12 July, 2024

ताई, तू ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’त नोंदणी केलीय !

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राज्य शासनाची महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना’ सुरु करण्यात आली असून, या योजनेत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यात सर्वत्र ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने नाव नोंदणी केली जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री –माझी लाडकी बहीण योजनेत जिल्ह्यातील पात्र लाभार्थी महिलांनी अर्जाची नावनोंदणी करण्यासाठी राज्य शासनासह स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना राज्य शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये दिले जाणार आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आता 31 ऑगस्टपर्यंत महिलांना अर्ज करता येणार असून, राज्य शासनाने पूर्वीची अर्ज करण्याची मुदत 1 जुलै 2024 ते 31 ऑगस्ट 2024 पर्यंत म्हणजेच दोन महिने करण्यात आली आहे. त्यामुळे पात्र लाभार्थी महिलांना आता दोन महिने या कालावधीमध्ये कधीही अर्ज करता येईल. तसेच या कालावधीत कधीही अर्ज केलेल्या पात्र लाभार्थी महिलांना दोन्ही महिन्याचा प्रत्येकी दीड हजार रुपये असा लाभ मिळणार आहे. त्यासाठी राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हा व स्थानिक प्रशासनाची यंत्रणा युद्धपातळीवर याकामी लागली आहे. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी या महिला आहेत पात्र लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे. राज्यातील विवाहित, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला आता नवीन बदलानुसार 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थी महिलेचे बँक खाते असणे आवश्यक आहे. तसेच यामध्ये कुटूंबातील केवळ एका अविवाहितेलाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्याशिवाय लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक असता कामा नये. योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येत असून, यासाठी लाभार्थ्याचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला या 4 पैकी कोणतेही एक ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र यासाठी ग्राह्य धरण्यात येत आहे. त्यामुळे आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रांमध्येही सुलभता आणण्यात आली आहे. यासोबतच सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा अडीच लाख रुपये उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसल्यास नवीन बदलानुसार ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आली आहे. याशिवाय बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत असणे आवश्यक असून, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशनकार्ड असणे गरजेचे आहे. या योजनेच्या अटी-शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्रही लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया योजनेचे अर्ज पोर्टल किंवा मोबाईल अॅपद्वारे, सेतू सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. तसेच ऑफलाईन अर्जाचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल, त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा आता अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ग्रामीण/आदिवासी), ग्रामपंचायत, वार्ड, सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी भरलेला अर्ज अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ग्रामीण/आदिवासी), सेतू सुविधा केंद्रामध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी त्याची पोच पावती दिली जाणार आहे. या योजनेसाठी अर्ज विनामूल्य भरून देण्यात येत आहेत. यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. अर्जदार महिलेने स्वतः वरील सुचविलेल्या ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असून, तिचे थेट छायाचित्र काढता येते. त्यामुळे ई-केवायसी करणे सोईचे आणि सुलभ होते. यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे. त्यामुळे ताई, तू मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेत नाव नोंदणी केलीय ना ! केली नसल्यास 31 ऑगस्टपर्यंत ही नाव नोंदणी कर अन् राज्य शासनाच्या या योजनेचा लाभ घे…! संकलन :- जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली ******

No comments: