23 July, 2024
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा बेरोजगार युवकांनी लाभ घ्यावा --- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
हिंगोली (जिमाका), दि. 23 : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने कार्यरत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता कार्यकारी समितीच्या बैठकीमध्ये केले आहे.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात नुकतेच बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी वि. प्र. रांगणे, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था हिंगोलीचे प्राचार्य आर व्ही. बोथीकर, सरकारी कामगार अधिकारी टी. ई. कराड, शिक्षणाधिकारी (मा.) प्रशांत दिग्रसकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर. आर. मगर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक एस. ए. कादरी, जिल्हा औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मामडे, प्रा. डॉ. प्रकाश राजगुरु, युवा विकास सोसायटीचे आशिष बाजपाई त्याचबरोबर जिल्ह्यातील नामांकित उद्योजक आणि विविध शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी योजनेच्या माध्यमातून उद्योजकांना प्रशिक्षित मनुष्यबळ मिळणार असल्याने व त्यांचे 6 महिन्यांचे विद्यावेतन महाराष्ट्र शासन देत असल्याने, त्यांनीही या योजनेचा प्रचार व प्रसार करावा असे आवाहन केले. त्याचबरोबर प्रत्येक विभागाने जिल्ह्यातील 20 पेक्षा अधिक मनुष्यबळ असणाऱ्या अस्थापनांचा शोध घ्यावा, अशा सूचना दिल्या.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे राबविली जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून रोजगार इच्छूक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करुन देणारे उद्योजक जोडले जातील. रोजगार इच्छूक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्यांची क्षमता वाढ होईल. तसेच उद्योजकांना त्यांच्या कामासाठी लागणारे मनुष्यबळ कार्य या योजनेद्वारे उपलब्ध होणार आहे. या योजनेचा कालावधी 6 महिने असणार आहे. या 6 महिन्यात उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे शासनामार्फत विद्यावेतन प्रदान केले जाणार आहे. यामध्ये बारावी पास उमेदवारांना 6 हजार रुपये, आय.टी.आय. पदविका उमेदवारांना 8 हजार रुपये तर पदवीधर, पदव्युत्तर उमेदवारांना 10 हजार इतके विद्यावेतन महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त डॉ.रा.म. कोल्हे यांनी उपस्थितांना दिली.
यावेळी हिंगोली जिल्ह्यातील नामांकित उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
********
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment