12 July, 2024

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविकांना प्रशिक्षण

हिंगोली (जिमाका), दि. 12 : राज्य शासनाने दिनांक 1 जुलै 2024 पासून 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांसाठी मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना राज्यभरात सर्वत्र लागू केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिलांचे ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्विकारण्यात येत असून, यासाठी मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविकांना प्रशिक्षण देण्यात आले असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास विभाग) गणेश वाघ यांनी सांगितले. शासन निर्णयातील निकषांनुसार पात्र लाभार्थीं महिलांना दरमहा 1 हजार 500 एवढ्या रक्कमेचा लाभ मिळणार आहे. या योजनेचे फॉर्म गावपातळीवर ग्रामसेवक, सेतु सुविधा, आपले सरकार सेवा केंद्र, अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने स्विकारण्याच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त आहेत. या योजनेचे फॉर्म ऑनलाईन भरण्यासाठी नारी शक्ती दूत हे अॅप उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. या अॅपद्वारे फॉर्म भरण्याचे ऑनलाईन प्रशिक्षण शासन स्तरावरुन दि. 08 जुलै 2024 रोजी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (बाक), सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी व सर्व अंगणवाडी पर्यवेक्षिका यांना देण्यात आले. तद्नंतर दि. 09 जुलै 2024 रोजी संबधित बाल विकास प्रकल्प अधिकारी व अंगणवाडी पर्यवेक्षिकांनी जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविकांना अॅपचे ऑनलाईन प्रशिक्षण दिले आहे. या योजनेची ग्रामीण पातळीवर जास्तीत-जास्त प्रमाणात जनजागृती करण्याच्या सूचना उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. वाघ यांनी दिल्या आहेत. ***

No comments: