31 July, 2024

महसूल पंधरवाडा : विशेष मोहिम व लोकाभिमुख उपक्रम

महसूल विभागाकडून नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत अधिकाधिक माहिती व्हावी आणि त्यांना योजनांचा योग्य लाभ घेता यावा. तसेच त्याबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढावी, शासन आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृद्धींगत व्हावा, यासाठी विशेष मोहीम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने गतवर्षी (दि. 1 ऑगस्ट) महसूल दिनापासून महसूल सप्ताह आयोजित करण्यात आला होता. गतवर्षी महसूल सप्ताहादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रम आणि शिबिरांना प्राप्त झालेला जन प्रतिसाद आणि कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन विचारात घेऊन महसूल दिनानिमित्त अधिकाधिक लोकाभिमुख कार्यक्रम राबविणे शक्य व्हावे, यासाठी यावर्षी दि 1 ऑगस्टपासून महसूल दिनाबरोबरच 1 ते 15 ऑगस्ट, 2024 या कालावधीत महसूल पंधरवाडा-2024 साजरा करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. हिंगोली जिल्ह्यातही हा उपक्रम जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा प्रशासनामार्फत राबविला जाणार आहे. त्यानिमित्त माहिती देणारा हा लेख… महसूल विभागातर्फे नागरिकांच्या उपयोगाची दैनंदिन महसुली कामे पार पाडण्याबरोबरच अभिलेखे अद्ययावत ठेवणे, जमीन कर वसू़ुलीची कार्यवाही करणे, जमीन मोजणी करणे, अपील प्रकरणांची चौकशी करणे व सुनावणी करणे, वेळापत्रकानुसार महसुली वसुलीचे काम करण्यात येते. हे कामकाज पार पाडताना महसूल विभागातील कर्मचाऱ्यांच्या उत्तम कामगिरीची दखल घेणे क्रमप्राप्त असते. आणि म्हणूनच यावर्षी महसूल दिनापासून ‘महसूल पंधरवाडा’ साजरा करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. हा पंधरवाडा साजरा होताना यामध्ये नागरिकांचा सहभागही महत्वाचा आहे. त्यानुसार सर्वत्र लोकाभिमुख उपक्रम राबविले जात आहेत. 1 ऑगस्ट हा महसूल दिन; या महसूल दिनानिमित्त महसूल विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या व नवनवीन संकल्पना राबविणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांचा दरवर्षी राज्यस्तरावर ‘उत्कृष्ट जिल्हाधिकारी’ म्हणून प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येतो. याच धर्तीवर विभागनिहाय उत्कृष्ट काम करणाऱ्या अपर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, अव्वल कारकून, मंडळ अधिकारी, लिपिक, तलाठी, पोलीस पाटील व कोतवाल यांचा उत्कृष्ट अधिकारी व कर्मचारी म्हणून गौरव करण्यात येतो. यावर्षी शासनाने याची व्याप्ती वाढवून, महसूल दिनाबरोबरच राज्यात 1 ते 15 ऑगस्ट,2024 या कालावधीत महसूल पंधरवाड्याचे आयोजन करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनामार्फत संपूर्ण पंधरवाडा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्यामध्ये नागरिकांचा सहभागही घेतला जाणार आहे. विशेष मोहीम, कार्यक्रम, उपक्रम, शिबीरे, महसूल अदालतीचे आयोजन या महसूल पंधरवाड्यामध्ये नागरिकांच्या सहभागाने प्रत्येक दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत विशेष मोहीम, कार्यक्रम, उपक्रम, शिबीरे, महसूल अदालतीचे आयोजन करण्यात येत आहे. त्यामध्ये 1 ऑगस्टला महसूल दिन व महसूल पंधरवाडा शुभारंभ कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, 2 ऑगस्टला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, 3 ऑगस्टला मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, 4 ऑगस्टला स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय, 5 ऑगस्टला कृषि मार्गदर्शन कार्यक्रम, 6 ऑगस्टला शेती, पाऊस आणि दाखले, 7 ऑगस्टला युवा संवाद, 8 ऑगस्टला महसूल-जन संवाद, 9 ऑगस्टला महसूल ई-प्रणाली, 10 ऑगस्टला सैनिक हो तुमच्यासाठी, 11 ऑगस्टला आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन, 12 ऑगस्टला एक हात मदतीचा दिव्यांगाच्या कल्याणाचा, 13 ऑगस्टला महसूल अधिकारी, कर्मचारी यांचे प्रशिक्षण, 14 ऑगस्टला महसूल पंधरवाडा वार्तालाप तर 15 ऑगस्ट रोजी महसूल संवर्गातील कार्यरत सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संवाद, उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी पुरस्कार वितरण व महसूल पंधरवाडा सांगता समारंभ असे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. महसूल पंधरवाडा आयोजनाच्या अनुषंगाने शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ नागरिकांना मिळावा यासाठी असे उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी तसेच उप विभागीय अधिकारी, तहसिलदार यांच्या कार्यालयांमध्ये हेल्पडेस्क किंवा हेल्पलाईन किंवा व्हॉट्स अँपव्दारे मदत करण्याकरिता यंत्रणा स्थापन करुन यासंबधी कक्ष तयार करुन गरजू नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या शंकांचे निरसन करुन त्यांची कामे पुर्ण करण्यासाठी या कालावधीत विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे. यासोबतच महसूल विभागामार्फत देण्यात येणारे विविध दाखले आणि प्रमाणपत्रे, त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रांबाबतची माहिती या पंधरवाड्यात देण्यात येणार आहे. महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा, राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत नागरिकांना अधिकाधिक माहिती मिळावी आणि त्यांना योग्य लाभ घेता यावा तसेच शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृध्दींगत व्हावा या उद्देशाने महसूल पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आले आहे. महसूल पंधरवाड्यात नागरिकांना सहभागी करुन घ्यावे आणि नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करुन पंधरवाडा यशस्वी करावा. शासनाच्या सर्वच उपक्रमांमध्ये हिंगोली जिल्हा नेहमीच अग्रेसर असून, महसूल पंधरवाडा आयोजनातही जिल्ह्याने आपला नावलौकिक टिकवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. जिल्ह्यात होणारा प्रत्येक उपक्रम हा उत्तम असावा, असा त्यांचा मानस आहे. हा उपक्रम लोकाभिमुख व जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचावा यासाठी उपक्रमाची सर्वांगीण प्रसिध्दी होणे आवश्यक आहे. त्यासाठी पत्रकार परिषदा, कार्यक्रमांची माहिती असलेले बॅनर्स, फ्लेक्स तसेच सर्व प्रसिध्दी माध्यमे याचाही उपयोग करुन विभागातील जास्तीत जास्त लोकांपर्यत हा उपक्रम पोहचून त्यांचा शासनाप्रती असलेला विश्वास अधिक वृध्दींगत होईल असा प्रयत्न महसूल विभागाचा आहे. यानिमित्याने नागरिकांचाही या उपक्रमास प्रतिसाद आवश्यक आहे. चंद्रकांत कारभारी माहिती सहायक/उपसंपादक जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली ******

No comments: