03 November, 2026

पीक कर्जमाफीतील पात्र शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज द्या- जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

▶️ दत्तक गावातील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील कर्जमुक्त झालेल्या शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्ट 
निर्देश

हिंगोली, दि.३ (जिमाका) : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीकामांसाठी वेळेत पीक कर्ज उपलब्ध व्हावे, तसेच नवउद्योजकांना उद्योग उभारणीसाठी आर्थिक पाठबळ मिळावे, यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील बँकांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. 

या बैठकीत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) अंतर्गत उद्योग कर्ज वितरण तसेच पीक कर्ज वाटपाचाही सविस्तर आढावा घेण्यात आला. 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र लाभार्थ्यांना पुन्हा पीक कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी बँकांना महत्त्वपूर्ण निर्देश दिले.

पीक कर्जमाफी योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले आहे, अशा पात्र शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज मिळण्यासाठी बँकांनी सकारात्मक भूमिका घ्यावी. शेतकऱ्यांना त्यांच्या सोयीनुसार दत्तक गाव असलेल्या बँकेतून किंवा ज्या बँकेत त्यांचे पूर्वीचे पीक कर्ज माफ झाले आहे, त्याच बँकेमार्फत पुन्हा पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे. यामुळे पात्र शेतकऱ्यांना नव्या हंगामासाठी आवश्यक आर्थिक मदत वेळेत मिळण्यास मदत होईल. पीक कर्जासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना अनावश्यक अडचणींचा सामना करावा लागू नये, याची दक्षता सर्व बँकांनी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी दिले.

शेती हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आणि हिंगोली जिल्ह्याचा महत्त्वाचा आधार आहे. जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना वेळेत कर्ज उपलब्ध झाल्यास त्यांना बियाणे, खते, कीटकनाशके तसेच शेतीच्या इतर आवश्यक बाबींसाठी आर्थिक नियोजन करणे सुलभ होते. त्यामुळे पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया अधिक गतिमान, सुलभ करून पात्र शेतकऱ्यांना प्राधान्याने कर्ज उपलब्ध करून देण्याची आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करावी, असेही जिल्हाधिकारी गुप्ता यांनी सांगितले.

*मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत उद्योग कर्ज वाटपाला गती द्या*

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती, नवउद्योजक तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांना उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी बँकांमार्फत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. या योजनेच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीला चालना मिळण्याबरोबरच युवकांना स्वावलंबी होण्याची संधी मिळते. त्यामुळे या योजनेअंतर्गत प्राप्त कर्ज प्रकरणांचा बँकांनी प्राधान्याने निपटारा करावा. पात्र लाभार्थ्यांना कर्ज मंजुरी व वितरणासाठी अनावश्यक विलंब करू नये, अशा सूचनाही जिल्हाधिकारी गुप्ता यांनी दिल्या.

जिल्ह्यातील सर्व बँकांनी पीक कर्ज वाटप आणि उद्योग कर्ज वितरणाबाबत समन्वयाने काम करावे. शेतकरी आणि नवउद्योजकांना बँकिंग सेवांचा लाभ सुलभतेने मिळेल, यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचविण्याच्या दृष्टीने बँकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही जिल्हाधिकारी गुप्ता यांनी स्पष्ट केले.

या बैठकीत जिल्ह्यातील विविध बँकांच्या माध्यमातून सुरू असलेल्या पीक कर्ज वाटपाची तसेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत उद्योग कर्ज वितरणाची सद्यस्थिती जिल्हाधिकारी गुप्ता यांनी जाणून घेतली. शेतकरी आणि नवउद्योजकांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी बँकांनी अधिक संवेदनशीलतेने व जबाबदारीने काम करावे, असेही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता म्हणाले.

दुष्काळात शेतकऱ्यांकडून सक्तीची कर्जवसुली करू नये. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

मायक्रो फायनान्स कंपन्यांना जिल्हा प्रशासनाच्या सूचना; दबाव तंत्राचा वापर टाळण्याचेही आवाहन 
हिंगोली, दि. ३ नोव्हेंबर (जिमाका) : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांकडून कर्जाच्या हप्त्यांची सक्तीने वसुली करू नये. तसेच कर्जवसुलीसाठी कोणत्याही प्रकारच्या दबाव तंत्राचा वापर करू नये, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या प्रतिनिधींना दिल्या आहेत.

दुष्काळी परिस्थितीतही मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून शेतकऱ्यांकडे कर्जाच्या हप्त्यांची वसुली केली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यांतील मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक (ता. ०२) घेण्यात आली.
 दुष्काळी परिस्थिती घोषित 
तालुक्यांमध्ये पीक कर्जाचे पुनर्गठन आणि शेतीशी निगडित अल्पमुदतीच्या कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत.
या शासन निर्णयाच्या पार्श्वभूमीवर मायक्रो फायनान्स कंपन्यांनी शेतकऱ्यांकडून सक्तीची कर्जवसुली करू नये. कर्जवसुलीसाठी दबाव आणू नये. तसेच वसुलीच्या तगाद्यामुळे शेतकऱ्यांना नैराश्य येऊन आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याची वेळ येणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही निर्देश बैठकीत जिल्हाधिकारी गुप्ता यांनी दिले आहेत.

या बैठकीस जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सुरेखा फुपाटे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक सुजित झोडगे, तसेच मायक्रो फायनान्स व इतर फायनान्स कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
*****

एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांना एचएसआरपी क्रमांकपट्टी बसविणे बंधनकारक

क्रमांकपट्टी न बसविल्यास दंडात्मक कारवाईसह वाहनविषयक विविध सेवांवर निर्बंध

हिंगोली, दि. ३ (जिमाका) : जिल्ह्यात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकपट्टी (एचएसआरपी) बसविणे बंधनकारक आहे. एचएसआरपी बसविण्याची निर्धारित मुदत संपुष्टात आली असून, १ जुलै २०२६ पासून अशा क्रमांकपट्ट्या न बसविलेल्या वाहनांवर वायुवेग पथकांमार्फत कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. यापुढेही एचएसआरपी न बसविणाऱ्या वाहनांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश मरगू जाधव यांनी दिली आहे.

केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम ५० नुसार वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकपट्टी बसविण्याची तरतूद आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने रिट याचिका क्र. १३०२९/१९८५ (एम.सी. मेहता विरुद्ध केंद्र शासन) या प्रकरणात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना एचएसआरपी बसविण्याचे निर्देश दिले आहेत.

एचएसआरपी न बसविलेल्या वाहनांच्या मालकांना वाहन हस्तांतरण, कर्जबोजा चढविणे किंवा उतरविणे आदी कामांवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसेच अशा वाहनांची पुनर्नोंदणी, वाहनातील बदल आणि परवाना नूतनीकरण यांसारखी कामे थांबविण्यात येणार आहेत. यात योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणास अपवाद ठेवण्यात आला आहे.

तरी हिंगोली जिल्ह्यातील १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनधारकांनी आपल्या वाहनांना तातडीने उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकपट्टी बसवून घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश मरगू जाधव यांनी केले आहे.

02 November, 2026

दर्जेदार आरोग्य सुविधेला प्राधान्य द्या- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

⏺️जन आरोग्य संवाद यात्रेदरम्यान कॅथलॅबची पाहणी 
⏺️जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कामाचे केले कौतुक
हिंगोली, दिनांक 2 (जिमाका) : अतिशय उच्च अशा दर्जाची सुविधा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये कॅथलॅबच्या माध्यमातून हिंगोली वासियांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे, अशाच प्रकारच्या दर्जेदार आरोग्य सुविधेला प्राधान्य द्या. रुग्णांनीही जिल्हा सामान्य रुग्णालयातील सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

जिल्हा सामान्य रुग्णालयात सुसज्ज स्वरूपात निर्माण करण्यात आलेल्या कॅथलॅब व जिल्हा सामान्य रुग्णालयातील इतर सुविधांची पाहणी मंत्री आबिटकर यांनी केली. आमदार संतोष बांगर, आरोग्य विभागाचे आयुक्त संजय काटकर, आरोग्य सेवा संचालक डॉ. विजय कंदेवाड, उपसंचालक डॉ. कांचन वानेरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके तसेच छत्रपती संभाजीनगर येथील आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. संतोष कडले उपस्थित होते.

यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयात नव्याने तयार करण्यात आलेल्या कॅथलॅबसह इतर सर्व विभागाची पाहणी मंत्री आबिटकर यांनी केली. तसेच आमदार बांगर यांनीही जिल्हा सामान्य रुग्णालयात देण्यात येत असलेल्या सेवेचे कौतुक करत जिल्ह्यातील रुग्णांना रुग्णालय उत्तम सेवा सुविधा देत असल्याचे सांगितले. जिल्हा शल्य चिकित्सक यांनीही रुग्णालयात उपलब्ध असलेल्या सेवेबाबत सविस्तर माहिती दिली. 
********

मौजे कनका येथे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाची आरोग्यमंत्र्यांकडून प्रशंसा!

हिंगोली, दि. २ नोव्हेंबर : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत मौजे कनका येथे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी भेट दिली.  राष्ट्रीय बाल संस्थे कार्यक्रमाचा आढावा घेतला असता समाधान व्यक्त करून प्रशंसा केली.   यावेळी आमदार संतोष बांगर, आरोग्य विभागाचे आयुक्त संजय काटकर आणि संबंधित आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी आयुक्त संजय काटकर यांनी प्रास्ताविक केले.  यामध्ये हिंगोली जिल्ह्यांमध्ये ९५२ हृदयविकारग्रस्त बालकांचे हृदयविकार शस्त्रक्रिया करून   बालकांचे भविष्य निरोगी केले  नमूद केले.  राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत लाभ दिलेल्या बालकांना मंचावर बोलवून गुलाब पुष्प देऊन पुढील आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.  यामुळे बालकांच्या चेहऱ्यावर नवीन आशा निर्माण झाल्याचे दिसून आले.  हेच या कार्यक्रमाचे यश असल्याचे निष्पन्न झाले. तसेच यावेळी आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते क्षय रुग्णास कोरडा पोषण देण्यात आला.

यानंतर आरोग्यमंत्री  प्रकाश आबिटकर यांनी उपस्थित पालक, विद्यार्थी व आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.  आरोग्य यंत्रणेवर विश्वास ठेवून आपल्या बालकांच्या उपचारासाठी सहकार्य करणाऱ्या पालकांचे त्यांनी विशेष कौतुक केले व यापुढे भविष्यात सर्व  गावकऱ्यांचे  शासकीय योजना सहकार्य मिळण्यासाठी आवाहन केले.

 आरोग्य विभागाच्या सेवा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यास शासन कटिबद्ध असल्याचे आरोग्यमंत्री श्री. आबिटकर यांनी सांगितले.

“आरोग्य यंत्रणेवर पालकांनी ठेवलेला विश्वास हीच आमची ताकद आहे. भविष्यातही कोणतेही बालक  आरोग्य सेवेपासून वंचित राहू नये, यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रभावीपणे आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या जातील,” असा विश्वास आरोग्यमंत्री  प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केला.

यावेळी शाळेतील विद्यार्थी, त्यांचे पालक, आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.

आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडून वसमत महिला व बाल रुग्णालयाची पाहणी;

'RBSK' योजनेमुळे पुनर्जन्म मिळालेल्या पाच महिन्यांच्या चिमुकलीला उचलून घेत केले कौतुक
वसमत: दि.02 -राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी 'आरोग्य संवाद यात्रा'' च्या निमित्ताने वसमत येथील महिला व बाल रुग्णालयाला भेट देऊन आरोग्य सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली आणि कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. या दौऱ्यादरम्यान 'राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमा'मुळे (RBSK) दुर्धर आजारावर मात केलेल्या पाच महिन्यांच्या सिया गौतम भंडारे या चिमुकलीला आरोग्य मंत्र्यांनी स्वतःच्या कडेवर उचलून घेत तिच्या प्रकृतीची अत्यंत आपुलकीने विचारपूस केली. हा हृदयस्पर्शी क्षण उपस्थित सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला.

सिया अवघ्या १० दिवसांची असताना तिच्यावर मुंबईतील नामांकित कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात अत्यंत गुंतागुंतीची ‘बॅड क्लोजर विथ आर्च रिपेअर’ (Bad Closure with Arch Repair) शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली होती. शासकीय योजनेच्या माध्यमातून मोफत उपचार मिळून चिमुकली आज ठणठणीत असल्याने आरोग्य मंत्र्यांनी समाधान व्यक्त करत तिच्या पालकांना दिलासा दिला व डॉक्टरांच्या अभिनंदन केले.
या पाहणी दौऱ्यात आरोग्य मंत्र्यांनी रुग्णालयातील विविध विभागांची तपासणी करून रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवांचा आढावा घेतला. सामान्य नागरिकांना, माता व बालकांना वेळेवर आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळायलाच हव्यात, अशा सूचना त्यांनी उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या.

आरोग्य सेवेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देणार - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

आरोग्यमंत्र्यांकडून आरोग्य सुविधांची पाहणी ; बालकांची आस्थेवाईकपणे विचारपूस
हिंगोली, दि. २ नोव्हेंबर (जिमाका) : ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आणि वेळेत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी रुग्णालयाला आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून देणार अशी ग्वाही त्यांनी दिली. 
आरोग्य संवाद यात्रा 2026 अंतर्गत आयोजित या भेटीदरम्यान आरोग्यमंत्र्यांनी आरोग्य संस्थेतील विविध सुविधांचा आढावा घेतला. यावेळी आमदार संतोष बांगर, आरोग्य विभागाचे आयुक्त संजय काटकर, आरोग्य सेवा संचालक डॉ. विजय कंदेवाड, उपसंचालक डॉ. कांचन वानेरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके तसेच छत्रपती संभाजीनगर येथील आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. संतोष कडले उपस्थित होते.

*आरोग्य सुविधांचा घेतला आढावा* 

आ. बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयामार्फत नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या आरोग्य सेवा, माता व बाल आरोग्य सेवा, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि शासनाच्या विविध आरोग्य योजनांच्या अंमलबजावणीची माहिती आरोग्यमंत्र्यांनी घेतली. उपलब्ध वैद्यकीय सुविधा, मनुष्यबळ, औषधसाठा आणि दैनंदिन कामकाजाचा आढावा घेत आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे देण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.  

ग्रामीण नागरिकांशी थेट संवाद साधून आरोग्य सेवा वेळेत व नियमितपणे मिळतात का, उपचार घेताना कोणत्या अडचणी येतात, याची माहिती त्यांनी जाणून घेतली. ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ उपक्रम, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेबाबत नागरिकांमध्ये असलेली जागरूकता तसेच योजनांचा लाभ मिळत असल्याबाबतही त्यांनी विचारणा केली.

*हृदयशस्त्रक्रिया झालेल्या बालकांची विचारपूस*

उपचारासाठी आलेल्या रुग्णांशी संवाद साधून त्यांना मिळणाऱ्या आरोग्य सेवांची प्रत्यक्ष माहिती घेतली. नागरिकांच्या अडचणी आणि सूचनांची दखल घेत आरोग्य सेवा अधिक परिणामकारक करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत हृदयशस्त्रक्रिया झालेल्या बालकांची आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आस्थेवाईकपणे विचारपूस केली. त्यांच्या प्रकृतीची माहिती घेत बालकांना पुढील उपचार व आरोग्य सेवांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यशस्वी शस्त्रक्रीया झालेल्या बालकांनी मंत्री श्री. आबीटकर यांना पुष्प देवून स्वागत केले. यावेळी लाभार्थ्यांना आयुष्मान भारत कार्डचे वितरणही करण्यात आले.
00000