22 July, 2024

प्रधानमंत्री पिक विमा योजनेत भाग घेण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदतवाढ सर्व शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे - जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम

हिंगोली (जिमाका), दि. 22 : राज्यात खरीप 2016 पासून प्रधानमंत्री पिक विमा योजना केंद्र शासनाच्या नियमानुसार राबविण्यात येत आहे. खरीप-2024 मध्ये केंद्र सरकारच्या विमा पोर्टलवर (www.pmfby.gov.in) थेट ऑनलाईन स्वरुपात विमा अर्ज भरण्याची सुविधा 16 जून 2024 पासून सुरु केली होती व सहभागी होण्यासाठी 15 जुलैची मुदत होती. सोमवार, दि. 15 जुलै रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत या योजनेअंतर्गत 4 लाख 21 हजार 311 विमा अर्जाव्दारे साधारण 2 लाख 75 हजार 550 हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले होते. हिंगोली जिल्ह्यात सरासरी खरीप हंगाम पेरणी क्षेत्र 3 लाख 20 हजार 830 हेक्टर आहे. गतवर्षी म्हणजेच खरीप-2023 मध्ये पिक विमा अर्ज संख्या 5 लाख 13 हजार 303 होती व विमा संरक्षित क्षेत्र 3 लाख 26 हजार हेक्टर होते. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकासाठी विमा संरक्षण घ्यावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा योजना देऊ केली आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्यासाठी शासनाने दिनांक 31 जुलै, 2024 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे. ****

No comments: