23 July, 2024

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी घेतला स्टॉप डायरिया अभियानाचा आढावा • ग्रामीण भागात 31 ऑगस्ट पर्यंत अभियान, विविध उपक्रम राबविणार

हिंगोली (जिमाका), दि. 23 : जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगूलवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात स्टॉप डायरीया बाबत जिल्हा सुकाणू समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत स्टॉप डायरिया अभियानाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. सुनील देशमुख, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेजा स्वामी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन राठोड, डॉ. कल्पना सुतनकाळे, डॉ. श्रीकांत कुलदीपक यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे आजार होतात. ग्रामपंचायतीमध्ये शुद्ध पाणी पिल्यामुळे जलजन्य आजार होणार नाहीत. जलजन्य आजार रोखण्याबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी जिल्ह्यात 1 जुलै ते 31 ऑगस्ट या दरम्यान स्टॉप डायरिया अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, महिला व बालकल्याण विभाग, शिक्षण व ग्रामपंचायत विभाग आदीच्या संयुक्त विद्यामाने राबविण्यात येत आहे. या अभियानामध्ये गावातील अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्र, सरकारी कार्यालय व प्राथमिक शाळा या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता असणे आवश्यक आहे. पावसाळ्यामध्ये दूषित पाणी पिऊन डायरिया, गॅस्ट्रो व कावीळ यासारखे अनेक आजार होत असतात. त्यामुळे पिण्याचे पाणी निर्जंतूक करुन पिण्यासाठी वापरल्यास या आजारांना दूर ठेवता येते. यासाठी गावस्तरावर विविध उपक्रम घेऊन लोकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्हा व तालुका पातळीवर सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग राहणार आहे. या अभियानामध्ये मुख्यतः पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन व त्यांची योग्य हाताळणी, स्वच्छता, जनजागृती कार्यक्रम, पाणी गळतीच्या जागा शोधून त्यांची दुरुस्ती करणे, पाणी तपासणी बाबत गावपातळीवर पोस्टर्स, बॅनर लावणे, स्वच्छता चावडी सुरू करणे, स्वच्छता जागृती कार्यक्रम घेणे, घरोघरी भेटी देऊन कचऱ्याचे वर्गीकरण करण्यास प्रोत्साहन देणे, अंगणवाड्यामध्ये माता व किशोरवयीन मुलीची स्वच्छता, आरोग्य इत्यादी विषयावर मार्गदर्शन करणे, शालेय स्तरावर अतिसाराचा सामना करण्यासाठी चित्रकला, निबंध लेखन, सुरक्षित पाण्याचा वापर या विषयावर आयोजन करण्यात येणार आहे. तसेच पाणीपुरवठा योजनेतील पाणी गळती शोधून त्याची दुरुस्ती करणे. पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता, घरगुती स्तरावरील पाणी साठवणीच्या टाक्यांची स्वच्छता, पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे स्वच्छता ठेवणे, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता आदी उपक्रम राबविले जाणार आहेत. बैठकीला बाल विकास प्रकल्प अधिकारी व्ही. आर. वाकडे, आर. आर. मगर, एस. के. सोरेकर, आर. एम. धापसे, एस एम इंगळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सतीश रुणवाल, डॉ. गणेश जोगदंड, डॉ. संदीप काळे, डॉ. अनुराधा गोरे, डॉ. डी. व्ही. सांवत, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक शंकर तावडे, जिल्हा लेखापाल व्यवस्थापक श्रीपाद गारुडी, वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन चव्हाण, डॉ. निशांत थोरात, डॉ. प्रशांत पुठावार, अमोल कुलकर्णी, अझर अली, लक्ष्मण गाभाने, वाघमारे, गट शिक्षण अधिकारी जी. बी. बिरमवार आदी सर्व विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ******

No comments: