05 July, 2024

खरीप हंगाम पीक स्पर्धेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 05 : खरीप हंगाम सन 2024 मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तूर, मूग, उडीद, सोयाबीन खरीप ज्वारी व भूईमूग या पिकांसाठी पीक स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. खरीप हंगाम पीक स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी मूग व उडीद या पिकासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै, 2024 आहे, तर ज्वारी, तूर, सोयाबीन या पिकांसाठी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक 31 ऑगस्ट, 2024 पर्यंत आहे. खरीप हंगाम सन 2024 पिक स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावेत. स्पर्धेसाठी प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र प्रवेश शुल्क असून सर्वसाधारण गटासाठी 300 रुपये व आदिवासी गटासाठी 150 रुपये राहील. सहभागी शेतकऱ्यांनी प्रवेश शुल्क स्वत: 0401-पीक संवर्धन, 104-शेती क्षेत्रांपासून प्राप्त जमा रकमा, (00)(02)-पीक स्पर्धा योजनेखालील जमा रकमा, 0401047301 या लेखा शिर्षामध्ये शासकीय कोषागारात विहित मुदतीत जमा करावेत. जमा केलेले प्रवेश शुल्क सहभागी शेतकऱ्यांना परत दिले जाणार नाही. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज, ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, सातबारा, आठ-अ चा उतारा व जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास), आधार कार्ड व बँक खात्यांचा तपशील इत्यादी कागदपत्रे संबंधित तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी कार्यालयाकडे मूग व उडीद पिकासाठी 31 जुलै तसेच ज्वारी, तूर, सोयाबीन व भूईमूग या पिकांसाठी 31 ऑगस्ट पूर्वी कार्यालयाकडे सादर करावेत. या पीक स्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे. ******

No comments: