05 July, 2024
मानसिक आरोग्याची लक्षणे असलेल्या व्यक्तींसाठी टोल फ्री क्रमांकावर मोफत मार्गदर्शन घ्यावे
हिंगोली (जिमाका), दि. 05 : येथील जिल्हा रुग्णालयात प्रेरणा प्रकल्प व जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम राबविला जातो. या कार्यक्रमांतर्गत उदासिनता (नैराश्य), घबराहट (बेचैनी), संशय घेणे किंवा भास होणे, चिडचिडपणा, आक्रमकता, झोपेच्या समस्या, आत्महत्येचे विचार, ताणतणाव, जुनाट डोकेदुखी, माइग्रेन, स्मृतीभ्रंश (विसरभोळेपणा), झटके, मिरगी, व्यसनाधिनता (दारु, गुटखा, तंबाखू, अफू, गांजा) आदी लक्षणे असलेल्या व्यक्तींना औषधोपचार व समुपदेशन केले जाते.
वरीलपैकी कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर जिल्हा रुग्णालय हिंगोली येथील रूम क्र. 49 येथे भेट द्यावी. तसेच घरी बसून सुध्दा वरील प्रकारच्या समस्या असतील तर टेलिमानस टोल फ्री क्र. 14416 किंवा 1800894416 या क्रमांकावर कॉल करुन मार्गदर्शन किंवा समुपदेशन घेऊ शकता.
प्रत्येक महिन्याला तालुकास्तरावर प्रेरणा प्रकल्प व जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम टीमची भेट असते. यामध्ये महिन्याचा पहिला मंगळवार उपजिल्हा रुग्णालय वसमत, दुसरा मंगळवार ग्रामीण रुग्णालय आखाडा बाळापूर, दुसरा गुरुवार ग्रामीण रुग्णालय औंढा, तिसरा सोमवार उपजिल्हा रुग्णालय कळमनुरी, तिसरा बुधवार ग्रामीण रुग्णालय सेनगाव येथे सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत भेट देण्यात येते.
टेलिमानस टोल फ्री क्र. 14416 किंवा 1800894416 या क्रमांकावर फोन करुन मोफत मार्गदर्शन घ्यावेत, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलाश शेळके, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी केले आहे.
********
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment