04 July, 2024
डेंगी प्रतिरोध महिना साजरा करण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 04 : राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हिंगोली जिल्ह्यामध्ये दरवर्षी प्रमाणे जुलै महिना हा डेंगी प्रतिरोध महिना म्हणून साजरा करायचा आहे. या महिन्यात डेंगी आजाराविषयी जनतेमध्ये जनजागृती निर्माण होऊन त्याच्या प्रतिरोध उपाययोजनेच्या अंमलबजावणीमध्ये त्याचा सक्रीय सहभाग प्राप्त करुन घेण्याच्या दृष्टीने दरवर्षी विविध उपक्रमाद्वारे जनजागरण मोहीम राबविण्यात येते. या मोहिमेमध्ये गाव पातळीवर डेंगीची लक्षणे, उपचार व प्रतिरोधाच्या विविध उपाययोजनांची माहिती योग्य त्या माध्यमाद्वारे जनतेपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. त्यामध्ये डासोत्पत्ती स्थाने नष्ट करुन प्रतिबंधात्मक उपाययोजनामध्ये लोकसहभाग वाढविणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे.
पत्रकार परिषद, खाजगी वैद्यकीय व्यावसायिक सभा, जलद ताप रुग्ण सर्वेक्षण, रॅली, ग्रामसभा, बाजाराच्या ठिकाणी प्रदर्शनाचे आयोजन, हस्तपत्रिका वाटप, आशा बळकटीकरणासाठी कार्यशाळेचे आयोजन, कंटेनर सर्वेक्षण, ग्रामीण आरोग्य पोषण आहार समितीची सभा, सर्व स्तरातून स्वच्छता मोहीम, दिंडीचे आयोजन, डासोत्पती स्थानात गप्पीमासे सोडण्याचा धडक कार्यक्रम, बचत गटाच्या सभा, शिक्षकासाठी सामाजिक जाणीव, सर्व स्तरातील अधिकाऱ्यांनी फवारणी कार्यक्रमाचे पर्यवेक्षण व एक दिवस कोरडा दिवस पाळणे याविषयी जनतेमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.
हिंगोली जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थेचे अधिकारी, कर्मचारी, आशा वर्कर, ग्रामसेवक, अंगणवाडी ताई, स्थानिक प्रतिष्ठित नागरिक यांचा लोक सहभाग घेऊन गावपातळीवरील डेंगी प्रतिरोध महिना साजरा करण्यात यावा, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड यांनी केले आहे.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment