30 July, 2024
शासकीय, निमशासकीय आस्थापना, महामंडळे, सहकारी व खाजगी आस्थापनेवर सहा महिन्यासाठी कार्य प्रशिक्षणाची सुवर्ण संधी
हिंगोली (जिमाका), दि. 30 : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून रोजगार इच्छूक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करुन देणारे उद्योजक जोडले जाणार आहेत. रोजगार इच्छूक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्यांची क्षमता वाढ होणार आहे. तसेच उद्योजकांना त्यांच्या कामासाठी लागणारे मनुष्यबळ कार्य या योजनेद्वारे उपलब्ध होणार आहे. या योजनेंतर्गत शासकीय, निमशासकीय आस्थापना, महामंडळे, सहकारी, खाजगी आस्थापनेवर कार्य प्रशिक्षणाची सुवर्ण संधी उपलब्ध होणार आहे. या योजनेचा कालावधी 6 महिने असणार आहे. जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योनजेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे यांनी केले आहे.
उमेदवारांची पात्रता :
उमेदवारांचे किमान वय 18 व कमाल 35 वर्ष असावे. उमेदवारांची किमान शैक्षणिक पात्रता बारावी, आयटीआय, पदविका, पदवीधर, पदव्युत्तर असावी. उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा. उमेदवारांची आधार नोंदणी असावी. उमेदवारांचे बँक खाते आधार संलग्न असावे. उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविण्यता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी. नोंदणी अद्यावत करावी व बँक खाते विषयीचे कागदपत्रे अपलोड करावेत. उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरुनच ऑनलाईन अर्ज करावेत.
कार्य प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे शासनामार्फत बारावी पास शैक्षणिक अर्हता असलेल्या उमेदवारांना प्रतिमाह 6 हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे. आयटीआय, पदविका शैक्षणिक अर्हता असलेल्या उमेदवारांना 8 हजार रुपये, पदवीधर, पदव्युत्तर शैक्षणिक अर्हता असलेल्या उमेदवारांना 10 हजार रुपये प्रतिमाह विद्यावेतन लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात (DBT) जमा करण्यात येणार आहे.
या योजनेंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय, निमशासकीय आस्थापना, उद्योग महामंडळ यांच्या आस्थापनेवरील मंजूर पदाच्या 5 टक्के व खाजगी कंपनी, आस्थापनामध्ये कार्यरत 20 व त्यापेक्षा अधिक मनुष्यबळ कार्यरत असलेली आस्थापनामध्ये सेवाक्षेत्र 20 टक्के व उत्पादन क्षेत्रात 10 टक्के असे उमेदवारांना 6 महिन्यासाठी प्रशिक्षणार्थी म्हणून अनुभव मिळविण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
हिंगोली जिल्ह्यातील बारावी, आयटीआय, पदविका, पदवीधर, पदव्युत्तर या शैक्षणिक अर्हतेनुसार जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील व खाजगी आस्थापनेवर 6 महिन्यासाठी पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी अद्यावत करावी. आधार कार्डशी सलग्न बँक खात्यावरील माहिती भरुन कागदपत्रे अपलोड करावी. त्यानंतर जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील व खाजगी आस्थापनेवरील रिक्त पदे अधिसूचित केली आहेत. आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदांची खात्री करुन ऑनलाईन अर्ज करावे. निवड प्रक्रिया ही पूर्ण ऑनलाईन असून सॉफ्टवेअर प्रणालीवर शॉर्ट लिस्टेड उमेदवारांना संधी दिली जाणार आहे.
याबाबत काही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, एस-3, दुसरा माळा, हिंगोली या कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे यांनी केले आहे.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment