18 July, 2024
गतवर्षीच्या अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून घ्यावी- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
हिंगोली, दि.१८ (जिमाका): जिल्ह्यात नोव्हेंबर २०२३ मध्ये अवेळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची मदत मिळविण्यासाठी गावातील तलाठ्याकडून विशिष्ट क्रमांक मिळवून घेत ई-केवायसी करून घेणे अनिवार्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ आपल्या खात्याची ई-केवायसी करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज केले आहे.
माहे नोव्हेंबर-2023 मधील अवेळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक, आणि कृषि सहायकांची त्रिस्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती. या त्रिस्तरीय समितीमार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते. त्यानुसार जिल्हयाचे एकूण बाधित शेतकरी संख्या 2 लाख 57 हजार 625 इतकी असून एकूण बाधित क्षेत्र 123164.40 होते, एकूण 167.86 कोटी निधी मागणी नोंदविण्यात आलेली होती. त्यानुसार शासन निर्णय दि.31 जानेवारी 2024 नुसार जिल्ह्यासाठी एकूण 167.86 कोटी निधी संगणकीय प्रणालीवर मंजूर करण्यात आलेला आहे. आजपर्यंत 217899 शेतकऱ्यांना 131.44 कोटी रुपयांचे अनुदान बँक खात्यावर वितरण करण्याची मान्यता देण्यात आली आहे. संगणकीय प्रणालीव्दारे रक्कम वितरीत करण्यात आलेली शेतकरी संख्या 107965 असून संगणकीय प्रणालीव्दारे वितरीत करण्यात आलेली रक्कम 66.20 कोटी आहे. त्याचा गोषवारा तक्त्यात देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील 38482 शेतकरी यांनी ई-केवायसी न केल्यामुळे २१.२७ कोटी रुपये नुकसान भरपाईचा निधी पोर्टलवर प्रलंबित आहे. तरी शेतकऱ्याकडून विशिष्ट क्रमांकासह लवकरात लवकर ई-केवायसी करून घेण्याची कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी तहसीलदारांना दिले आहेत.
त्या अनुषंगाने मदत व पुनर्वसन, मंत्रालय, मुंबई यांच्याकडून निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयान्वये बाधित शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम वितरीत करण्याबाबत शासनाच्या पोर्टलवरून यादी अपलोड करण्याची कार्यवाही करण्यात आली. ही यादी अपलोड केल्यानंतर बाधित शेतकऱ्यांना आपल्या गावातील तलाठ्याकडून VK (विशिष्ट क्रमांक) घेऊन ई- केवायसी करणे बंधनकारक आहे. त्याबाबत तहसील कार्यालयाकडून तलाठ्यामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत, बाधित शेतकऱ्यांनी अद्याप ई- केवायसी केली नाही. अशा शेतकऱ्यांनी तात्काळ जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जावून ती करून घ्यावी अन्यथा आपल्या आधार लिंक खात्यावर अनुदान जमा होणार नाही. तसेच शेती पिकांच्या नुकसानीकरिता मदत व पुनर्वसन विभागाकडून दिली जाणारी मदत कोणत्या बँक खात्यात जमा झाली आहे. हे पाहण्यासाठी https://mh.disastermanagement.mahait.org/PaymentStatus या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment