09 July, 2024
जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाईल्ड हेल्पलाईनला बालविवाह थांबविण्यात यश
हिंगोली (जिमाका), दि. 09 : जिल्ह्यात बाल विवाह समूळ नष्ट करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यात बाल विवाह निर्मूलन समिती गठीत करण्यात आली आहे, या समितीमार्फत जिल्ह्यात विविध ठिकाणी बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006, ग्राम बाल संरक्षण समिती स्थापन करण्याविषयी जनजागृती करण्यात येत आहे. याच उद्देशाने जिल्ह्यातील वसमत येथील एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह होणार असल्याबाबत चाईल्ड लाईन (१०९८) ला गोपनीय माहिती मिळाली. त्या दरम्यान वसमत येथे या प्रकरणाची चौकशी करण्याकरिता जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर. आर. मगर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या सूचनेनुसार व चाईल्ड लाईन (१०९८) चे प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे यांच्या नियोजनानुसार जिल्हा बाल संरक्षण कक्षातील बाल संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) गणेश मोरे, चाईल्ड हेल्पलाईनचे केस वर्कर राजरत्न पाईकराव, चाईल्ड हेल्पलाईनचे सुपरवायजर विकास लोणकर, शहर पोलीस स्टेशन वसमतचे पोलीस निरीक्षक नंदकुमार वाघमारे व प्रभाग बाल संरक्षण समिती यांच्या समन्वयाने सदर घटनास्थळी भेट देवून उपस्थित सर्वाना बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम, 2006 विषयी माहिती सांगितली. ज्यामध्ये मुलीचे वय 18 व मुलाचे वय 21 असावे आणि जर मुलाचे व मुलीचे वय यापेक्षा कमी असेल तर असे विवाह बेकायदेशीर ठरवले जातात व अशा गुन्ह्यास एक लाख रुपय दंड व 2 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा होवू शकते. तसेच बाल विवाहाची कारणे व दुष्परिणाम याविषयी सविस्तर मार्गदर्शन करुन बाल विवाह थांबविण्यात आला. बालिकेच्या आई-वडिलाकडून मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण होई पर्यंत लग्न करणार नाही, असा लेखी जबाब लिहून घेण्यात आला.
यावेळी वसमत येथील बालिकेची आई व आजी इतर नातेवाईक उपस्थित होते. या बालिकेला पुढील कार्यवाहीसाठी मा. बाल कल्याण समिती, हिंगोली समोर हजर करण्यात आले असून त्यानंतर बालिकेच्या वयाची 18 वर्ष पुर्ण होईपर्यंत मा. बाल कल्याण समिती हिंगोली कडून दर महिन्याला बालिकेचा पाठपुरावा करण्यासंदर्भात सुचना महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयास देण्यात आल्या आहेत. त्यानुसार बालिकेची कुटुंबाची पार्श्वभुमी आणि सामाजिक स्थिती, सद्यस्थितीबाबत वेळोवेळी माहिती बाल कल्याण समिती यांना कळविण्यात येते. बालिकेच्या वयाच्या 18 वर्षापर्यंत नियमित पाठपुरावा घेतला जातो, अशी माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, हिंगोली यांनी दिली आहे.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment