25 July, 2024

संदर्भीत बालकांच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी जाणाऱ्या बसला हिरवी झेंडा • विद्यार्थी व पालकांनी हृदयाच्या आजारासंदर्भात वेळोवेळी टूडी-इको तपासणी करावी

हिंगोली (जिमाका), दि. 25 : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत व केंद्र शासनाच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या वैद्यकीय पथकाकडून शून्य ते 18 वर्षे वयोगटातील संदर्भित संशयित हृदय रुग्णांसाठी दि. 28 जून, 2024 रोजी जिल्हा रुग्णालय हिंगोली येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली टूडी-इको तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ही तपासणी बालाजी हॉस्पिटल, मुंबई येथील तज्ञ कार्डियालॉजीस्ट डॉ. भूषण चव्हाण यांच्यामार्फत करण्यात आली. या टूडी-इको तपासणीमधून 19 बालकांना पुढील हृदयशस्त्रक्रिया करण्यासाठी संदर्भीत करण्यात आले होते. त्यानुसार या रुग्णालयांकडून आज हृदय शस्त्रक्रियेसाठी बालकांना घेऊन जाण्यासाठी ट्रॅव्हल्स पाठविण्यात आली होती. या बसमध्ये एकूण 12 बालकांना बालाजी हॉस्पिटल, भायखळा, मुंबई येथे शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात आले. या बसला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस , अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दीपक मोरे यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलजा कुप्पास्वामी, बालरोग तज्ज्ञ डॉ. गोपाल कदम, मेट्रन चिंचकर, डिईआयसी मॅनेजर डॉ. संतोष नांदूरकर हे उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक लक्ष्मण गाभणे, सांख्यिकी अन्वेषक ज्ञानोबा चव्हाण, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातील वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माता, एएनएम व कार्यालयीन कर्मचारी, रुग्णालयीन अधिपरिचारिका इत्यादींनी परिश्रम घेतले. शस्त्रक्रियेसाठी संदर्भीत विद्यार्थ्यांच्या शस्त्रक्रिया या महात्मा ज्योतीबा फुले जीवनदायी जन आरोग्य योजनेंतर्गत व आरबीएसके कार्यक्रमांतर्गत करण्यात येणार आहेत. हिंगोली जिल्ह्यातील विद्यार्थी व पालकांनी आरबीएसके कार्यक्रमामार्फत दैनंदिन जीवनात वावरताना हृदयाच्या आजारासंदर्भात वेळोवेळी टूडी-इको तपासणी करावी व वेळेत आजाराचे निदान करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी केले आहे. *******

No comments: