23 July, 2024
उद्योजक, निर्यातदारांनी पंतप्रधान व मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रम योजनेतून नवउद्योग सुरु करावेत - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
हिंगोली (जिमाका), दि. 23 : जिल्ह्यातील सर्व उद्योजक, निर्यातदार यांनी उद्योग संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान रोजगारनिर्मिती व मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रम योजनेच्या माध्यमातून नवउद्योग सुरु करावेत. तसेच 'एक जिल्हा एक उत्पादना'च्या माध्यमातून हळदीवर जास्तीत जास्त प्रक्रिया उद्योग सुरू करुन शेतकरी उत्पादक (फार्मर प्रोड्यूसर) कंपन्यांनी आणि उद्योजकांनी निर्यातक्षम उत्पादने तयार करावीत. जेणेकरुन हिंगोली जिल्ह्याचा निर्यात व्यापार वाढून हिंगोली जिल्हा हळदीचा एक्सपर्ट हब म्हणून विकसित व्हावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.
येथील जिल्हा उद्योग केंद्रामार्फत एमएसएमई क्षेत्रासंदर्भात राज्य आणि केंद्र शासनाची धोरणे आणि उपक्रम याबाबत जागरुकता वाढविण्यासाठी इगनाईट महाराष्ट्र-2024 (IGNITE MAHARASHTRA-2024) ची एकदिवशीय जिल्हा स्तरीय कार्यशाळा आज जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
या कार्यशाळेस नांदेड उपविभागीय कार्यालयाचे अमोल इंगळे, मैत्री कक्षाचे नोडल अधिकारी पी. बी. हजारे, निर्यात सल्लागार अमोल मोहिते, सीडबीच्या सहायक व्यवस्थापक श्रीमती क्षीतिजा बलखंडे, डाक कार्यालयाचे निरीक्षक संदीप लोखंडे, न्यू इंडिया इंन्श्युरंस कंपनीचे अनिल जाधव, डीजीएफटी नागपूरचे ध्रुव पारेख, उद्योग निरीक्षक आर. एल. आहेर, आपेडा पुणे, सीडबी, आय.डी.बी.आय. कॅपिटल यांच्या सहकार्याने निर्यातदार उद्योजक, औद्योगिक समूह, बँकर्स, फार्मर प्रोड्यूसर कपंनी इत्यादी उपस्थित होते.
यावेळी मैत्री कक्षाचे नोडल अधिकारी पी. बी. हजारे यांनी शासनाकडून उद्योजकांसाठी पुरविण्यात येणाऱ्या परवान्याबाबत अंमलात आलेल्या नवीन कायद्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. डीजीएफटीचे ध्रुव पारेख यांनी जिल्ह्यातील उद्योजकांना आयात-निर्यात प्रक्रियाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले, सीडबीचे सहायक व्यवस्थापक क्षीतिजा बलखंडे यांनी सीडबीमार्फत पुरविण्यात येणाऱ्या वित्त पुरवठ्याबाबत मार्गदर्शन केले, विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगरचे अमोल मोहिते यांनी जिल्ह्याचा एक्सपोर्ट अॅक्शन प्लॅन सादर केला.
या कार्यशाळेचे प्रास्ताविक नांदेड उपविभागीय कार्यालयाचे अमोल इंगळे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. विजयकुमार निलावार यांनी केले, तर जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक शोएब कादरी यांनी आभार प्रदर्शन केले.
या कार्यशाळेस जिल्ह्यातील निर्यातदार औद्योगिक संघटनेचे ज्ञानेश्वर मामडे, प्रविण सोनी, नंदकिशोर तोष्णीवाल, औद्योगिक समुहाचे प्रतिनिधी, फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे पदाधिकारी, नवउद्योजक, निर्यातदार उद्योजक, जिल्ह्यातील औद्योगिक समुहाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी मिटकॉन हिंगोलीचे प्रकल्प अधिकारी सुभाष जाधव, खादी व ग्रामोद्योग अधिकारी भोसीकर, जिल्हा उद्योग केंद्राचे पि.व्ही. मेंढे, उद्योग निरीक्षक कु. सुदेशना सवराते, उद्योग निरीक्षक वर्षा बोरकर, महाराष्ट्र उघोजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी सुधीर आठवले यांनी सहकार्य केले.
***
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment