05 January, 2023

 

जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी

निवड चाचणी परीक्षेसाठी 31 जानेवारी पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 

            हिंगोली (जिमाका), दि. 05 : जिल्ह्यातील वसमत येथील जवाहर नवोदय विद्यालय हे शिक्षा मंत्रालय भारत सरकार अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या संपूर्णत: निवासी स्वरुपाचे विद्यालय आहे. शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये इयत्ता  5 वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये इयत्ता 6 वी प्रवेशासाठी जवाहर नवोदय विद्यालयात निवड चाचणी परीक्षा प्रवेशाचे अर्ज ऑनलाईन भरण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे. ही निवड चाचणी परीक्षा ही शनिवार, दि. 29 एप्रिल, 2023 रोजी सकाळी 11.30 ते दुपारी 1.30 दरम्यान होणार आहे.

            यावर्षी हे प्रवेश अर्ज संपूर्णत: ऑनलाईन पध्दतीनेच भरले जाणार आहे. यासाठी कोणतेही शुल्क राहणार नाही. पालक हे अर्ज कोठूनही अपलोड करु शकतात.

            त्यासाठी विद्यार्थ्याचे आधारकार्ड, विद्यार्थी व पालकाची सही (स्कॅन), विद्यार्थ्याचा फोटो जेपीजी फॉरमॅटमध्ये (साईज 10 ते 100 के.बी.), इयत्ता 5 वी मध्ये शिकत असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकाचे विहित नमुन्यातील सर्टीफिकेट (स्कॅन कॉपी) आवश्यक आहेत. सदर सर्टीफिकेटचा नमुना विद्यालयाच्या http://www.navodaya.gov.in/nvs/nvs-school/Hingoli/en/home & www.navodaya.gov.in या वेबसाईटवर डॉऊनलोड लिंकमध्ये उपलब्ध आहे. तसेच याच वेबसाईटवरुन विद्यार्थी दिलेल्या लिंकद्वारे प्रवेश अर्ज करतील. अर्ज अपलोड करण्याचा अंतिम दि. 31 जानेवारी, 2023 हा आहे.

            प्रवेश अर्ज भरण्यासाठी विस्तृत माहिती जवाहर नवोदय विद्यालयाच्या http://www.navodaya.gov.in/nvs/nvs-school/Hingoli/en/home & www.navodaya.gov.in  या वेबसाईटवर उपलब आहे. मुख्याध्यापकांनी इच्छुक विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज तात्काळ भरावे. अर्ज भरण्यास काही अडचण निर्माण होत असल्यास विद्यालयात कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन एस.एस.वाघमारे, प्राचार्य, जवाहर नवोदय विद्यालय, वसमतनगर, जि.हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.  

*****

 

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक आचारसंहितेमुळे

जिल्हा कृषि महोत्सव व राज्यस्तरीय हळद महोत्सवाचा कार्यक्रम पुढे ढकलला

 

हिंगोली (जिमाका), दि. 05 :  पैनगंगा, कयाधू व पूर्णा नद्यांच्या खोऱ्यात वसलेला हिंगोली जिल्हा हा हळद या पिकासाठी महाराष्ट्र राज्यात सर्वात अग्रगण्य आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची शाश्वत प्रगती व्हावी, हळदीसह इतर पिकांनाही शाश्वत बाजारभाव मिळावा, शेतमाल उद्योग प्रक्रियेला चालना मिळावी, शेतकरी व देश, राज्य पातळीवरील नामांकित कृषि शास्त्रज्ञ यांच्यामध्ये थेट संवाद व्हावा म्हणून कृषि विभागाच्या संकल्पनेतून नवीन वर्षाच्या सुरुवातीला हिंगोली येथील रामलीला मैदानावर भव्य जिल्हा कृषि महोत्सव व राज्यस्तरीय हळद महोत्सव दि. 13 जानेवारी ते दि. 16 जानेवारी, 2023 या कालावधीत नियोजित केला होता. या महोत्सवामध्ये 200 पेक्षा जास्त स्टॉल, परिसंवाद, प्रत्यक्ष राज्यातील चारही कृषि विद्यापीठाची दालने, विविध संशोधन केंद्रे, स्पाईसबोर्ड, कृषि निविष्ठा, सिंचन साधने, गृहपयोगी विक्री दालन, मशिनरी व अवजारे, कृषि विज्ञान केंद्र, हळदीवर प्रक्रिया करणाऱ्या उद्योग समुहांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला होता. प्रामुख्याने हळद या पिकाचे 40 ते 50 स्टॉल असणार होते.

तसेच चार दिवस शेतकऱ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी हळद उत्पादन तंत्रज्ञान, हळद बेणे उत्पादन, हळद लागवड, निर्मिती, काढणी व काढणी पश्चात तंत्रज्ञान, हळद प्रक्रिया, हळद प्रक्रियेतील गुणवत्तेचे निकष, हळद प्रक्रिया उद्योगातील संधी व आव्हाने, हळद मूल्यवर्धन साखळी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील उत्पादन, बाजारभाव व भौगोलिक मानांकन, जागतिक आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य (मिलेट) वर्ष याबाबत विविध विषयावर मार्गदर्शन, शेतमालाचे खरेदी विक्रीबाबत मार्गदर्शन, शेतमालाचे मूल्यवर्धन, उत्पादक ते खरेदीदार संमेलन, जिल्ह्यात नवीन पिके जसे ड्रॅगन फ्रूट, करवंद, करडई लागवड या पिकाविषयी सविस्तर मार्गदर्शन, तसेच विविध पिकाचे आधुनिक तंत्रज्ञान इत्यादी विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना लाभणार होते.

सद्यस्थितीत दि. 29 डिसेंबर, 2022 रोजी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघामध्ये निवडणूक घोषित झाल्याने व निवडणुकीची आदर्श आचारसंहिता तात्काळ लागल्यामुळे जिल्हा कृषि महोत्सव व राज्यस्तरीय हळद महोत्सवाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात येत आहे. तसेच आचारसंहिता संपताच सदरील जिल्हा कृषि महोत्सव व राज्यस्तरीय हळद महोत्सवाचे नियोजन करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी हिंगोली तथा अध्यक्ष जिल्हा कृषि महोत्सव समिती, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.  

*****  

04 January, 2023

 

सखी वन स्टॉप सेंटर येथे महिला मेळावा संपन्न


 

हिंगोली (जिमाका), दि. 04 :  महिला व बालविकास विभागांतर्गत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 03 जानेवारी, 2023 रोजी येथील सखी वन स्टॉप सेंटरवर सावित्रीबाई फुले जयंती निमित्त महिला मेळावा घेण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बाल कल्याण समितीच्या सदस्या संगिता दुबे, बाली भोसले, किरण करडेकर तसेच बाल न्याय मंडळाच्या सदस्या डॉ. वर्षा कुरील, ॲड. सत्वशीला तांगडे उपस्थित होत्या.

यावेळी महिलाविषयी कायदे तसेच सखी वन स्टॉप सेंटर मार्फत पिडित महिला व मुलींसाठी 24 तास काम करत असल्याची माहिती दिली. तसेच या सेंटरमध्ये समुपदेशन, कायदेशीर मदत, आश्रय सुविधा, पोलीस मदत इत्यादी सुविधा उपलब्ध असल्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेंटरचे समुपदेशक दिनेश पाटील यांनी केले.

यावेळी शहरातील आशा वर्कर, सुपरवायझर. सेंटरचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.  

****

 

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत रास्तभाव दुकानातून मिळणाऱ्या

मोफत अन्नधान्याचा लाभ घेण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 04 :  केंद्र शासनाने 01 जानेवारी, 2023 पासून मोफत अन्नधान्य वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दि. 01 जानेवारी ते दि. 31 डिसेंबर, 2023 या कालावधीत अनुज्ञेय असेलेले अन्नधान्य मोफत वितरीत करण्यात येणार आहे. उदा. माहे नोंव्हेंबर, 2022 किंवा डिसेंबर, 2022 साठी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या अन्नधान्याचे वितरण दि. 01 जानेवारी, 2023 किंवा त्यानंतर करण्यात येत असल्यास ते अन्नधान्य लाभार्थ्यांना मोफत वितरीत करावे.

अन्नधान्याच्या मोफत वितरणामुळे रास्तभाव दुकानदारांना देय असलेले मार्जिन अग्रीम अदा करण्याबाबत उद्भवणाऱ्या समस्यांबाबत केंद्र शासनाकडून सूचना प्राप्त झाल्यानंतर स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे.

केंद्र शासनाच्या उपरोक्त निर्णयाच्या अनुषंगाने राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत रास्तभाव दुकानातून मिळणाऱ्या मोफत अन्नधान्याचा लाभ योजनेतील पात्र लाभधारकांनी  घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

*****

 

रास्त भाव दुकानदारांना मार्जिनची रक्कम अदा करण्याचे आदेश

 

हिंगोली (जिमाका), दि. 04 :  कोरोना प्रादुर्भाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील पात्र लाभार्थ्यांना माहे एप्रिल ते जून, 2022 (प्रत्यक्ष वितरण माहे एप्रिल ते जुलै, 2022) तसेच या योजनेसाठी  मार्च, 2022 (प्रत्यक्ष वितरण माहे एप्रिल, 2022 अखेर) या कालावधीमध्ये वितरीत केलेल्या मोफत गहू व तांदूळ या पोटी शिधावाटप/रास्तभाव दुकानदार यांना देय असलेल्या मार्जिनची रक्कम वितरीत करण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना अनुदान उपलब्ध करुन दिलेले आहे. त्याअनुषंगाने जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडून जिल्हाधिकारी यांनी  जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना सर्व रास्तभाव दुकानदारांना मार्जिनची रक्कम वितरण करण्याचे आदेश दिले आहेत.

तालुकानिहाय रास्तभाव दुकानदारांना मार्जिनची रक्कम वितरण करण्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

औंढा नागनाथ तहसील कार्यालयासाठी माहे मार्च, 2022 चे वितरण माहे एप्रिल, 2022 साठी 4 लाख 24 हजार 968, तर माहे एप्रिल ते जून 2022 या कालावधीचे वितरण माहे एप्रिल ते जुलै, 2022 साठी 31 लाख 02 हजार 490 असे एकूण 35 लाख 27 हजार 458 रुपये,  वसमत तहसील कार्यालयासाठी माहे मार्च, 2022 चे वितरण माहे एप्रिल, 2022 साठी 2 लाख 16 हजार 968 , तर माहे एप्रिल ते जून 2022 या कालावधीचे वितरण माहे एप्रिल ते जुलै, 2022 साठी 44 लाख 91 हजार 174 असे एकूण 47 लाख 07 हजार 911 रुपये,  हिंगोली तहसील कार्यालयासाठी माहे मार्च, 2022 चे वितरण माहे एप्रिल, 2022 साठी 7 लाख 90 हजार 298 , तर माहे एप्रिल ते जून 2022 या कालावधीचे वितरण माहे एप्रिल ते जुलै, 2022 साठी 38 लाख 48 हजार 589 असे एकूण 46 लाख 38 हजार 887 रुपये,  कळमनुरी तहसील कार्यालयासाठी माहे मार्च, 2022 चे वितरण माहे एप्रिल, 2022 साठी 57 हजार 801 , तर माहे एप्रिल ते जून 2022 या कालावधीचे वितरण माहे एप्रिल ते जुलै, 2022 साठी 32 लाख 16 हजार 543 असे एकूण 32 लाख 74 हजार 344 रुपये,  सेनगाव तहसील कार्यालयासाठी माहे मार्च, 2022 चे वितरण माहे एप्रिल, 2022 साठी 01 लाख 13 हजार 606 , तर माहे एप्रिल ते जून 2022 या कालावधीचे वितरण माहे एप्रिल ते जुलै, 2022 साठी 31 लाख 85 हजार 760 असे एकूण 32 लाख 99 हजार 366 रुपये याप्रमाणे वितरीत करण्यात आली आहे.

वरील प्राप्त रक्कम शीघ्र गतीने रास्तभाव दुकानदारांच्या खात्यात वर्ग करण्याच्या सक्त सूचना जिल्हाधिकारी महोदयांनी दिलेल्या आहेत, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी , हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.   

*****  

03 January, 2023

 

चला जाणूया नदीला या समितीचे सदस्य जयाजी पाईकराव यांच्या मुलाखतीचे आकाशवाणी परभणी केंद्रावरुन 04 जानेवारी रोजी प्रसारण

 

हिंगोली (जिमाका), दि. 03 :  राज्य शासनाने राबविलेल्या चला जाणूया नदीला या लोकसहभाग असणाऱ्या उपक्रमाविषयी चला जाणूया नदीला राज्य समितीचे सदस्य जयाजी पाईकराव यांची  सतीश जोशी यांनी घेतलेली मुलाखत आकाशवाणी परभणी केंद्रावरुन बुधवार, दि. 04 जानेवारी, 2023 रोजी सकाळी 11.05 वाजता प्रसारित होणार आहे.

याचा सर्व श्रोत्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आकाशवाणी परभणी केंद्राचे सतीश जोशी केले आहे.   

*****  

 

हिंगोली जिल्ह्यासाठी 873 क्विंटल साखरेचे नियतन मंजूर

 

 

हिंगोली (जिमाका),  दि. 03 : सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेअंतर्गत जिल्‍हयातील अंत्‍योदय शिधापत्रिका धारकांसाठी शासनाने माहे जानेवारी, फेब्रुवारी व मार्च-2023 या तीन महिन्यांसाठी नियमित नियतन साखर प्रति शिधापत्रिका एक किलो याप्रमाणे मंजूर केले आहे. या तीन महिन्‍याचे जिल्‍ह्यासाठी  873 क्विंटलचे नियतन शासनाकडून प्राप्‍त झाले आहे. या नियतनाची उचल करुन प्रत्‍यक्ष शिधापत्रिकाधारकांस संबंधित स्‍वस्‍त धान्‍य दुकानामार्फत वितरण करण्‍यात येणार आहे.  

तालुकानिहाय नियतन पुढील प्रमाणे देण्‍यात आले आहे.  हिंगोली-225 क्विंटल, औंढा ना.-99 क्विंटल, सेनगाव-186 क्विंटल, कळमनुरी-187 क्विंटल, वसमत-176 क्विंटल असे जिल्ह्यासाठी एकूण 873 क्विंटल साखरेचे नियतन मंजूर झाले आहे. सर्व अंत्‍योदय शिधापत्रिकाधारकांनी स्‍वस्‍त धान्‍य दुकानातून साखरेची उचल करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी , हिंगोली यांनी  केले आहे.

 

*****