24 July, 2024
बालविवाह निर्मूलन चॅम्पियन्सचे दोन दिवशीय प्रशिक्षण संपन्न
हिंगोली (जिमाका), दि. 24 : जिल्हा महिला व बाल विकास विभाग, यूनिसेफ आणि सेंटर फॉर सोशल अँण्ड बिहेवियर चेंज कम्युनिकेशन आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात बालविवाह निर्मूलन जिल्हा कृती दल स्थापन करण्यात आले आहे. या कृती दलाच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यात बालविवाह निर्मूलन व्हावे यासाठी पंचायत विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, महिला व बाल कल्याण विभाग (जि.प.), जिल्हा महिला व बालविकास विभाग या सर्व विभागांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेला “बालविवाहमुक्त हिंगोली” जिल्हा कृती आराखडा प्रभावीपणे राबविण्यासाठी संबंधित सर्व विभागांनी बालविवाह निर्मूलन चॅम्पियन्सची नियुक्ती जिल्हाधिकारी यांनी केली आहे.
नियुक्त सर्व विभागाच्या चॅम्पियन्ससाठी आराखड्याची अंमलबजावणी, पाठपुरावा, नियोजन, माहिती विश्लेषण, समन्वय, मूल्यमापन आणि संनियंत्रण संदर्भातील गुगल फ़ॉर्मवर देखरेख संदर्भात दि. 22 व 23 जुलै, 2024 रोजी दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीर येथे घेण्यात आले.
या प्रशिक्षणाच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा दिल्या व बालविवाह निर्मूलन जिल्हा कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. तसेच या प्रशिक्षणास प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, उपशिक्षणाधिकारी नितीन नेटके, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी राजाभाऊ मगर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांची उपस्थिती होती.
या प्रशिक्षणात तालुकानिहाय बालविवाहाची कारणे व विभागनिहाय उपाय, महाराष्ट्रातील बालविवाहाचे प्रमाण, परिणाम, सक्षम कार्यक्रम आढावा, बालहक्क, बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006, बाल न्याय मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियम 2015, लैंगिक छळांपासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012, बालविवाहावर आधारित प्रश्नमंजुषा, लिंगभाव, बालविवाह निर्मूलन चॅम्पियन्सची भूमिका आणि जबाबदारी, कम्युनिकेशन किट, युनिसेफचे-बालविवाह समाप्त करण्यासाठी जागतिक कार्यक्रम, बालविवाह निर्मूलन जिल्हा कृती आराखडा कार्यान्वयन योजना तयार करणे, साप्ताहिक देखरेखीचे फॉरमेट तयार करणे, जिल्हा कृती दल बैठकीसाठी अहवाल तयार करणे, जिल्हा कृती आराखड्यासाठी सहाय्य व नियोजन, विभाग प्रमुखांचे मार्गदर्शन, महिती संकलन आणि विश्लेषण, प्रेरणादायी व सकारात्मक प्रकरणांचे दस्तऐवजीकरण इत्यादी विषयांवर प्रशिक्षण घेण्यात आले.
या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील पंचायत विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, महिला व बाल कल्याण विभाग (जि.प.), जिल्हा महिला व बालविकास विभाग, राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम (RKSK), महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) यांनी नियुक्त केलेल्या एकूण 75 “बालविवाह निर्मूलन चॅम्पियन्स” यांना प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणास युनिसेफच्या राज्य सल्लागार डॉ. सरिता शंकरन प्रामुख्याने उपस्थित होत्या. डॉ. सरिता यांनी या प्रशिक्षणात कायदेविषयक विषयांवर प्रकाश टाकून प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणासाठी साधन व्यक्ती म्हणून SBC3 चे बालविवाह निर्मूलन प्रकल्पाचे कार्यक्रम प्रमुख नंदू जाधव, वरिष्ठ प्रकल्प समन्वयक कृपाली बढिये, विकास कांबळे, रुचिका अहिरे, मोनाली धुर्वे उपस्थित होते.
या प्रशिक्षणासाठी जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्प लाईन 1098 चे सर्व कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment