01 July, 2024

ज्येष्ठ साहित्यिक, कलावंतांनी मानधन सन्मान योजनेसाठी आधार प्रमाणिकरण करून घेण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि.01: राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांना मानधन सन्मान योजनेमध्ये लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकीकरण (व्हेरीफिकेशन) करून घेणे आणि उर्वरीत लाभार्थ्यांना आधार कार्ड उपलब्ध करून घेण्याचे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके यांनी केले आहे. राज्यातील मान्यवर वृध्द साहित्यिक व कलावंतांना मानधन योजना सन 1954-55पासून संपूर्ण राज्यात सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत राबविली जाते. सद्यस्थितीत कलावंतांना ऑनलाईन पद्धतीने 5 हजार रुपये मानधन अदा करण्यात येते. ही योजना प्रत्यक्ष लाभहस्तांतरण (डीबीटी)मार्फत राबविण्यासाठी जुन्या लाभार्थ्यांची परिपूर्ण माहिती उदा. आधार कार्ड, जन्म दिनांक (आधार कार्डवर नमूद असलेला), मोबाईल नंबर आवश्यक आहे. त्यासाठी संचालनालय स्तरावर माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांचे मानधन देण्यासाठी त्यांचे पडताळणी क्रमांक आवश्यक आहेत. त्यासाठी शासनाने https://mahakalasanman.org/AadharVerification.aspx ही लिंक तयार केली असून या लिंकवर क्लिक करून आपले आधार क्रमांक व इतर माहिती स्वतःच्या मोबाईल वरून किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर, आपले सरकार सेवा केंद्र व महा ई सेवा केंद्र येथून पडताळणी करू शकतात, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ****

No comments: