25 July, 2024

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत 81 हजार 522 महिलांचे अर्ज

हिंगोली (जिमाका), दि. 25 : जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 81 हजार 522 पात्र लाभार्थी महिलांनी अर्ज भरले असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण विभाग) गणेश वाघ यांनी दिली आहे. जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेतर्गंत एकूण 1072 तर शहरी भागातील 125 अशा एकूण 1197 अंगणवाडी आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत नगर परिषद, नगर पंचायतीकडून 6131, एकात्मिक बालविकास योजनेकडून 7384 आणि जिल्हा परिषदेकडून 68 हजार 07 पात्र लाभार्थी महिलांनी अर्ज भरले असून, यामध्ये ऑनलाईन 47 हजार 543 तर 33 हजार 979 ऑफलाईन असे एकूण 81 हजार 522 महिलांनी अर्ज भरले आहेत. ग्रामीण भागातील जास्तीत जास्त पात्र महिला लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका यांचे अर्ज भरण्याचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविकांकडून मोबाईलमध्ये नारीशक्ती दूत ॲप्लिकेशन डाऊनलोड करूनही हे अर्ज भरून घेण्यात येत आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र लाभार्थी महिला यामध्ये ऑनलाईन अर्ज करू शकतात. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेचे सनियंत्रण व माहितीसाठी तालुकानिहाय विस्तार अधिकारी (सांख्यिकी) यांची नोडल अधिकारी म्हणून देखील नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र महिला लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ व्हावा, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून गावात दवंडी देण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर वेळोवेळी कॅम्पचे आयोजन करण्यात येत आहेत. ***

No comments: