31 July, 2024

मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेला ग्रामीण व शहरी भागात उत्स्फूर्त प्रतिसाद, हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 68 हजार 443 अर्ज प्राप्त

हिंगोली (जिमाका), दि. 31 : मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेला ग्रामीण व शहरी भागातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 68 हजार 443 अर्ज प्राप्त झाले आहेत. प्रत्येक गावात आणि शहरी भागात अर्ज स्वीकृती केंद्र सुरु करण्यात आल्याने महिलांना या योजनेसाठी अर्ज करणे सोपे झाले आहे. ऑफलाईन स्वरुपात प्राप्त झालेल्या अर्जांची ऑनलाईन नोंदणी करण्याला गती देण्यात आली असून जिल्हास्तरावर याबाबतचा सातत्याने आढावा घेण्यात येत आहे. ग्रामीण भागात अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामसेवक, रेशन दुकानदार, तलाठी, कृषि सहायक, महिला बचतगटाच्या समूह साधन व्यक्ती यांच्यामार्फत योजनेचे अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. तसेच प्राप्त अर्जांची छाननी व ऑनलाईन नोंदणी करण्याची प्रक्रिया करण्यात येत आहे. शहरी भागातही याच पद्धतीने विविध ठिकाणी अर्ज स्वीकृती केंद्रांच्या माध्यमातून महिलांचे ऑनलाईन, ऑफलाईन अर्ज स्वीकारले जात आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत जिल्ह्यात 30 जुलैपर्यंत 1 लाख 68 हजार 443 अर्ज प्राप्त झाले आहेत. ऑफलाईन भरलेले अर्ज ऑनलाईन करणे, प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करुन अर्ज अंतिम करण्याची कार्यवाही गतीने सुरु आहे. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना स्वतःचे ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा ‘नारीशक्ती दूत’ अॅपद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल किंवा अर्ज भरताना तांत्रिक अडचण येत असल्यास ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी अर्जाचा नमुना व हमीपत्र याची पीडीएफ फाईल अॅपवर उपलब्ध आहे. या अर्जाची प्रिंट काढून त्याप्रमाणे अर्ज व हमीपत्र भरावे आणि ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांच्याकडे द्यावे. अर्जाचा विहित नमुना ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी येथे उपलब्ध आहे. तसेच या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. *****

No comments: