29 July, 2024

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

• मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामस्तरीय समिती गठीत • अर्जाची छाननी करण्यासाठी तहसील स्तरावर 10 संगणकाचा एक कक्ष स्थापन करावे हिंगोली (जिमाका), दि. 29 : राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक पात्र लाभार्थी महिलेला जुलै, 2024 पसून दरमहा 1500 रुपयाचा लाभ मिळणार आहे. या योजनेला हिंगोली जिल्ह्यातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हिंगोली जिल्ह्यात सर्व गावामध्ये ग्रामस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती गाव पातळीवर योजनेची व्यापक व प्रभावीपणे जनजागृती करत आहे. ग्रामस्तरीय समितीमधील सर्वांनी एकमेकांशी समन्वय साधून प्राधिकृत करण्यात आलेल्या सर्व यंत्रणेमार्फत जास्तीत जास्त पात्र महिलांचे अर्ज भरुन घेण्यात येत आहेत. ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलांच्या यादीचे प्रत्येक शनिवारी व आवश्यकतेनुसार चावडी वाचन करण्यात येणार आहे. तसेच ही यादी ग्राम पंचायत व अंगणवाडी केंद्रावर प्रसिध्द करण्यात येणार आहे. प्रसिध्द केलेल्या यादीवर हरकत प्राप्त झाल्यास वेळीच त्याचे निराकरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी प्राप्त झालेल्या अर्जांच्या अनुषंगाने पोर्टल हाताळणी व अर्जांच्या छानणीसाठी दि. 26 जुलै 2024 रोजी आनॅलाईन प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. या प्रशिक्षणामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करुन अर्ज अंतिम करण्यासाठी मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. तसेच सर्व तहसीलदारांना लाडकी बहिण योजनेचे आयडी व पासवर्ड दिलेले आहे. अर्जाची छाननी करुन अर्ज अंतिम करण्यासाठी सर्व तहसीलदारांनी तात्काळ 10 संगणकाचा एक कक्ष स्थापन करावा. प्रत्येक संगणकासाठी तालुक्यातील उपलब्ध असलेल्या डाटाएंट्री ऑपरेटरची नेमणुक करावी. प्रत्येक कक्षासाठी एक संपर्क अधिकारी म्हणून नायब तहसीलदार, विस्तार अधिकारी यांची नेमणुक करावी. पात्र अर्ज मंजूर करण्यासाठी व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कक्षासाठी एक जबाबदार अधिकारी नियंत्रण अधिकारी म्हणुन नियुक्त करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी सर्व संबंधितांना दिल्या आहेत. *****

No comments: