23 July, 2024
_आरोग्य विभागाचा डॉ. रेखा भंडारे यांच्याकडून आढावा_ *पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेण्याचे नागरिकांना आवाहन*
हिंगोली (जिमाका), दि. 23 : सध्या पावसाळ्याचे दिवस चालू झाले आहेत व पावसाळ्यामध्ये घ्यावयाच्या काळजीबाबत सहायक संचालक (हिवताप) डॉ. रेखा भंडारे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, तालुका आरोग्य पर्यवेक्षक आरोग्य सहाय्यक, आरोग्य कर्मचारी यांची आढावा बैठक घेण्यात आली.
यावेळी सहाय्यक संचालक डॉ. रेखा भंडारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
सध्या पावसाळ्याचे दिवस चालू झाले आहेत व पावसाळ्यामध्ये जिल्ह्यातील नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याबाबत आवाहन करत, सोबतच उपस्थित अधिकारी कर्मचारी यांना सूचना दिल्या. पावसाळ्यात जलजन्य व कीटकजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. जलजन्य आजार टायफाईड, कावीळ, गॅस्ट्रो, अतिसार या आजारापासून दूर राहण्यासाठी नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. कीटक जन्य आजार डेंगू, मलेरिया, चिकनगुनिया, मेंदू ज्वर आजार टाळण्यासाठी वेळीच खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र स्तरावरील आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी मुख्यालयी राहून आरोग्य सेवा द्यावेत, अशा सूचना देण्यात आल्या.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथरोग उद्भभवू नये यासाठी नागरिकांनी घ्यावयाची काळजी
नागरिकानी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. दूषित अन्न खाऊ नये, पिण्याचे पाणी गाळून, उकळून शुद्धीकरण करून पिण्यास वापरावे. पावसाचे साचलेले पाणी वाहते करावे. गटारे, नाल्या स्वच्छ कराव्यात, खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात. डास उत्पती होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन सहाय्यक संचालक डॉ. रेखा भंडारे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी केले आहे.
कीटकजन्य आजाराबाबत घ्यावयाची काळजी :
घराच्या खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात. झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा. आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळा. या दिवशी घरातील सर्व पाणी साठवायची भांडी, ड्रम घासून स्वच्छ करा. सेप्टिक टँकच्या पाईपला जाळ्या बसवा. कोणताही ताप अंगावर काढू नका. तापात स्वतः च्या मनाने किंवा औषध दुकादारांकडून औषध घेऊ नका. साचलेले डबके, नाल्यांमध्ये जळके ऑईल किंवा रॉकेल टाकावे. नाल्या वाहत्या कराव्यात. नारळाच्या करवंट्या, फुलदाणी, कुलर्स, टायर्स, रिकामी डबकी यामध्ये पाणी साचू देऊ नये, आरोग्य कर्मचारी यांनी दैनंदिन भेटीदरम्यान कीटक शास्त्रीय सर्वेक्षण व अबेटिंग करावी, संशयित ताप रुग्णाचे रक्त नमुने घेऊन वेळेत प्रयोगशाळेत तपासणी करीता पाठवावे.
रुग्ण आढळून आल्यास तात्काळ जलदताप सर्वेक्षण करावे व ग्रामपंचायतच्या मागणीनुसार धूरफवारणी करण्यात यावी. यावेळी सहाय्यक संचालक आरोग्य सेवा हिवताप छत्रपती संभाजीनगर,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.गणेश जोगदंड, सहाय्यक जिल्हा हिवताप अधिकारी सी. जी. रणवीर, प्रयोगशाला वैधानिक अधिकारी प्रशांत भालेराव, आरोग्य सहाय्यक बाबासाहेब ठोंबरे, रामदेव जोशी, कीटक समाहरक संजय पवार, संजय बोरबळे, उमेश डाफने, माखने, मल्हारी चौफाडे आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
*********
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment