21 April, 2025

'अँग्रीस्टँक'चे लाभ मिळविण्यासाठी शेतक-यांनी फार्मर आयडी बनविणे अनिवार्य- जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

हिंगोली, दि. २१(जिमाका): राज्यातील कृषि क्षेत्रात डिजीटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारक लाभ शेतकऱ्यांना मिळावा, या उद्देश्याने राज्यात राबविण्यात येणा-या अँग्रिस्टॅक योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतक-यांनी शेतकरी ओळखपत्र (फार्मर आयडी) बनविणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शेतक-यांनी आपापले फार्मर आयडी विनाविलंब तयार करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी शेतक-यांना केले आहे. 'अँग्रिस्टँक' या योजनेंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच, शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकांचा माहिती संच व शेतांचे भू संदर्भिकृत यांचा माहिती संच एकत्रितरित्या तयार करण्यात येत आहेत. त्यामधील शेतकऱ्यांचा माहिती संच तयार करण्यासाठी महसूल अधिकार अभिलेखातील शेतकऱ्याची आणि शेताची माहिती घेऊन त्यानुसार शेतकऱ्याचा आधार क्रमांक हा त्या माहितीशी जोडून प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतांसह एकत्रितरीत्या शेतकरी ओळख क्रमांक देण्यात येत आहे. त्यानुषंगाने कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळखपत्र क्रमांक १५ एप्रिलपासून अनिवार्य करण्यात आले आहे. कृषि विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांसाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक अनिवार्य करण्यात आल्याने त्याबाबत सर्व संबंधित पोर्टल, संकेतस्थळे, ऑनलाईन प्रणाली इ. मध्ये सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा करण्याची कार्यवाही कृषि आयुक्तामार्फत करण्यात‌ येत आहे. शेतकरी ओळख क्रमांक आणि त्याच्याशी संलग्नित डेटा म्हणजेच जमीन आणि त्यावर घेतलेली पिके या कृषी विभागामार्फत वापरत असलेल्या विविध ऑनलाईन प्रणालीशी अँप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेसद्वारे अँग्रिस्टेक या प्रणालीशी जोडण्यासाठी आवश्यक कार्यवाही आयुक्त (जमाबंदी) तथा संचालक भूमिअभिलेख महाराष्ट्र राज्य, पुणे व आयुक्त कृषि हे समन्वयाने करणार आहेत. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप शेतकरी ओळखपत्र क्रमांकासाठी नोंदणी केलेली नाही, त्या शेतकऱ्यांनी तातडीने या पोर्टलवर नोंदणी करावी. उर्वरित शेतक-यांना नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित करावे. ही नोंदणी करण्यासाठी ग्राम कृषी विकास समिती, सीएससी, आणि क्षेत्रीय यंत्रणेची मदत घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक आवश्यक असल्याबाबत आयुक्त (कृषि) यांनी पुढाकार घेण्याचे शासन निर्णयात नमूद केले असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे. **

19 April, 2025

हिंगोली जिल्ह्यासाठी यलो अलर्ट

हिंगोली, दि.१९ (जिमाका): प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार हिंगोली जिल्ह्यासाठी आज शनिवार, व उद्या रविवारी (दि.१९ व दि. २०) दोन दिवस येलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या दोन दिवसांच्या काळात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची अधिक शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. या नैसर्गिक आपत्तीसंदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणी जनतेने खबरदारी घ्यावी. खबरदारीची उपाययोजना म्हणून योग्य ती काळजी घ्यावी. काय करावे :- तहान नसली तरी पुरेसे पाणी प्या. अपस्मार, हदयरोग, मूत्रपिंड, यकृतविषयक आजारांमुळे ज्यांना शरीरात द्रवपदार्थ टिकवण्याचा प्रश्न येतो. त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच द्रवपदार्थ किंवा पाणी प्राशन करावे. ओआरएस म्हणजेच तोंडाने घ्यावयाचे शरीरातले पाणी वाढवणारे द्रवपदार्थ, घरगुती लस्सी, भाताची पेज, लिंबूपाणी, ताक, नारळाचे पाणी घ्या. हलक्या रंगाचे वजनाला हलके आणी सौलसर सुती कपडे वापरा. घराबाहेर असाल तर डोके झाका. एखादे कापड वापरा, टोपी पाला किंवा छत्री वापरा. डोळ्यांच्या सुरक्षतेसाठी गॉगल वापरा आणि उन्हापासून कातडीचाही बचाव करायला सनस्क्रीम वापरा. अतिउष्णतेमुळे ज्यांना सर्वाधिक हानी पोहोचेल असे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, आजारी किंवा स्थूल व्यक्तींची विशेष काळली घ्या. हे करणे टाळा- उन्हात जायचे टाळा, विशेषतः दुपारी १२ ते ०३ मध्ये दुपारी बाहेर असताना श्रमाची कामे टाळा. अनवाणी बाहेर जाऊ नका. अतिउष्णतेमुळे ज्यांना सर्वाधिक स्वयंपाक करणे टाळा. दारं खिडक्या उघड्या ठेऊन अन्न शिजवण्याचे क्षेत्र स्वयंपाकघर हवेशीर राहील बघा. अल्कोहोल म्हणजे दारु, चहा, कॉफी, शीतपेय टाळा त्यातून शरीरात पाणी कमी होते. उच्च प्रधिनयुक्त मिठाचे प्रमाण जास्त असलेले किंवा तिखट तसेच तेलकट अन्न खाऊ नका. शिळे अन्न खाऊ नका. चारचाकी वाहन लावून ठेवताना त्यात लहान मुले किंवा प्राणी ठेऊ नका. चमकणारे दिवे किंवा बल्ब वापरू नका, त्यातुन अनावश्यक उष्णता निर्माण होते, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे. ****

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंर्तगत हिंगोलीतून ८०० भाविक अयोध्येकडे रवाना

हिंगोली, दि. १९ (जिमाका): मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंर्तंगत आज हिंगोली जिल्ह्यातील ८०० भाविकांना घेऊन हिंगोली - अयोध्या (गाडी नंबर - ००७१९/००७२०) ही रेल्वे हिंगोली रेल्वेस्थानकावरून सकाळी ११ वाजता निघाली. या रेल्वेला आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, अपर जिल्हाधिकारी अनिल माचेवाड, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, समाज कल्याण विभाग (लातूर)चे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त यादव गायकवाड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके यांनी हिरवा झेंडा दाखवला. विविध रंगाच्या फुग्यांनी सजवलेली श्री राम दर्शन अयोध्या धाम योजना ही रेल्वे 'जय श्री राम' या भाविकांच्या घोषणांनी मार्गस्थ झाली. या १४ डब्बे असेलल्या रेल्वेचे चालक दिनेश धोटे, संदीप कांबळे हे असून, विनय दखणे हे गार्ड आहेत. शासनाने राज्यातील सर्वधर्मीय 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांची तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ सुरु केली आहे. या योजनेंतर्गत प्रति व्यक्ती 30 हजार रुपये इतके अनुदान प्रवास खर्चासाठी देण्यात येणार आहे. ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन’ योजनेमध्ये भारतातील 73 व राज्यातील 66 प्रमुख तीर्थक्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत निर्धारित तीर्थस्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एकवेळ लाभ घेता येणार आहे. प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रति व्यक्ती 30 हजार रुपये इतकी राहील. यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास इ.सर्व बाबींचा समावेश असणार आहे. या योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात हिंगोली जिल्ह्यातील ८०० नागरिकांना आज उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडा दाखवून रेल्वेने अयोध्येला रवाना करण्यात आले आहे. या भाविकांसोबत एक वैद्यकीय अधिकाऱ्यांसह सात जणाचे आरोग्य पथक तसेच त्यांच्यासोबत २५ कर्मचाऱ्यांचे पथक पाठविण्यात आले आहे. ****

17 April, 2025

मोटार कार, ट्रॅक्टर, ट्रॉली संवर्गासाठी नवीन वाहन क्रमांक मालिका चालू

हिंगोली (जिमाका), दि. 17 : यापूर्वीची मोटार कार, ट्रॅक्टर, ट्रॉली संवर्गासाठीची मालिका एमएच-38-एडी ही संपुष्टात आल्यामुळे उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने नवीन मालिका एमएच-38-एके0001 ते 9999 ही मालिका चालू करण्यात येत आहे. ज्या वाहन मालकांना वाहनासाठी आकर्षक क्रमांक राखीव करावयाचा आहे. त्यांनी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधून किंवा ऑनलाईन पध्दतीने आपला आकर्षक क्रमांक विहित शासकीय शुल्क भरुन राखीव करावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल गावडे यांनी केले आहे. ******

हिंगोली तालुक्यातील 111 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत बुधवारी

हिंगोली (जिमाका), दि. 17 : जिल्हाधिकारी हिंगोली यांनी अधिसूचित केल्यानुसार हिंगोली तालुक्यातील 111 ग्रामपंचायतीतून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिला (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग यातील महिलासह) प्रवर्गाच्या सरपंचाची पदे सन 2025-2030 साठी आरक्षित करावयाचे निर्देश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार हिंगोली तालुक्यातील 111 ग्रामपंचायतीचे निश्चित करण्यात आलेल्या संख्येइतकी सरपंच पदाची निवड सर्वांसमक्ष थेट, चिठ्ठी सोडत पध्दतीने आरक्षित करण्यासाठी बुधवार (दि.२३)/रोजी दुपारी १२ वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय, हिंगोली येथील सभागृहात सभा आयोजित करण्यात आली आहे. आयोजित सभेस हिंगोली तालुक्यातील 111 ग्रामपंचायतीच्या सर्व नागरिकांनी उपस्थित राहावेत, असे आवाहन तहसीलदार, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. ******

महिला लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन

हिंगोली (जिमाका), दि. 17 : राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला समान हक्क व समान संधी असा मूलभूत हक्क दिलेला आहे. त्याअंतर्गत समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे. तसेच त्यांच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी किंवा तिसऱ्या सोमवारी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतर येणाऱ्या कामकाजाच्या दिवशी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन राबविण्यात येतो. माहे एप्रिल, 2025 च्या महिला लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, (दि. 21 एप्रिल) रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे. समस्याग्रस्त व पीडित महिलांनी त्यांच्या अडचणी मांडण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, कक्ष क्र. एस-7, हिंगोली यांच्या कार्यालयात सादर करावेत. यामध्ये न्याय प्रविष्ठ प्रकरणे, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक ती कागदपत्रे न जोडलेले, सेवा, आस्थापनाविषयक बाबी, तक्रार निवेदन वैयक्तिक स्वरुपाची नसेल असे अर्ज स्विकारले जाणार नाहीत. समस्याग्रस्त व पीडित महिलांनी शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या व्यासपीठाचा उपयोग आपल्या अडचणी सोडविण्यासाठी करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे. **

मार्च अखेरचे ईआर-1 त्रैमासिक विवरणपत्र 30 एप्रिलपर्यंत सादर करण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 17 : सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच खाजगी आस्थापनांनी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांच्याकडे आपल्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांची माहितीबाबतचे माहे मार्च,2025 अखेरचे ईआर-1 त्रैमासिक विवरणपत्र www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर दि. 30 एप्रिल,2025 पर्यंत ऑनलाईन भरावेत. माहे एप्रिल-2025 ची मासिक वेतन देयके दाखल करताना ईआर-1 भरुन दिल्याचे ऑनलाईन प्रमाणपत्र देयकासोबत जोडणे आवश्यक आहे. याशिवाय एप्रिल, 2025 ची वेतन देयके स्वीकारले जाणार नाहीत याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. तसेच सर्व कार्यालयांना जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,हिंगोली या कार्यालयामार्फत युजर आयडी व पासवर्ड यापूर्वीच कळविण्यात आलेले आहेत. त्यानुसार सर्व कार्यालयानी आपला ई-मेल पत्ता, दूरध्वनी क्रमांक, पत्ता, टॅन क्रमांक, पॅन क्रमांक टाकून आपली प्रोफाईल अद्यावत करावी, असे आवाहन सहायक आयुक्त , कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, हिंगोली यांनी केले आहे. ***