06 July, 2024
निवृत्तीवेतन धारकांनी परस्पर बँक शाखा बदलण्यापूर्वी कोषागार कार्यालयास कळविणे आवश्यक
हिंगोली, दि.०६ (जिमाका): अधिदान व लेखा अधिकारी तसेच सर्व कोषागार अधिका-यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील निवृत्तीवेतन प्रदानाचे (संवितरण) काम करणाऱ्या सर्व एजन्सी बँकांना संपर्क करून निवृत्तीवेतनधारकाने कोणत्याही प्रकारे बँक शाखा बदलण्याकरीता अर्ज, विनंती केल्यास कोषागार कार्यालयांना अवगत केल्याशिवाय बदल अनुज्ञेय न करण्याचे संचालनालय लेखा व कोषागारे यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे.
याबाबतच्या स्पष्ट सूचना पत्राद्वारे निर्गमित कराव्यात. याबाबत सर्व सहसंचालकांनी खातरजमा करून संचालनालयास एकत्रित अहवाल पाठविण्याचेही यामध्ये नमूद करण्यात आले आहे.
माहे मे-२०२४ पासून राज्यातील सर्व कोषागार कार्यालयांतील निवृत्तीवेतन शाखेमार्फत करण्यात येणारी सर्व प्रदाने ई-कुबेर कार्यप्रणालीद्वारे यशस्वीरित्या राबविण्यात येत आहे.
तत्पूर्वी प्रायोगिक तत्वावर मार्चच्या एप्रिलमध्ये देय होणाऱ्या मासिक निवृत्तीवेतन प्रदानासाठी सिंधुदुर्ग कोषागार कार्यालयामध्ये E-Kuber प्रणालीचा प्रथमतः वापर करण्यात आला.
त्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा-सावंतवाडी येथून निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारकाने कोषागार कार्यालयाच्या अपरोक्ष, त्यांची परवानगी न घेता अथवा त्यांना कोणत्याही प्रकारे माहिती न देता सावंतवाडी ऐवजी वेंगुर्ला ही बँक शाखा परस्पर बदलली. मात्र कोषागार कार्यालयाने E-Kuber द्वारे केलेले प्रदान पूर्वीच्या सावंतवाडी शाखेतील खात्यामध्ये जमा न होता अथवा परत न येता नवीन वेंगुर्ला शाखेतील खात्यामध्ये जमा झाले. दोन्हीकडे खाते क्रमांक मात्र एकच असल्याचे आढळून आले आहे.
याबाबत भारतीय रिझर्व्ह बँक यांना संपर्क साधला असता ई-कुबेर प्रणालीमध्ये IFSC बाबत कोणतेही Validation नसल्याबाबत व खाते क्रमांक यावरच आधारीत प्रदान होत आहे याबाबत माहिती मिळाली आहे.
निवृत्तीवेतनधारकाने निवृत्तीवेतन घेत असलेल्या बँकेची जिल्ह्यातील, राज्यातील अथवा राज्याबाहेरील कोणतीही शाखा निवडल्यास त्यास या प्रणालीद्वारे प्रदान होते. याबाबत कोषागार कार्यालयात कोणत्याही प्रकारे अवगत केले नसले तरीही प्रदान होते. कोषागार कार्यालयाने E-Kuber द्वारे केलेले प्रदान पूर्वीच्या शाखेतील खात्यात जमा होत नाही, परत येत नाही तर नवीन शाखेतील खात्यात जमा होते.
वास्तविक शासनाच्या प्रचलित नियम, धोरणान्वये सेवा निवृत्तीवेतनधारकाने शाखा, बँक अथवा जिल्हा बदल करताना संबंधित कोषागार कार्यालयाला कळविणे अनिवार्य आहे. कारण कोषागार कार्यालयाच्या अभिलेख्यांनुसार मासिक प्रदान, हयातीचा दाखला, अतिप्रदान वसूली, इत्यादी असल्यास, अथवा खाते सहा महिन्यापासून अधिक कालावधी करिता विनावापर राहिले आहे किंवा कसे, याबाबतचा सर्व पत्रव्यवहार सेवा निवृत्ती वेतनधारकाच्या कोषागार कार्यालयामध्ये नोंदविलेल्या बँक शाखेमध्ये होत असतो.
शासनाच्या निवृत्तीवेतन विषयक कामकाजाचे वर्गीकरण, अभिलेखे जतन पध्दती, इत्यादी प्रत्येक जिल्हानिहाय बँक, शाखा अशा प्रकारे करण्यात आले आहे. तसेच निवृत्तीवेतन विषयक सर्व संगणकीय प्रणालीमधील संरचना, लेखा परिक्षक, पर्यवेक्षक, मंजुरी अधिकारी अशा स्तरावर याच मार्गदर्शीय तत्वांनुसार करण्यात आली आहे. थोडक्यात जिल्हा बँक शाखा अशाप्रकारे कामकाजाचे वाटप व त्यानुसारच संगणकीय प्रणालीचे विकसन करण्यात आले आहे. अशा प्रकारे परस्पर नवीन शाखेमध्ये (IFSC Matching/ Mapping न होता) प्रदान वर्ग झाल्यास कोषागार कार्यालयाच्या अभिलेख्यांमध्ये त्रुटी उत्पन्न होऊ शकतात व शासनाच्या प्रदानाच्या प्रणालीचाही दुरुपयोग केला जावू शकतो, असेही त्यात कळविण्यात आले आहे.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment