10 November, 2020

निवृत्ती वेतन धारकांनी हयातीचा दाखला 31 डिसेंबर पर्यंत सादर करण्याचे आवाहन

 

 

हिंगोली, दि. 10 : निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्ती वेतन धारकांना महाराष्ट्र कोषागार नियम 1968 च्या नियम 335 नुसार दरवर्षी दिनांक 1 नोव्हेंबर रोजीचा हयातीचा दाखला सादर करावा लागतो. तो हयातीचा दाखला मुख्यत: संबंधित निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्ती वेतन धारक ज्या बँकेतून निवृत्ती वेतन घेतात त्या बँकेमार्फत जिल्हा कोषागारात सादर केला जातो.

कोव्हिड-19 चा प्रादुर्भाव विचारात घेऊन राज्य शासनाने निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना हयातीचा दाखला सादर करण्यासाठी दिनांक 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर, 2020 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्ती वेतन धारकांनी हयातीचा दाखला सादर करण्यासाठी संबंधित बँकेशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

000000

09 November, 2020

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 12 रुग्ण ; तर 26 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज

 


·  85 रुग्णांवर उपचार सुरु

 

 

        हिंगोली,दि. 09 : जिल्ह्यात 12 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसरात 03 व्यक्ती व कळमनुरी परिसर 01 व्यक्ती तर आरटीपीसीआरद्वारे हिंगोली परिसरात 04 व्यक्ती  व सेनगाव  परिसरात 04 व्यक्ती असे एकूण 12 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 26 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

       सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 12 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. सद्य:स्थितीत तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 3 हजार 212 रुग्ण झाले असून, त्यापैकी 3 हजार 76 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 85 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 51 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

 

****

 

‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना’ विषयावर ऑनलाईन वेबीनारचे आयोजन

 


हिंगोली,दि. 09 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली अंतर्गत दि. 11 नोव्हेंबर, 2020 रोजी सकाळी 11.00 ते 12.00  या वेळेत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना या विषयावरर ऑनलाईन वेबीनारच्या माध्यमातून समुपदेशन व करिअर मार्गदर्शन सत्राचे आयोजन गुगल मिट (Google meet)  वर URL : https://meet.google.com/oef-czso-sek या लिंकवर आयोजित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना या विषयावर हिंगोली येथील जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक एस.एम.कादरी हे समुपदेशन करणार आहेत.

त्याअनुषंगाने पुढील मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे. https://meet.google.com/oef-czso-sek या लिंकवर क्लिक करावे. आपल्याकडे Google meet app यापूर्वी install केलेले नसेल तर install करुन घ्यावे. आपण Google meet app मधून कनेक्ट झाल्यानंतर Ask to join वर क्लिक करावे. वेळेपूर्वी 10 मिनिटे अगोदर जॉईन करावे. या सत्रामध्ये सहभागी होण्यासाठी दिलेल्या लिंक मधून कनेक्ट झाल्यावर लगेच आपला व्हिडिओ व माईक बंद करावा. सत्राच्या शेवटी काही प्रश्न विचारावयाचे असल्यास माईक सुरु करुन विचारावे व लगेच माईक बंद करण्याची दक्षता घ्यावी. प्रश्न विचारतांना मोजक्या शब्दात विचारावेत.

या वेबीनार बाबत काही अडचण आल्यास 02456-224574 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्र.सो. खंदारे यांनी केले आहे.

 

****

 

जिल्ह्यात कलम 37 (1)(3) चे आदेश लागू

 


हिंगोली,दि.09:   जिल्ह्यात कोरोना (कोविड-19) विषाणूचा प्रादूर्भाव वाढत असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने संपूर्ण जिल्ह्यामध्ये बंदोबस्त चालू आहे. तसेच दि. 13 नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी, दि. 14 नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपुजन व दि. 16 नोव्हेंबर 2020 रोजी पाडवा व भाऊबीज आहे. तसेच विविध संघटनेतर्फे त्यांच्या मागणी संदर्भाता मोर्चे, धरणे आंदोलने, रास्तारोको, उपोषणे सुरु असून अशा विविध संघटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे विविध प्रश्न हाताळण्यासाठी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरीता संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात  दि. 09 नोव्हेंबर, 2020 रोजीचे 06.00 वाजल्यापासून ते दि. 23 नोव्हेंबर, 2020 रोजीचे 24.00 वाजेपावेतो मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) लागू करण्यात येत असल्याचे आदेश अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांनी काढले आहेत.

त्यानुसार शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या जवळ शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाहीत. लाठ्या किंवा काठ्या, शारीरिक इजा होण्यास त्या कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तू जवळ बाळगणार नाहीत. कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटक द्रव्ये जवळ बाळगणार नाहीत. दगड, क्षेपणीक उपकरणे किंवा सर्व प्रवर्तक द्रव्य गोळा करून ठेवणार नाही किंवा जवळ बाळगणार नाहीत. आवेषी भांडणे, अंगविक्षेप, विटंबनात्मक नकला करणार नाही. सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल अशी चिन्हे निशाणी, घोषणा फलक किंवा अशी कोणतीही वस्तु जवळ बाळगणार नाही किंवा ठेवणार नाहीत. व्यक्ती किंवा समुहाच्या भावना जाणून बुजून दुखावतील या उद्देशाने वाद्य वाजणार नाहीत किंवा असभ्य वर्तन करणार नाहीत. जिल्ह्यात पाच किंवा पाच पेक्षा अधिक व्यक्तींनी रस्त्यावर जमण्यास सक्त मनाई करण्यात येत आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.  तसेच विशेषरित्या परवानगी देण्याचे अधिकार पोलीस अधीक्षक, हिंगोली किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या पोलीस अधिकारी यांना राहतील, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी, हिंगोली  यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

****

 

मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन दिपावली सण साजरा करावा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांचे आवाहन

 


हिंगोली,दि. 09 : जागतिक आरोग्‍य संघटनेने कोव्हिड (COVID-19) या विषाणूमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्‍य म्‍हणून घोषित केलेला आहे. तसेच कोरोना विषाणूचा प्रसार भारतात, महाराष्‍ट्रातील शहरात गतीने प्रसारीत होत आहे. नुकतेच हिंगोली शहरातही कोव्हिड-19 चे संसर्ग बाधीत रुग्‍ण आढळून आले आहेत.  तसेच राज्‍य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी राज्‍यात साथीचा रोग प्रतिबंधात्‍मक कायदा 1897 हा दि. 13 मार्च, 2020 पासून लागू करुन खंड 2,3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित करुन त्‍याबाबतची नियमावली तयार करण्‍यात आलेली आहे. तसेच शासनाने              दि. 17 जुलै, 2020  रोजीच्या शासन परिपत्रकान्वये मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत.

कोव्हिड-19 मुळे उध्दभलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीची दिपावली साध्या पध्दतीने साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना विहित करण्यात आलेल्या आहेत.

1) राज्यात तसेच मोठ्या शहरांमध्ये अद्यापही  कोरोनाचे  रुग्ण  मोठया प्रमाणावर  आढळुन येत आहेत. चालू वर्षी कोविड या संसर्गजन्य रोगाचा झालेला प्रादुर्भाव विचारात घेऊन गेल्या सात-आठ  महिन्यात आलेले सर्वधर्मीय सण, उत्सव अत्यंत साध्या पध्दतीने व लोकांनी एकत्रित न येता साजरे केले आहेत. या वर्षीचा दिपावली उत्सव कोविड कालावधीत साजऱ्या केलेल्या अन्य उत्सवांप्रमाणे  पूर्ण खबरदारी घेऊन अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करावा.

            2) कोविड संसर्गामुळे बंद करण्यात आलेली राज्यातील धार्मिक स्थळे अद्याप खुली करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे साजरा केला जाणारा दिपावली उत्सव घरगुती स्वरुपात मर्यादित राहील यांची दक्षता घेण्यात यावी. उत्सव कालावधीत नागरिकांनी विशेष करुन ज्येष्ठ नागरिक तसेच लहान बालके यांनी घराबाहेर पडण्याचे शक्यतो टाळावे. तसेच नागरिकांनी गर्दी टाळावी व मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊ नये, मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे, जेणेकरुन कोरोनाचा संसर्ग, संक्रमण वाढणार नाही.

3) दिपावली हा दिव्यांचा तसेच प्रकाशाचा उत्सव मानला जातो. या उत्सवादरम्यान दरवर्षी मोठया प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते. त्यामुळे वायु व ध्वनीप्रदुषंणाची पातळी वाढून जनसामान्यांच्या तसेच प्राणीमात्रांच्या आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम दिपावली उत्सवानंतर बराच कालावधीपर्यत दिसून येतात. कोरोना आजारामुळे परिणाम झालेल्या अनेकांना फटाक्यांच्या धुरामुळे वायु प्रदुषणाचा थेट परिणाम होऊन त्रास होण्याची भीती आहे. ही बाब विचारात घेऊन नागरिकांनी चालू वर्षी फटाके फोडण्याचे टाळावे, त्याचा त्रास होऊ शकतो. त्या ऐवजी  दिव्यांची आरास मोठया प्रमाणावर करुन उत्सव साजरा करावा.

4) या उत्सवादरम्यान कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक उपक्रम, कार्यक्रम उदा. दिपावली पहाट आयोजित करण्यात येऊ नयेत. आयोजित करावयाचे झाल्यास ऑनलाईन, केबल नेटवर्क,  फेसबूक इत्यादी माध्यमांव्दारे त्यांचे प्रसारण करावे.

5) सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम, शिबीरे (उदा.रक्तदान)  आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याव्दारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता यांबाबत जनजागृती करण्यात यावी. मात्र त्या ठिकाणी देखील लोकांनी एकाच वेळी मोठया प्रमाणावर एकत्रित येऊ नये.

6) कोव्हिड-19  या विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण  विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस , स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.

कोव्‍हीड 19 विषाणूचा प्रसार रोखणे हे प्रत्‍येकाचे कर्तव्‍य आहे. आपण सर्वानी यासाठी सहकार्य केल्‍यास रोगाचा प्रसार रोखण्‍यास फार मोठी मदत होणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी वरील मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन दिपावली सण साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.

****

06 November, 2020

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 04 रुग्ण ; तर 06 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज

 


·  78 रुग्णांवर उपचार सुरु तर एकाचा मृत्यू

 

          हिंगोली,दि. 06 : जिल्ह्यात 04 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

         आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसरात 01 व्यक्ती व औंढा परिसर 01 व्यक्ती  तर आरटीपीसीआरद्वारे  हिंगोली  परिसरात 02 व्यक्ती असे एकूण 04 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.  तर आज 06 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.तर आज एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

       सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी  18  रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

        जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 3 हजार 155 रुग्ण झाले असून, त्यापैकी 3 हजार 26 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 78 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 51 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

****

सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

 


हिंगोली, दि. 06 : जिल्ह्यात सन 2020 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुका लक्षात घेता सरपंच पदाचे राज्यस्तरावर जिल्हानिहाय आरक्षण निश्चित केले आहे. जिल्ह्यातील सर्व तहसीलदार यांना तालुकानिहाय ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षणाबाबत कळविण्यात आले आहे.

तालुकास्तरावर मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणुक नियम 1964 नियम 2-अ (1)(2) अन्वये पुढील पाच वर्षाच्या कालावधीसाठी तालुकास्तरावर जिल्ह्यासाठी प्राप्त झालेल्या आरक्षित पदाचे वाटप तालुकानिहाय करण्यात आलेले आहे. सरपंच पदाच्या आरक्षणाची (महिला पदासह) कार्यवाही करण्यासाठी तालुकानिहाय संपर्क अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे.  

नेमणूक करण्यात आलेल्या संपर्क अधिकाऱ्यांचे नाव, तालुका व आरक्षण काढण्याचा दिनांक व वेळ पुढील प्रमाणे आहे.

  सेनगाव व हिंगोली तालुक्यासाठी संपर्क अधिकारी म्हणून हिंगोलीचे उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांची नेमणूक करण्यात आली असून सेनगाव तालुक्याची आरक्षण सोडत दि. 9 नोव्हेंबर, 2020 रोजी व हिंगोली तालुक्याची आरक्षण सोडत दि. 10 नोव्हेंबर, 2020 रोजी दुपारी 12.00 वाजता काढण्यात येणार आहे.

वसमत व औंढा नागनाथ तालुक्यासाठी संपर्क अधिकारी म्हणून वसमतचे उपविभागीय अधिकारी प्रविण फुलारी यांची नेमणूक करण्यात आली असून वसमत तालुक्याची आरक्षण सोडत दि. 9 नोव्हेंबर, 2020 रोजी व औंढा नागनाथ तालुक्याची आरक्षण सोडत दि. 10 नोव्हेंबर, 2020 रोजी दुपारी 12.00 वाजता काढण्यात येणार आहे. तर कळमनुरी तालुक्यासाठी संपर्क अधिकारी म्हणून कळमनुरीचे उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांची नेमणूक करण्यात आली असून कळमनुरी तालुक्याची आरक्षण सोडत दिनांक 11 नोव्हेंबर, 2020 रोजी दुपारी 12.00 वाजता काढण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविली आहे.   

****