08 July, 2024

जन सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र चालकांचे प्रशिक्षण

हिंगोली (जिमाका), दि. 08 : प्रधानमंत्री पिक विमा योजनेत शेतकऱ्यांना एक रुपया विम्यात सहभागी करून घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. विविध नैसर्गिक आपत्तींमुळे पिकाच्या होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यास आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना राबविण्यात येत आहे. खरीप 2024 हंगामात पेरण्या सुरु झाल्या आहेत. शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी केंद्र शासनाचे पिक विमा पोर्टल (www.pmfby.gov.in) सुरु करण्यात आले आहे. या संदर्भात नुकतीच जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम यांच्या अध्यक्षतेखाली आपले सरकार सेवा केंद्र यांना प्रशिक्षण देण्यात आले. केंद्र शासनाने विमा अर्ज भरण्यासाठी प्रती शेतकरी सीएससी केंद्रास 40 रुपये मानधन निर्धारित केले आहे. ते संबंधित विमा कंपनीमार्फत सीएससी केंद्रास दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रति अर्ज एक रुपयाप्रमाणे रक्कम सीएससी केंद्र चालकांना देऊन अर्ज करावा. अतिरिक्त रक्कमेची मागणी केल्यास शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. त्यामुळे सीएससी केंद्रचालकावर कायदेशीर कारवाई करता येईल. जास्त पैसाची मागणी केल्यास शेतकऱ्यांनी आपली तक्रार टोल फ्री क्रमांक 14599, 14447 अथवा तक्रार नोंद क्रमांक 011- 49754923, 011-49754924 अथवा व्हॉट्सअॅप क्रमांक 9082698142 यावर करावी. तसेच कोणत्याही सीएससी केंद्र चालकांने अथवा शेतकऱ्याने शासकीय जमीन, शासकीय गायरान, मंदीर, देवस्थान, संस्थान जमीन अथवा दुसऱ्या शेतकऱ्याचा परस्पर पिक विमा उतरवू नये. अशा तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल अशा सूचना बैठकीत त्यांनी दिल्या. अर्ज करण्यासाठी आधार क्रमांक आवश्यक आहे. पिक विम्यातील अर्ज हा आधार वरील नावाप्रमाणेच असावा. पिक विम्यातील नुकसान भरपाई ही केंद्र शासनाच्या विमा पोर्टलद्वारे आधार संलग्न बँक खात्यामध्ये करण्यात येते. यासाठी आपले बँक खाते आधार संलग्न पेमेंट मिळण्यासाठी अधिकृत असणे आवश्यक आहे. याकरिता आपला बँक मॅनेजर माहिती देऊ शकतो. आधार कार्ड वरील नाव व बँक खात्यावरील नाव सारखे असावे. क्षेत्रावर लागवड केलेल्या पिकाचाच पिक विमा उतरवून घ्यावा व तसेच पिक पेराचे स्वयं घोषणापत्र शेतकऱ्यांकडून भरुन घ्यावे, अशा सूचनाही जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी केले. योजनेत सहभागासाठी अंतिम मुदत दि. 15 जुलै 2024 आहे. परंतु सर्व शेतकऱ्यांनी अंतिम दिनांकाची वाट न पाहता आपल्या पिकाचा पिक विमा उतरवून घ्यावा असे आवाहन सर्व शेतकऱ्यांना करण्यात येत आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी केंद्र शासनाचे कृषि रक्षक पोर्टल हेल्पलाईन 14447 संबंधित विमा कंपनी, स्थानिक कृषि विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा. शेतकऱ्यांनी अधिसूचित पिकांच्या माहिती घेऊन विहीत मुदतीमध्ये नजिकच्या ई-सेवा केंद्र किंवा बँक, वित्तीय संस्था यांच्याशी संपर्क साधून आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. **

No comments: