31 July, 2024

महसूल पंधरवाडानिमित्त 2 ऑगस्टला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या विशेष नोंदणी शिबिराचे आयोजन

हिंगोली (जिमाका), दि. 31 : महसूल विभागाच्या वतीने दि. 1 ऑगस्ट हा महसूल दिन साजरा करण्यात येणार आहे. तसेच यावर्षी महसूल दिनापासून दि. 1 ते 15 ऑगस्ट या दरम्यान महसूल पंधरवाडा-2024 राज्यभरात साजरा करण्यात येणार आहे. या पंधरवाडानिमित्त दि. 2 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ अधिकाधिक युवकांना व्हावा. त्याचबरोबर या योजनेचा जास्तीत जास्त प्रचार व प्रसार व्हावा, यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये विशेष शिबीर राबविण्यात येणार आहे. या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छूक उमेदवारांची नोंदणी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या मार्फत संयुक्तपणे राबविली जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून रोजगार इच्छूक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करुन देणारे उद्योजक जोडले जातील. रोजगार इच्छूक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्यांची क्षमता वाढ होईल. तसेच उद्योजकांना त्यांच्या कामासाठी लागणारे मनुष्यबळ कार्य या योजनेारे उपलब्ध होणार आहे. या योजनेचा कालावधी 6 महिने असणार आहे. या सहा महिन्यात उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे शासनामार्फत विद्यावेतन प्रदान केले जाणार आहे. यामध्ये बारावी पास उमेदवारांना 6 हजार रुपये, आयटीआय, पदविका उमेदवारांना 8 हजार रुपये तर पदवीधर, पदव्युत्तर उमेदवारांना 10 हजार रुपये इतके विद्यावेतन महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत नोंदणी करण्यास इच्छूक उमेदवारांनी आधार कार्ड, शैक्षणिक कागदपत्रे, बँक पासबूक, वय व अधिवास प्रमाणपत्र या सर्वांच्या साक्षांकित प्रतीसह जिल्ह्यातील नजीकच्या तहसील कार्यालयामध्ये शुक्रवार, दि. 2 ऑगस्ट, 2024 रोजी उपस्थित राहावेत व योजनेमध्ये आपली नोंदणी करावी, असे आवाहन डॉ. रा. म. कोल्हे, सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांनी केले आहे. *******

No comments: