05 July, 2024
अतिवृष्टी, अवेळी पाऊस, गारपीटीची मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करुन घ्यावी - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
हिंगोली (जिमाका), दि. 05 : जिल्ह्यात गत दोन वर्षातील विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची मदत मिळविण्यासाठी गावातील तलाठ्याकडून विशिष्ट क्रमांक मिळवून घेत ई-केवायसी करुन घेणे अनिवार्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ आपल्या खात्याची ई-केवायसी करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
माहे सप्टेंबर-ऑक्टोबर 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे माहे मार्च-एप्रिल 2023 मध्ये झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे, जून-जुलै 2023 मधील झालेल्या अतिवृष्टीमुळे व माहे नोव्हेंबर, 2023 मधील अवेळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक, कृषि सहायक यांची त्रिस्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती. या त्रिस्तरीय समितीमार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते. आजपर्यंत 2 लाख 65 हजार 142 शेतकऱ्यांना 154 कोटी 83 लाख रुपयाचे अनुदान बँक खात्यावर वितरण करण्याची मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी जिल्ह्यातील 50 हजार 318 शेतकरी ई-केवायसी न केल्यामुळे 27 कोटी 84 लाख रुपयाचा नुकसान भरपाईचा निधी पोर्टलवर प्रलंबित आहे. शेतकऱ्यांकडून विशिष्ट क्रमांकासह लवकरात लवकर ई-केवायसी करुन घेण्याची कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सर्व तहसीलदारांना दिले आहेत.
त्या अनुषंगाने मदत व पुनवर्सन मंत्रालयाकडून निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयान्वये बाधित शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम वितरीत करण्याबाबत शासनाच्या पोर्टलवरुन यादी अपलोड करण्याची कार्यवाही करण्यात आली. ही यादी अपलोड केल्यानंतर बाधित शेतकऱ्यांना आपल्या गावातील तलाठ्याकडून VK (विशिष्ट क्रमांक) घेऊन ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. त्यासाठी तहसील कार्यालयाकडून तलाठ्यामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत.
अद्याप ई-केवायसी न केलेल्या बाधित शेतकऱ्यांनी तात्काळ जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन ती करुन घ्यावी अन्यथा आपल्या आधार लिंक खात्यावर अनुदान जमा होणार नाही. तसेच शेती पिकांच्या नुकसानीसाठी मदत व पुनर्वसन विभागाकडून दिली जाणारी मदत कोणत्या बँक खात्यात जमा झाली आहे हे पाहण्यासाठी https://mh.disastermanagement.mahait.org/paymentStatus या वेबसाईटवर पहावेत, असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment