11 November, 2019

वसमत येथील नवोदय विद्यालयात इयत्ता 9 वीसाठीच्या 3 जागाकरीता निवड चाचणी


वसमत येथील नवोदय विद्यालयात इयत्ता 9 वीसाठीच्या 3 जागाकरीता निवड चाचणी

हिंगोली,दि.11:  वसमतनगर येथील जवाहर नवोदय विद्यालय येथे इयत्ता 9 वी साठी खुला प्रवर्गातील ग्रामीण भागासाठी एक, खुला प्रवर्गातील शहरी भागासाठी एक तर अनुसूचित जातीकरीता शहरी भागासाठी एक अशा एकूण तीन जागांसाठी निवड चाचणी परीक्षा ही दिनांक 8 फेब्रुवारी, 2020 रोजी सकाळी 10.00 वाजता घेण्यात येणार आहे. 
या परीक्षेस जे विद्यार्थी जिल्ह्यातंर्गत शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये इयत्ता 8 वी मध्ये शिक्षण घेत असलेले पाहिजेत. त्यांनाच या निवड परीक्षेस बसण्याची संधी मिळेल. या परीक्षेचे आवेदनपत्र हे जवाहर नवोदय विद्यालय समिती, मुख्य कार्यालय, नोएडा यांची वेबसाईट www.navodaya.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 10 डिसेंबर, 2019 पर्यंत भरता येईल, असे आवाहन प्राचार्य जवाहर नवोदय विद्यालय, वसमतनगर यांनी केले आहे .
****

08 November, 2019

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाकरीता 14 हजार 961 पदवीधरांची नोंदणी


औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाकरीता 14 हजार 961 पदवीधरांची नोंदणी

हिंगोली,दि.08: जून महिन्यात विधान परिषदेच्या 05-औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होत असून, त्यासाठी 1 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर या कालावधीत मतदार नोंदणी अभियान हाती घेण्यात आले होते. यात  विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघासाठी 11 नोव्हेंबर 2019 पूर्वी पदवीधरांनी नमुना 18 अर्जाद्वारे आपली मतदार म्हणून नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यातील 14 हजार 961 पदवीधरांनी औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाकरीता आपली नोंदणी केली आहे.
            यात हिंगोली तालुक्यातील 4 हजार 037 पदवीधर आहेत. तर कळमनुरी तालूक्यातील 3 हजार 297, सेनगांव तालूक्यातील 2 हजार 044, वसमत तालूक्यातील 3 हजार 749 आणि औंढा नागनाथ तालूक्यातील 1 हजार 834 असे एकुण 14 हजार 961 पदवीधरांनी औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाकरीता आपली नोंदणी केलेली आहे.
            मंगळवार 19 नोव्हेंबर, 2019 रोजीपर्यंत हस्तलिखिते तयार करुन प्रारुप मतदार याद्यांची छपाई करण्यात येणार असून शनिवार 23 नोव्हेंबर, 2019 रोजी प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी करण्यात येणार आहे. तर 23 नोव्हेंबर, 2019 ते 9 डिसेंबर, 2019 या कालावधीत दावे व हरकती स्विकारण्यात येणार आहेत. गुरुवार 26 डिसेंबर, 2019 रोजी दावे व हरकती निकाली काढून पुरवणी यादी तयार करुन छपाई करण्यात येणार आहे. तर सोमवार 30 डिसेंबर, 2019 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे.

****




07 November, 2019

विविध क्षेत्रातील व्यावसायामध्ये बालकामगार कामावर न ठेवण्याचे आवाहन


विविध क्षेत्रातील व्यावसायामध्ये बालकामगार कामावर न ठेवण्याचे आवाहन

हिंगोली,दि.07: जिल्ह्यात बालकामगार प्रथेविरुध्द दि. 7 नोव्हेंबर ते दि. 7 डिसेंबर, 2019 या कालावधीमध्ये जनजागृती मोहीम राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले आहेत.
जिल्ह्यामध्ये वीटभट्टीवर, हॉटेल व्यावसायीकांनी, औद्योगिक क्षेत्रातील कारखानदारांनी तसेच विविध क्षेत्रातील व्यावसायीकांनी बालकामगार कामावर ठेवू नये. आस्थापनावर बालकामगार असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधीतावर सक्तीची कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी कळविले आहे.

****

06 November, 2019

जिल्ह्यातील अतिवृष्टीने बाधित शेतपिक क्षेत्रावरील पंचानाम्याचे काम प्रगतीपथावर - जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी · 1 लाख 16 हजार 590 शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण




जिल्ह्यातील अतिवृष्टीने बाधित शेतपिक क्षेत्रावरील पंचानाम्याचे काम प्रगतीपथावर
- जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी
·   1 लाख 16 हजार 590 शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण

हिंगोली,दि.06: हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागात शेतपिकांचे तसेच शेतात पाणी साचून राहिल्याने नुकसान झाले आहे. नजर अंदाजाने केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात 2 लाख 25 हजार 275 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असल्याचे प्राथमिक अहवालावरुन दिसून आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली.
सोमवार दि. 5 रोजी पर्यंत अतिवृष्टीमुळे हिंगोली तालूक्यातील 152 गावातील 59 हजार 160 शेतकऱ्यांचे  एकुण 33 हजार 615 हेक्टर क्षेत्र बाधीत झाले आहे. यापैकी  आतापर्यंत  59 गावातील 18 हजार 662 शेतकऱ्यांचे एकुण 13 हजार 63.4 हेक्टर क्षेत्राचे पंचानामे पूर्ण झाले आहे. तर कळमनुरी तालूक्यातील 148 गावातील 58 हजार 296 शेतकऱ्यांचे एकुण 53 हजार 097 हेक्टर क्षेत्र बाधीत झाले आहे. यापैकी  आतापर्यंत 48 गावातील 14 हजार 574 शेतकऱ्यांचे एकूण 13 हजार 274.75 हेक्टर क्षेत्राचे पंचानामे पूर्ण झाले आहे. वसमत तालूक्यातील 152 गावातील 42 हजार 767 शेतकऱ्यांचे एकुण 31 हजार 553 हेक्टर क्षेत्र बाधीत झाले आहे. यापैकी आतापर्यंत 80 गावातील 32 हजार 075 शेतकऱ्यांचे एकुण 23 हजार 664.75 हेक्टर क्षेत्राचे पंचानामे पूर्ण झाले आहे. औंढा नागनाथ तालूक्यातील 122 गावातील 37 हजार 105 शेतकऱ्यांचे एकुण 48 हजार 953 हेक्टर क्षेत्र बाधीत झाले आहे. यापैकी  आतापर्यंत 49 गावातील 14 हजार 842 शेतकऱ्यांचे एकुण 19 हजार 581.2 हेक्टर क्षेत्राचे पंचानामे पूर्ण झाले आहेत आणि सेनगाव तालूक्यातील 133 गावातील 48 हजार 582 शेतकऱ्यांचे  एकुण 58 हजार 057 हेक्टर क्षेत्र बाधीत झाले आहे. यापैकी  आतापर्यंत 104 गावातील 36 हजार 437 शेतकऱ्यांचे एकुण 43 हजार 543 हेक्टर क्षेत्रावरील पंचानामे पूर्ण झाले आहेत. असे एकुण 707 गावातील 2 लाख 45 हजार 910 शेतकऱ्यांचे एकुण 2 लाख 25 हजार 275 हेक्टर क्षेत्र बाधीत झाले आहे. यापैकी आतापर्यंत एकुण 340 गावातील 1 लाख 16 हजार 590 शेतकऱ्यांचे एकुण 1 लाख 13 हजार 126 हेक्टर क्षेत्रावरील पंचानामे पूर्ण झाले आहेत.
अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे नुकसान झाले असून बाधित घटकांचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यानुसार पिकांचे पंचनामे करण्याचे काम प्रगतीपथावर असुन येत्या चार ते पाच दिवसात पंचनामे पूर्ण करुन शासनास अंतिम अहवाल सादर करण्यात येणार आहे. शासन नियमानुसार देय अनुदान शेतकऱ्यांना लवकरात-लवकर देण्याबाबत जिल्हा प्रशासन दक्षता घेत आहे. तसेच अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात एकही जनावर दगावले नसल्याची माहिती श्री. जयवंशी यांनी दिली.

****



04 November, 2019

नवीन उद्योग/सेवा उद्योग उभारण्यासाठी युवक-युवतींना अर्ज करण्याचे आवाहन


नवीन उद्योग/सेवा उद्योग उभारण्यासाठी
युवक-युवतींना अर्ज करण्याचे आवाहन

हिंगोली, दि.4: राज्यातील युवक-युवतींना नवीन उद्योग सेवा उद्योग उभा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने चालू आर्थिक वर्षात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेअंतर्गत  प्रक्रीया व निर्मिती प्रकल्पासाठी कमाल रुपये 50 लाख व सेवा उद्योग प्रवर्गातील प्रकल्पासाठी कमाल रुपये 10 लाखाची मर्यादा केली आहे.
या योजनेअंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गासाठी स्वगुंतवणूक 10 टक्के व एस.सी., एस.टी. महिलांसाठी 5 टक्के असे राहील. तसेच उर्वरित बँकेचे कर्ज असेल. मंजूर प्रकल्प किंमतीच्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी 15 ते 25 टक्के अनुदान तसेच एस.सी., एस.टी. महिलांसाठी 25 ते 35 टक्के अनुदान देय आहे. या योजने अंतर्गत अर्ज करण्यासाठी वयाची मर्यादा वय 18 ते 45 व एस.सी., एस.टी. महिलांसाठी 5 वर्षाची अट शिथिल राहील. रुपये 10 लाखांवरील प्रकल्पासाठी  किमान शैक्षणिक पात्रता 7 वी पास व 25 लाखावरील प्रकल्पासाठी किमान 10 वी पास असणे आवश्यक आहे. सदरील योजना पूर्णपणे ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील  इच्छूक युवक-युवतींनी  https://maha-cmegp.gov.in या वेबसाईट वर ऑनलाईन अर्ज करावा. सदर अर्जासोबत टी.सी., आधार कार्ड , प्रोजेक्ट रिपोर्ट, जातीचा दाखला, अंडरटेकींग फॉर्म अपलोड करावे. अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग कार्यालय, हिंगोली येथे संपर्क साधावा असे आवाहन महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, हिंगोली  यांनी केले  आहे.

****


02 November, 2019






अतिवृष्टीने झालेल्या पिक नुकसानीची
पालकमंत्री यांनी केली पाहणी
हिंगोली, दि.2: मागील आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या परतीचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याअनुषंगाने पालकमंत्री अतुल सावे यांनी आज जिल्ह्यात  दौरा करुन अतिवृष्टीमुळे झालेल्या पिक नुकसान परिस्थितीची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला.
मा. मुख्यमंत्री यांनी अतिवृष्टी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांची पाहणी करुन व पंचनामे करुन शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे प्रशासनाला आदेश दिले होते.त्या अनुषंगाने पालकमंत्री अतुल सावे यांनी आज सेनगांव तालूक्यातील मौजे येलदरी, चिंचखेडा, भानखेडा, भानखेडा तांडा, हत्ता आणि हिंगोली तालुक्यातील मौजे केसापूर व सवड येथील सोयाबीन, कापूस, ज्वारी इत्यादी नुकसान झालेल्या शेतशिवारातील पिकांची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, प्रशांत खेडेकर, प्रविण फुलारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विजय लोखंडे, तहसिलदार जिवककुमार कांबळे, कैलासचंद्र वाघमारे, ज्योती पवार आदीसह सर्व संबंधीत यंत्रणाप्रमुखांची उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री श्री. सावे म्हणाले की, अतिवृष्टीमूळे काढणीला आलेल्या पिकाचे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी बांधवांची स्थिती अत्यंत बिकट आहे.  नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करुन पंचानामे करुन अहवाल शासनाला सादर करण्यात येणार आहे. त्यानुसारच झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी शेतकरी बांधवांना अनुदान मिळणार आहे. तरी शेतक-यांनी अशा परिस्थितीत धीर सोडू नये. या नैसर्गीक आपत्तीच्या प्रसंगी शासन पुर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी असून सर्वोतपरी मदत करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री श्री. सावे यावेळी म्हणाले. 
शासनाकडे हिंगोली जिल्ह्यातील शेतक-यांच्या शेत पिकांच्या झालेल्या नुकसानी संदर्भात झालेल्या पाहणीनुसार शासनस्तरावर सरसकट नुकसान भारपाई देण्यासाठी पाठपुरावा करणार असून ज्याठिकाणी शासनाची संबंधीत यंत्रणा पोहचली नसेल त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी मोबाईलवर जिओ टॅग करुन फोटो अपलोड केल्यास ते पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी शेतक-यांशी संवाद साधतांना सांगितले. तसेच नुकसान झालेल्या पिकांची तात्काळ पाहणी व पंचानामे करुन शासनाला अहवाल सादर करण्याचे निर्देश यावेळी पालकमंत्री श्री. सावे यांनी सबंधीत यंत्रणेला दिले.
यानंतर कळमनुरी तालूक्यातील मोजे उमरा व औंढा तालुक्यातील मौजे बोरजा, येहळेगाव आणि वसमत तालूक्यातील वाई या गावास पालकमंत्री श्री. सावे यांनी यावेळी भेट देवून तेथील नुकसान ग्रस्त शिवारांची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी पाहणी दौऱ्यात पदाधिकारी, अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, शेतक-यांची उपस्थिती होती.

*****


01 November, 2019

पदवीधर मतदार संघासाठी नाव नोंदणी करा -जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी






पदवीधर मतदार संघासाठी नाव नोंदणी करा
    -जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी
हिंगोली, दि.१ : ०५-औरंगाबाद पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने मतदार याद्या तयार केल्या जात असून पदवीधरांनी आपली नाव नोंदणी संबंधित अधिकाऱ्यांकडे करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आज येथे केले. 
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आयोजीत बैठकीत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजु नंदकर, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण गिरगांवकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) नितीन दाताळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण यांच्यासह सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.
भारत निवडणूक आयोगाने 1 नोव्हेंबर-2019 या अर्हता दिनांकावर आधारित पदवीधर मतदारसंघाच्या मतदार याद्या नव्याने तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व पदवीधरांनी आपली नाव नोंदणी करुन घ्यावे, असे जिल्हाधिकारी जयवंशी यांनी आज येथे सांगितले. 1 नोव्हेंबर, 2019 ची अर्हता म्हणजे ज्या पदवीधरांची पदवी ही 1 नोव्हेंबर, 2016 पुर्वी प्राप्त झाली आहे. त्यांना नोंदणी करता येणार आहे. 
जिल्हाधिकारी श्री. जयवंशी पुढे म्हणाले की, जिह्यातील सर्व कार्यालय प्रमुखांनी कार्यालयातील सर्व पदवीधर कर्मचाऱ्यांचे नमुना-18  क्रमांकाच्या अर्जात संबंधीत कर्मचाऱ्यांकडून माहिती भरुन घेवून तहसिलदार कार्यालय, उपविभागीय कार्यालय अथवा जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेत जमा करावयाचे असून याबाबत सर्वस्वी जबाबदारी ही कार्यालय प्रमुखांची असणार आहे. पुर्वी मतदार असलेल्या मतदारांनीही नव्याने नोंदणी करायची आहे, असेही श्री. जयवंशी यांनी स्पष्ट केले. 
महाविद्यालयीन पदवीधर विद्यार्थी तसेच पदवी प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापकांनी पदवीधर मतदारसंघात नोंदणी करण्याचे आवाहन करावे. तसेच  शहरी भागात पदवीधर मतदार संख्या जास्त असून त्यांना पदवीधर मतदार यादीत समावेशीत होण्यास येणारी समस्या जाणून घेवून त्याचे निरसन करत त्यांना 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या यादीत समावेशीत होण्याचे आवाहन करण्यात यावे. प्रास्ताविकात उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. नंदकर यांनी सर्व विभागप्रमुखांना पदनिर्देशित अधिकारी नेमण्यात आल्याचे सांगून नमुना-18 भरण्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. 
मतदार नोंदणी नियम १९६० अंतर्गत नियम ३१ (३) अन्वये महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघासाठी पात्र मतदारांची नोंदणी करावयाचा कार्यक्रम  ०१ ऑक्टोबर, 2019 पासून जाहीर झाला आहे. मतदार नोंदणीसाठी 1 ऑक्टोबर, 2019 ते 6 नोव्हेंबर, 2019 या कालावधीत पात्र पदवी अर्हता, पात्र तत्सम अर्हता व्यक्तींना नमुना-१८ मध्ये मतदार नोंदणीसाठी अर्ज करता येईल. अर्जाचा नमुना तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विनामुल्य उपलब्ध आहे. या नोंदणीसाठी एक नोव्हेंबर-२०१९ या अर्हता दिनांकापूर्वी किमान तीन वर्ष अगोदर पदवी पात्र अर्हता अथवा तत्सम पात्र पदविका इ. धारण करणाऱ्या व्यक्तींना अर्ज करता येणार आहे. नमुना-१८ च्या अर्जासह मूळ कागदपत्रे अथवा राजपत्रित अधिकाऱ्यांकडून सांक्षांकित केलेल्या सत्यप्रती सोबत जोडणे आवश्यक आहे. अर्जदार ज्या ठिकाणी अर्ज करेल त्या ठिकाणचा सामान्यत: रहिवासी असावा. अर्जासोबत पदवी , पदविका परीक्षेचे अंतिम गुणपत्रक देखील ग्राह्य धरले जाईल. मात्र, गुणपत्रकान्वये सदर व्यक्ती पास किंवा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणित झाले असले पाहिजे. 
                                                                  *****