30 July, 2024
मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या लाभार्थ्यांची यादी 10 ऑगस्ट पर्यंत सादर करावी - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
• जिल्ह्यात जादुटोणा विरोधी कृत्य केल्याचे आढळून आल्यास समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क करावा
हिंगोली (जिमाका), दि. 30 : मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या लाभार्थ्यांचे अर्ज आशाताई यांच्यामार्फत भरुन घेऊन त्याची यादी 10 ऑगस्ट पर्यंत समाज कल्याण कार्यालयाकडे सादर करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आयोजित आढावा बैठकीत दिले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना व जादुटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रमाचा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त यादव गायकवाड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी राजाभाऊ मगर, जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बारहाते, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी. एन. फोपसे, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. शैलजा कुप्पास्वामी, नगर परिषदेचे उप मुख्याधिकारी उमेश हेंबाडे, पोलीस अधीक्षक कार्यालयाचे सुधीर वाघ, सुलोचना ढोने आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. पापळकर म्हणाले, मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या पात्र लाभार्थ्यांकडून आशाताई मार्फत अर्ज भरुन घ्यावेत. आरोग्य विभागाने अर्जाची छाननी करुन रुग्णाला कोणत्या उपकरणाची गरज आहे. याची तपासणी करावी. त्यांना द्यावयाच्या लाभाचा उल्लेख असलेली यादी तयार करुन मंजुरीसाठी समाज कल्याण कार्यालयाकडे दि. 10 ऑगस्टपर्यंत सादर करावेत. तसेच मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची ग्रामपातळीवर व्यापक प्रमाणात प्रचार, प्रसिध्दी करुन ग्रामपंचायत स्तरावर पात्र इच्छुकांची यादी तयार करावी आणि ती यादी गटविकास अधिकारी यांच्यामार्फत अंतिम करुन सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे दि. 10 ऑगस्टपर्यंत सादर करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी यावेळी संबंधितांना दिल्या.
महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्यासाठी व त्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावीपणे जनजागृती करावी.शाळा महाविद्यालयात व्याख्याने, कार्यक्रम घेऊन जनजागृती करावी. जिल्ह्यात जादूटोणा प्रतिबंध विरोधी कृत्य केल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क करुन तक्रार द्यावी. तसेच सर्व अशासकीय सदस्यांच्या नेमणुका करण्यासाठी सदस्यांच्या नावाची यादी राज्य समितीकडे सादर करुन मान्यता घ्यावी. यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम करणाऱ्या व्यक्तीचा अशासकीय सदस्यांमध्ये समावेश करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी दिल्या.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment