्टला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, 3 ऑगस्टला मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, 4 ऑगस्टला स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय, 5 ऑगस्टला कृषि मार्गदर्शन कार्यक्रम, 6 ऑगस्टला शेती, पाऊस आणि दाखले, 7 ऑगस्टला युवा संवाद, 8 ऑगस्टला महसूल-जन संवाद, 9 ऑगस्टला महसूल ई-प्रणाली, 10 ऑगस्टला सैनिक हो तुमच्यासाठी, 11 ऑगस्टला आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन, 12 ऑगस्टला एक हात मदतीचा दिव्यांगाच्या कल्याणाचा, 13 ऑगस्टला महसूल अधिकारी, कर्मचारी यांचे प्रशिक्षण, 14 ऑगस्टला महसूल पंधरवाडा वार्तालाप तर 15 ऑगस्ट रोजी महसूल संवर्गातील कार्यरत सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संवाद, उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी पुरस्कार वितरण व महसूल पंधरवाडा सांगता समारंभाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment