11 April, 2022

 


जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन

 

हिंगोली, (जिमाका) दि. 11 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात महात्मा ज्योतिबा फुले  यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

            यावेळी तहसीलदार संदीप राजपुरे, जीवककुमार कांबळे, नायब तहसिलदार डी. एस. जोशी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनीही यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

*****

10 April, 2022

 



रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान

तरुण युवकांनी रक्तदान करावे

- निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी

 

हिंगोली, दि. 10  (जिमाका) :  रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान असून प्रत्येक सक्षम तरुण युवकांनी रक्तदान केलेच पाहिजे, असे मत निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनामध्ये राष्ट्रनिर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 वी जयंती सामाजिक समता कार्यक्रमा निमित्ताने आज दि. 10 एप्रिल, 2022 रोजी सकाळी 11:00 वाजता भव्य रक्तदान शिबिराचे निवासी उपजिल्‍हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी  यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, डॉ. मोरे, डॉ. शिवाजी गिते, डॉ. चौधरी, नीरज देशमुख, बार्टीचे प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ गोवंदे आदी उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सामाजिक समता कार्यक्रम  हे दि. 06 एप्रिल ते 16 एप्रिल, 2022 पर्यंत मोठ्या उत्साहाने विविध उपक्रमातून राबविण्यात येत असून प्रत्येक सक्षम तरुण युवकांनी रक्तदान करणे ही काळाची गरज आहे, असे मत प्रास्ताविक करतांना समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे  यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

रक्तदान शिबिर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समतादूत अशोक इंगोले यांनी केले. यावेळी रक्तदान शिबिरासाठी         रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. दीपमाला पाटील, प्रयोगशाळा तंत्रज्ञ विद्या तौर, रक्तपेढी तंत्रज्ञ प्रदीप सोळंके, समाजसेवा अधीक्षक रामचंद्र दुधाळकर, अधिपरिचारक अमोल गिरी, अरविंद कदम, नितीन चव्हाण या रक्तपेढी टीमने सहकार्य केले. समाजकल्याण बार्टी व जात पडताळणीचे कर्मचारी, कास्ट्राईब संघांचे कर्मचारी, विविध इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापक, अनेक विद्यार्थ्यांनी स्वेच्छेने रक्तदान शिबिरात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन रक्तदान केले.  

 यावेळी भीमशक्तीचे विशालभाऊ इंगोले, कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे भिमराव नेतने, प्रवीण रुईकर, गंगाधर पाईकराव, रमेश खंदारे, नामदेव सपाटे, वैभव कांबळे, जाधव, शासकीय मुलींचे निवासी वस्तीगृहाच्या सिंधुताई राठोड, गजानन बिहाडे, दीपक कांबळे, नागनाथ नकाते, आनंत बिजले, भास्कर वाकळे,  भगवान पठाडे आदी सामाजिक कार्यकर्ते सह विविध इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापक व विद्यार्थी  तरुण  युवक-युवती मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून रक्तदान शिबिरात  सहभागी  झाले होते.

रक्तदान शिबीर कार्यक्रमासाठी बार्टीचे प्रकल्पाधिकारी सिद्धार्थ गोवंदे, समतादूत सुरेश पठाडे, प्रफुल पटेबहादूर, श्रीमती ढोणे, गिते, संगीता खांदळे, सखाराम चव्हाण, संदीप  घनतोडे, रितेश बगाटे, विजय आयरेकर, पुंडगे,  रवींद्र खंदारे,  जाधव,  शुभम यादव, हरीश पुंडगे आदीसह सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, बार्टी व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.

*****

08 April, 2022

 


विद्यार्थ्यांनी स्वाधारच्या आधारावर निश्चित ध्येय ठेवून यश संपादन करावे

- उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे

 

हिंगोली, दि. 08  (जिमाका) :  भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर 'स्वाधार' योजनेमुळे मागासवर्गीय विध्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनाला मोठा आधार मिळत असून विध्यार्थ्यांनी कठोर परिश्रमातून निश्चित एक ध्येय ठेऊन जीवनात मोठं यश संपादन केले पाहिजे, असे मत हिंगोली ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे, यांनी  सामाजिक न्याय भवन येथे जयंती  सामाजिक समता कार्यक्रमात बोलतांना व्यक्त केले.

          सामाजिक न्याय भवनात आज दि. 8 एप्रिल रोजी दुपारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सामाजिक कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पपूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी  उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंदजी वाखारे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे, बार्टीचे प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ गोवंदे, राष्ट्रवादीचे प्रफूल सोनवणे यांच्या हस्ते  स्वाधार योजनेतील पात्र लाभार्थी विध्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते लाभपत्र वाटप करण्यात आले.

            यावेळी उपस्थित विध्यार्थ्यांना बार्टीचे प्रकल्प अधिकारी गोवंदे यांनी बार्टीच्या योजनाची माहिती सांगितली, लाभार्थी विध्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समतादूत अशोक इंगोले यांनी केले. तर शेवटी  प्रफूल पटेबहादूर यांनी उपस्थिताचे आभार मानले.

कार्यक्रमास समाजकल्याणचे कर्मचारी अनंत बिजले, समतादूत  सुरेश पठाडे, सखाराम चव्हाण, रितेश बगाटे, वडकुते, बिहाडे, पौळकर आदीसह विविध महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

*****

 

कोविड-19 ने निधन झालेल्यांच्या कुटुंबातील 337 सदस्यांना

विविध प्रशिक्षणाचा लाभ

  • कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त यांचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले कौतूक

 

           हिंगोली, दि. 08  (जिमाका) : कोविड-19 या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव मागील दोन वर्षापासून राज्यात मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. कोविड-19 महामारीच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये राज्यातील अनेक नागरिकांचे निधन झाले आहे. अनेक कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा आधार निखळला आहे. अशा परिस्थितीमध्ये या कुटुंबाचे पुनर्वसन व्हावे. तसेच त्यांचा आर्थिक व सामाजिक विकास साधावा या उद्देशाने मिशन वात्सल्य या अभियानाचे शासनाने आयोजन केले आहे.

            मिशन वात्सल्य अभियानाचा हेतू साध्य व्हावा व एक सामाजिक बांधिलकी म्हणून कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग, हिंगोली यांच्याकडून कोविड-19 मध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबातील सदस्य आत्मनिर्भर व्हावे व त्यांना रोजगार , स्वयंरोजगार प्राप्त व्हावा यासाठी किमान कौशल्य विकास कार्यक्रम 2021-2022 या जिल्हास्तरीय योजनेंतर्गत प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्याचेच फलीत म्हणून हिंगोली जिल्ह्यातील 188 कुटुंबातील 328 सदस्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्याचबरोबर प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना 3.0 अंतर्गत 4 कुटुंबातील 9 सदस्यांना हेल्थकेअर विषयक अभ्यासक्रमामध्ये प्रशिक्षण देण्यात येत आहे. अशा प्रकारे मिशन वात्सल्य अंतर्गत जिल्ह्यातील 192 कुटुंबातील 337 सदस्यांना प्रशिक्षणाचा  लाभ देण्यात आला आहे.   

            मिशन वात्सल्य अभियानाचा आढावा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दि. 5 एप्रिल, 2022 रोजी घेण्यात आली. या आढावा बैठकीमध्ये कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त डॉ. रा. म. कोल्हे यांनी  केलेल्या कामाचे जिल्हाधिकाऱ्यांनी  कौतुक केले, अशी माहिती डॉ. रा. म. कोल्हे, सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे. 

*****

 

किमान कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत

विविध अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील 960 युवक-युवतींना प्रवेश

  • नियमित प्रशिक्षणास सुरुवात

 

           हिंगोली, दि. 08  (जिमाका) : प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत जिल्ह्यातील विशिष्ट भौगोलिक तथा सामाजिक स्थिती, परंपरागत व्यवसाय, नैसर्गिक संसाधने तथा साधनसामुग्री इत्यादींच्या आधारे जिल्ह्यातील रोजगार व स्वयंरोजगारासाठी अधिक मागणी असलेले क्षेत्रे निश्चित करुन या क्षेत्राच्या कौशल्याच्या मागणीनुसार विशिष्ट अभ्यासक्रम राबविण्यात येतात. त्याअनुषंगाने जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता हिंगोलीच्या वतीने जिल्ह्यातील युवक युवती आत्मनिर्भर व्हावे व त्यांना रोजगार, स्वयंरोजगार प्राप्त व्हावा यासाठी किमान कौशल्य विकास कार्यक्रम 2021-2022 या जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत विविध अभ्यासक्रमांच्या प्रशिक्षणास सुरुवात झालेली आहे.

            यामध्ये जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी , औंढा नागनाथ, वसमत तालुक्यातील 960 युवक युवतींना इलेक्ट्रीशियन डोमेस्टीक सोल्यूशन, रिटेल सेल्स असोसिएट, सीआरएम डोमेस्टीक नॉन व्हाईस, हँड एम्ब्रायडर, डोमेस्टीक डाटा एंट्री ऑपरेटर, सोलार पॅनेल इन्स्टॉलेशन टेक्नीशियन, इनव्हेंट्री क्लार्क, फिटर-मेकॅनिकल ॲसेम्ब्ली अशा विविध अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यात आले आहे. सद्यस्थितीमध्ये त्यांचे नियमित प्रशिक्षण सुरु आहे. उद्दिष्टानुसार उर्वरित प्रशिक्षणार्थीची प्रवेश प्रक्रिया प्रशिक्षण केंद्रामार्फत सुरु आहे, अशी माहिती डॉ. रा. म. कोल्हे, सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, हिंगोली यांनी दिली आहे.  

*****

 

 

 

 

 

वृत्त 

07 April, 2022

 




जन

मुख्यमंत्र्यांचा  विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, क्षेत्रीयस्तरावरील अधिकाऱ्यांशी  संवाद

 

राज्यातील विकास कामांचा, योजनांचा सर्वंकष आढावा

 

जनहिताच्या योजना, पायाभूत सुविधांच्या कामांना मिशन मोडवर वेग द्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 

मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेऊन उपाययोजना करण्याचे निर्देश

मुंबई, दि. 7 :- राज्याच्या अर्थसंकल्पात विकासाची पंचसूत्री मांडण्यात आली असून या पंचसूत्रीच्या अंमलबजावणीसाठी कामाला लागा, मिशनमोड स्वरूपात जनहिताच्या योजनांची अंमलबजावणी करून सर्वसामान्य माणसाला दिलासा द्या तसेच जिल्ह्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाची कामे वेगाने पूर्णत्वाला न्या, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिल्या. त्यांनी बैठकीत मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेऊन पूर, अतिवृष्टी तसेच दरड कोसळणे अशा आपत्तीच्या प्रसंगाचा सामना करण्यासाठी योग्य ती पुर्वतयारी व उपाययोजना राबविण्याचे निर्देशही यावेळी दिले.

मुख्यमंत्र्यांनी आज राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, सर्व महानगरपालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पोलीस अधिक्षक आदी क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांशी दुरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. यात त्यांनी राज्याच्या प्राधान्यक्रमावरील कामांचा आणि योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. यावेळी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे  यांच्यासह सर्व विभागांचे  सचिवस्तरीय अधिकारी उपस्थित होते.

जनहिताच्या योजनांचे मिशन निश्चित करा

जनहिताच्या योजनांचे एक मिशन निश्चित करून त्यासंबंधीचे प्रस्ताव प्रत्येक जिल्ह्यातून मागवण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.

विभागीय मुख्यमंत्री कार्यालय सक्षमतेने कार्यान्वित ठेवा

सर्वसामान्य जनतेची जी कामे स्थानिक पातळीवर होऊ शकतात त्यासाठी त्यांना मुंबईत येण्याची गरज पडू नये या उद्देशानेच प्रत्येक विभागात विभागीय मुख्यमंत्री कार्यालय सुरु करण्यात आले आहे. यासाठी महिन्यातील एक दिवस पूर्ण आढावा घेऊन सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न मार्गी लावावेत असे ही मुख्यमंत्री म्हणाले त्यांनी यासंदर्भातील आढावा एका विशेष बैठकीद्वारे स्वत: घेणार असल्याचेही स्पष्ट केले.

जिल्ह्यातील विविध विकासकामांकडे लक्ष द्यावे

कृषी, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रांसह जिल्ह्यातील उद्योग, गुंतवणूक तसेच कौशल्य विकासाची व रोजगार संधींच्या निर्मितीची कामे वेगाने सुरु होतील याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, प्रत्येक जिल्ह्यातील आरोग्य संस्थांचे बळकटीकरण झाले पाहिजे. त्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळाची पुर्तता याकडेही लक्ष देण्यात यावे असेही ते यावेळी म्हणाले

पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत ठेवा

राज्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढत असून नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत राहील याची काळजी घ्यावी. पाण्याच्या ठिकाणांपर्यंत पोहचण्यासाठी, शाळेपर्यंत पोहचण्यासाठी जिथे पूल नाहीत तिथे साकव बांधून महिला तसेच विद्यार्थ्यांना जाण्या येण्याची सुविधा निर्माण होईल असे पहावे.

वेळेत कर्जपुरवठा व्हावा

खरीप हंगाम तोंडावर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बियाणे आणि खतांचा सुरळित पुरवठा होईल, पिक कर्जाचे बँकाकडून वेळेत वितरण होईल याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळाल्याने ते नवीन पिक कर्जास पात्र झाल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. नागपूरातील पहिल्याच अधिवेशनात शेतकऱ्यांची कर्जमुक्ती जाहीर केली होती. त्यावेळी नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना पन्नास हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याची जाहीर केले होते. मध्यंतरी कोविडच्या बिकट परिस्थितीत हे अनुदान वाटप थांबले होते. आता अर्थसंकल्पातही या अनुदानासाठी तरतूद केली आहे. हे अनुदान वेळेत शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

पर्यावरणपूरक विकासाला प्राधान्य

जिल्ह्यात उद्योगांना पोषक वातावरण निर्माण होईल, पर्यावरणाचा समतोल राखून पायाभूत सुविधांची कामे करतांना जिथे भूसंपादनाची कामे बाकी आहेत तिथे ती वेगाने मार्गी लावावीत असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

कोविडविरुद्ध असामान्य लढा

कोविडकाळात सर्व विभागीय तसेच जिल्हास्तरीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता प्रचंड मेहनत घेतली, असामान्य लढा दिला त्यामुळे आज कोरोना नियंत्रणात आणता आला. यासाठी मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, केंद्र सरकारने आता आपत्ती व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी करण्याची गरज नसल्याचे सांगितल्याने आपण कोविड निर्बंध शिथील केले आहे. असे असले तरी कोरोनाचा नवीन विषाणू कुठे ना कुठे जन्माला येत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे मास्क सक्ती नसली तरी मुक्तीही झालेली नाही हे ही नागरिकांनी लक्षात घ्यावे व स्व संरक्षणासाठी मास्कचा वापर करावा. मास्क वापरण्याचे बंधन नसले तरी आपली जबाबदारी कायम आहे याकडेही त्यांनी नागरिकांचे लक्ष वेधले.

विविध विभागांच्या योजना तसेच पायाभूत सुविधांच्या कामाचा आढावा

बैठकीत घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन, आरोग्य सेवा आणि संस्थांचे बळकटीकरण, कुपोषण निर्मुलन, कृषी व खरीप हंगाम, पिक कर्जाचे वितरण, पाणी टंचाई, मान्सूनपूर्व कामे, उद्योग, कौशल्य विकास, रोजगार संधी,रस्ते आणि योजनांवरील खर्च, जलजीवन मिशन, पायाभूत सुविधांची कामे, भुसंपादन आदी विषयांच्या अनुषंगाने संबंधित विभागांच्या सचिवांनी जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्तांना करावयाच्या कामांबाबत माहिती दिली.

*****

 

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारासाठी

20 एप्रिल पर्यंत अर्ज करावेत

 

           हिंगोली, दि. 07  (जिमाका) : महात्मा बसवेश्वर सामाजिक समता -शिवा पुरस्कारासाठी जिल्ह्यातील इच्छूक व्यक्ती व संस्था यांनी संबंधित जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडे सिलबंद लिफाफ्यात दि. 20 एप्रिल 2022 पर्यंत रितसर अर्ज करावेत, असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

शासन निर्णयान्वये महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार वीरशैव-लिंगायत समाजासाठी सामाजिक, कलात्मक, समाज संघटनात्मक, अध्यात्मिक प्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात काम करीत असलेल्या व्यक्तीच्या व संस्थांच्या कामाची दाद, दखल घ्यावी व इतरांना त्यापासून प्रेरणा मिळावी यासाठी समाजसेवक, कलावंत, समाज संघटनात्मक कार्यकर्ते, अध्यात्मिक प्रबोधनकार व साहित्यिक सरसावून पुढे यावेत याकरिता व्यक्तींसाठी एक व सामाजिक संस्थेसाठी एक असे एकूण दोन पुरस्कार देण्यात येणार आहेत.

हे पुरस्‍कार सन 2018-19, 2019-20, 2020-21 व 2021-22  अशा चार वर्षांसाठी चार वेगवेगळे रितसर अर्ज करण्‍यात यावेत.  तसेच हे अर्ज दिनांक 20 एप्रिल 2022 रोजी पूर्वी सादर करण्‍यात यावेत. या पुरस्‍कारासाठी पात्रताबाबतची नियमावली दि. 8 मार्च, 2019 च्या शासन निर्णयासोबत जोडण्‍यात आलेली असून महाराष्‍ट्र शासनाच्‍या वेबसाईटवर संबंधित शासन निर्णय असून त्‍याचा सांकेतांक क्रमांक 201903082039003522 असा आहे. 

हिंगोली जिल्ह्यातील इच्छुक व्यक्ती व संस्था यांनी वरील चारही वर्षासाठी दोन वेगवेगळ्या उपरोक्त पुरस्कारासाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, हिंगोली यांच्याकडे दि. 22 जुलै, 2019 च्या शासनपत्रामध्ये दिलेल्या विहित नमुन्यामध्ये व अर्जासोबत नियमाप्रमाणे आवश्यक ती माहिती जोडून दि. 20 एप्रिल, 2022 पर्यंत रितसर अर्ज सादर करावेत, असे आवाहन शिवानंद मिनगीरे, सहायक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

*****